अक्षरारंभ हा हिंदू धर्मियांच्या १६ संस्कारांपैकी एक अत्यंत मौल्यवान असा संस्कार आहे . यात बालकाला विद्यार्थी दशेत प्रवेश करण्या आधी बुद्धिदाता गणरायाला वंदन करून श्रीगणेशाय नमः || असे लिहायला शिकवण्यात येते . या संस्कारावरूनच कोणत्याही शुभ कार्याचा आरंभ करताना श्रीगणेशा केला अशी उक्ती आपल्याकडे प्रचलित झाली.
अशा या शुभारंभाच्या देवतेचे विघ्नहर्ता व सुखकर्ता असलेल्या श्रीगणेशाचे आगमन दरवर्षी आपल्या संस्कृतीत भाद्रपद शुक्ल चतुर्थीला खूप उत्साहात होत असते . गणेशमूर्तीच्या रूपाने गणेशतत्वाची आपण प्रत्येकजण आपापल्या श्रद्धेनुसार आपल्या मनात , घरात व समाजात प्राणप्रतिष्ठा करत असतो . आपल्या उपासनेनुसार , भक्तिभावानुसार जणू या गणरायाच्या मूर्तीत आपण प्राण भरत असतो . त्यामुळेच प्रत्येकाच्या मनातला गणपती व गणेशोत्सव असाच वेगवेगळ्या शैलीने ,कुणी गणपतीची गाणी म्हणून , कुणी कथा वाचून , कुणी आरत्या गाऊन ,कुणी स्तोत्र पठणाने साजरा करत असतो .
माझ्या मनातला गणेशोत्सव व गणेशभक्ती ही अथर्वशीर्षाशी खूप साधर्म्य साधते . यातील प्रत्येक श्लोकागणिक मी या गणेशमूर्ती व गणेशतत्वाच्या अधिकाधिक समीप जाऊ लागते . गणक ऋषी रचित अथर्ववेदामधले हे लघु उपनिषद असून यात निच्र्तगायत्री छंदातील १० ऋचांचा समावेश आहे . यातील वर्णनानुसार गणेशतत्वामध्ये पंचमहाभूते व परा , पश्यन्ति ,मध्यमा ,वैखरी ही वाणीची चार रूपे , सर्व ग्रहदेवता , सर्व दिशा , उत्पत्ती , स्थिती ,लय या निसर्गदेवता हे सर्व सामावलेले आहे . म्हणूनच यात गणरायाला त्वं प्रत्यक्षम ब्रम्हासि असं म्हणलंय . म्हणजेच गणपती ही देवता साक्षात ब्रम्हस्वरूप आहे . ब्रम्ह निरंजन ,कलंकरहित आहे , ब्रम्ह ही त्रिकालातीत अशी परमशक्ती आहे . त्यात पूर्णत्व आहे . याच ब्रम्हाचे मूर्त रूप श्रीगणेश आहे . या ब्रम्हाचा एकोहं बहुस्याम हा जो संकल्प आहे ,त्यानुसार ब्रह्ममयी असे हे गणेशतत्त्व त्वं मूलाधारस्थितीयोसी नित्यं या वचनाप्रमाणे सृष्टीतील प्रत्येक मानवी शरीरात मूलाधार चक्रामध्ये वास्तव्य करते . ते सुप्तावस्थेत असल्यामुळे सर्वानाच याची जाणीव असतेच असे नाही . ध्यानधारणा , अंतःशुद्धी यामुळे ते जागृत होते . हे आपल्या शरीरातील कुंडलिनी व इडा पिंगला सुषुम्ना नाड्यांचे उगमस्थान आहे . मानवाला या चक्राच्या जागृती मुळे सद्बुद्धी , सुयश ,समृद्धी ची प्राप्ती होते . हे चक्र pelvic plexus या ठिकाणी स्थित असून adrenal gland चे कार्य संतुलित करण्याचे कार्य करते . चार पाकळ्यांच्या या चक्राचा रंग लाल असल्याने , या चक्राच्या संतुलनासाठी गणपती या देवतेला लाल वस्त्र व लाल फुल वाहिले जाते . यासर्वांचा अर्थ गणेशतत्त्वाचा आपल्या मानवीशरीरावर असणारा प्रभाव हा अखंड मानवजातीच्या survival साठी अत्यंत मोलाचा आहे . म्हणूनच गणपतीला कर्ता धर्ता असं संबोधलं जात असावं .
या ब्रह्ममयी गणेशाला ओंकारस्वरूप देखील म्हणलेले आहे . ओंकारस्वरूप गणेशाच्या ठायी वसलेल्या साडेतीन मात्रा म्हणजेच अकार उकार मकार व बिंदू या ओम या अक्षरशक्तीतील एक एक अवस्था आहेत .
१. अकार - संपूर्ण जगरहाटी ज्या जागृत अवस्थेत असते ती हि वैश्वानर अवस्था . यामध्ये श्रीगणेश आहे .
२. उकार - मानवाच्या स्वप्न व कल्पनेतील जगामधली ही तैजस अवस्था आहे . यात श्रीगणेश आहे .
३. मकार - त्वं आनंदमयस्त्वम ब्रह्ममय: ब्रह्ममय आनंदाची प्राप्ती होणारी , ब्रम्हानंदाची साक्षात अनुभूती देणारी ही सुषुप्ती अर्थात ध्यानावस्था आहे . गणपती ही बुद्धीची देवता असल्याने या अवस्थेतील गणेशतत्त्व आत्म्याच्या प्रज्ञानघन अवस्थेशी एकरूप होते . १/२ - ओम वरील बिंदू असलेली ही अर्धी मात्रा आहे . अ उ म चा उच्चार होतो परंतु या बिंदुला उच्चार नाही . ही तुर्यावस्था म्हणजेच समाधीअवस्था आहे . या अवस्थेतील गणेशतत्त्व ब्रम्हस्वरूपाशी एकवटते . उपनिषदामध्ये व अथर्वशीर्षामध्ये उल्लेख झालेले हे ओंकाराचे वर्णन संत ज्ञानेश्वरांनीही त्यांच्या गणेशस्तुती मध्ये असे केलेले आहे .
अकार चरण युगुल। उकार उदर विशाल।
मकर महामंडल। मस्तकाकारे।।
हे तिन्ही एकवटले। तेथे शब्दब्रम्ह कवळले।
अशाप्रकारे , गणक ऋषी , संत ज्ञानेश्वर व अनेक संतमाहात्म्यांनी गौरविलेले सर्व दिशातून रक्षण करणारे ज्ञानमयी असे सर्वांचे लाडके दैवत , समर्थ रामदासांच्या आरतीतून आपल्याला भेटते तेंव्हा ते अधिक सुकर व भक्तांच्या हृदयाच्या अधिक जवळ येते . दर्शनमात्रें मनकामना पूर्ती करणाऱ्या गणपती बाप्पाची साध्या सोप्या शब्दांत व चालीतून केलेली आळवणी आपल्या मनाचा ठाव घेते . सर्वांगाला सुंदर चंदन व शेंदूर उटी लावून केशराचा टिळा व शोभिवंत हिरेजडित मुकूट परिधान केलेला गौरीपुत्र आमचे रक्षण करो अशी समर्थांनी घातलेली आर्त साद आपल्याला गणपतीच्या चरणाशी एकरूप करते . शिवथरघळ वास्तव्याच्या वेळी समर्थानी जी गणेशस्तुती लिहिली ती आज आपल्या सर्वांच्या मनामनातून गुंजणारी गणपती ची आरती आहे . या समर्थांच्या आरती व गणेशभक्ती बद्दल इतिहासात नोंद देखील आहे .
समर्थे सुंदरमठी गणपती केला ! दोनी पुरुष सिंदूर वर्ण अर्चिला !! सकळ प्रांन्तासी मोहछाव दावीला ! भाद्रपद माघ पर्यंत !!
समर्थ रामदास व छत्रपती शिवाजीराजे यांनी शिवथरघळ येथे भाद्रपद शुद्ध ४ ते माघ शुध्द ५ म्हणजेच गणेशजयंती पर्यंत पाच महिन्यांचा गणेशोत्सव करण्याची प्रथा सुरु केली . याचे पहिले वर्गणीदार स्वतः शिवराय आहेत . अशाप्रकारे स्वराज्यनिर्मितीनंतरचा पहिला सार्वजनिक गणेशोत्सव शिव - समर्थ यांनी साजरा केला . परंतु अगदी राज्याच्या कानाकोपऱ्या पर्यंत घरगुती गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप प्राप्त झाले ते आपल्या लोकमान्य टिळकांमुळे . पारतंत्र्यामुळे सामाजिक एकता ,शांतता व सलोख्याला छेद जात होता . म्हणून सामाजिक बांधिलकी जपण्या साठी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या रूपाने लोकमान्यांनी टाकलेले पाऊल हे मनुष्यबळ संघटित करण्याच्या दृष्टीने अत्यंत मोलाचे ठरले . यामागचे कारण असे कि , शिस्तबद्ध , आज्ञाधारक निष्ठावंतांचा समुदाय म्हणजे गण. या गणांचा अधिपती गणपती . यावरून हे स्पष्ट होते कि गणपती ही संघटनेची देवता आहे . या संघटित झालेल्या समाजाने साजरा करत असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप कालपरत्वे बदलत गेले व अधिकाधिक वाढत गेले . गावोगावी तळागाळात पोहोचले . मंडळाच्या संख्येत भर पडत गेल्याने मंडपवाले , स्वछता कामगार , फुलवाले , धार्मिक दुकानदार , सजावटकार शिल्पकार अशा अनेकांना रोजगार मिळाला . इतकेच नाही तर गणपती ही ६४ कलांची देवता असल्याने अनेक गायक , नर्तक वक्ते , अभिनेते , मूर्तिकार , चित्रकार या व अशा कलाकार व त्यांच्या कलाविष्कारासाठी व्यासपीठ प्राप्त झाले . मंडळांकडून होत असलेल्या चॅरिटी व विधायक सामाजिक कार्यांमुळे गणरायावरची भक्ती मानवसेवेतही प्रकट होऊ लागली . अशाप्रकारे , आजचे सार्वजनिक गणेशोत्सवाचे रूप म्हणजेच आपल्या भारतीय परंपरेचा जाज्वल्य अभिमान आहे . शेवटी इतकंच वाटतं कि , श्रीगणेशा बरोबरच भक्तांनीही आपापल्या आयुष्यात व समाजात अत्यंत सुसंस्कृत अशा विधायक विचारांची व कार्याची प्राणप्रतिष्ठा करावी व उत्सवाचे १० दिवस आपापल्या चुकांचे ( बाकी विशाल उदर असलेला गणपती बाप्पा आपले अपराध पोटात घेत असतोच ) परिमार्जन करत नकारात्मक वृत्तीचे विसर्जन करावे . यामुळ वर्षभरातून हे गणेशोत्सवाचे दिवस आत्मिक व सामाजिक purification ची एक सुलभ प्रक्रिया म्हणून अनुभवास येतील .
( संदर्भ- उपनिषदांची काही पुस्तके)
-- तन्वी पुष्कर टापरे .