परंपरा आणि प्रगती म्हणजेच कॉन्टिनेन्टल प्रकाश
डॉ. अंजल जोशी, पुणे 1 जून 1938 रोजी कॉन्टिनेन्टलचा जन्म झाला आणि 1 जून 2017 रोजी ती 80व्या वर्षात पदार्पण करते आहे. एखादी संस्था सलग 80 वर्षे सातत्याने कार्यरत राहणे ही आजच्या काळात आश्चर्याची गोष्ट झाली आहे. त्या आश्चर्यामधे कॉन्टिनेन्टलचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागते. प्रकाशनसंस्थेसारखी संस्था आणि त्यातून मराठी प्रकाशनसंस्था सातत्याने कार्य करताना पाहणे ही खरंच खूप आनंददायक गोष्ट आहे. पुण्यात राहणा-या मराठी वाचकाला कॉन्टिनेन्टल माहीत नाही किंवा तिचा इतिहास माहिती नाही असे सहसा आढळणे कठीण आहे. कै. अनंतराव कुलकर्णी यांनी लावलेला कॉन्टिनेन्टलचा ग्रंथवृक्ष आता 80 वर्षांचा होतो आहे. अनंतरावांनंतर त्यांचे चिरंजीव कै. अनिरुद्ध कुलकर्णी आणि कै. रत्नाकर कुलकर्णी या बंधुद्वयानी ग्रंथविस्तारामधे मोठी भर घातली. आता कॉन्टिनेन्टलची तिसरी पिढी ऋतुपर्ण कुलकर्णी-अमृता कुलकर्णी आणि देवयानी कुलकर्णी-अभ्यंकर देखील या ग्रंथविस्ताराच्या कार्यात मोठी कामगिरी करते आहे. अनेक मोठमोठ्या लेखकांचे अजूनही कॉन्टिनेन्टलशी ऋणानुबंध आहेत. कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर, केशव मेश्राम, विंदा करंदीकर यांसारख्या कविश्रेष्ठांचे साहित्य अनंतरावांनी प्रकाशित केले. आजच्या काळातील संदीप खरे यांच्यासारखे आघाडीचे सुप्रसिद्ध कवी यांचेही कवितासंग्रह कॉन्टिनेन्टलच्या दालनात दिमाखाने उभे आहेत. कै. अनंतरावांना मराठी साहित्याबद्दल अपार प्रेम होते. त्यांनी लेखक घडवले असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. अनंतरावांच्या काळात मराठी साहित्याचा सुवर्णकाळ होता असे म्हणायला हवे. कॉन्टिनेन्टलच्या जन्माचा काळ हा स्वातंत्र्यपूर्वकाळ होता. अनेक राजकीय, सामाजिक वारे वाहत होते. स्त्रिया लिहित्या होत होत्या. अत्यंत धामधुमीचा, सुधारणांचा, स्वातंत्र्यचळवळीचा असा हा काळ स्त्रियांना शहाणं करत होता. सुधारणावादी पुरुष स्त्रियांना प्रोत्साहन देत होते. अशा काळात प्रकाशनव्यवसायामार्फत अनंतराव या सुधारणांना प्रोत्साहनच देत होत असे दिसते. शांताबाई नाशिककर यांचा ‘नीलेचा दिलरुबा’ हा कथासंग्रह अनंतरावांनी 1941 मधे प्रकाशित केला. कॉन्टिनेन्टलच्या या पहिल्या स्त्री लेखक. शांताबाई शेळके यांचाही ‘वर्षा’ हा पहिला कवितासंग्रह कॉन्टिनेन्टलने प्रकाशित केला होता. दत्त रघुनाथ कवठेकर यांचा ‘नादनिनाद’ हा कथासंग्रह हे प्रकाशनाचे पहिले ग्रंथअपत्य. यानंतर कॉन्टिनेन्टलने कविता, कादंबरी, नाटक, समीक्षा, पर्यटन, भाषाशिक्षण, ललितगद्य, इतिहास, पुराण, धार्मिक, चरित्र, कृषीतंत्रज्ञान, संगणकशास्त्र, सामाजिक कार्य अशा विविध विषयांवरील पुस्तके प्रकाशित केली. शिवाजी सावंत यांच्या ‘मृत्युंजय’, ‘छावा’, ‘युगंधर’सारख्या कादंब-या आणि ना. सं. इनामदार यांच्या ‘झेप’, ‘झुंज’, ‘राऊ’, ‘शहेनशहा’, ‘शिकस्त’ यांसारख्या कादंब-या कॉन्टिनेन्टलच्या यशस्वी घोडदौडीतील अग्रस्थानच्या साहित्यकृती आहेत. या कादंब-यांना मिळणारा रसिकवाचकांचा प्रतिसाद बघून या कादंब-यांची लोकप्रियता अजूनही शिखरावर आहे हे दिसून येते. गदिमा, व्यंकटेश माडगूळकर, द. मा. मिरासदार, अरविंद गोखले, कुसुमाग्रज, जी. ए. कुलकर्णी, शिवाजी सावंत, ना. सं. इनामदार, श्री. ना. पेंडसे, गो. नी. दांडेकर, प्रा. आर. एम. गोखले यांसारख्या मोठमोठ्या लेखकांशी अनंतरावांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. यशवंतराव चव्हाणांची कॉन्टिनेन्टलला दिलेली भेट ही कॉन्टिनेन्टलच्या इतिहासातील एक अविस्मरणीय घटना होय. ‘अनंत आमुची ध्येयासक्ती’ हे अनंतरावांचे तत्त्वं त्यांच्या नावाला, कर्तृत्वाला साजेसेच होते. 1985 साली पहिले प्रकाशक संमेलन झाले त्याचे अनंतराव कुलकर्णी संमेलनाध्यक्ष होते. त्यावेळेला केलेले त्यांचे अध्यक्षीय भाषण म्हणजे एका उत्तम व्यावसायिकाचे साक्षेपी निरीक्षण आहे. प्रकाशन व्यवसायातील अडचणी, प्रकाशकाची कर्तव्ये, लेखक-प्रकाशक संबंध अशा महत्त्वाच्या विषयांचा अंतर्भाव त्यांच्या भाषणात होता. ‘लेखकाला हे माहिती हवे’ नावाची एक लहानशी पुस्तिका स्वतः अनंतरावांनी लिहिली होती. लेखक-प्रकाशक यांच्यातील जिव्हाळ्याचे संबंध हा अनंतरावांनी स्वतः घालून दिलेला उत्तम आदर्श होता. तोच आदर्श पुढील पिढीने ठेवलेला दिसतो. कॉन्टिनेन्टलचा इतिहास जुन्या-जाणत्यांना माहिती आहेच. बाबासाहेब पुरंदरे यांनी कॉन्टिनेन्टलचा ‘क्रांतिनेत्र प्रकाशन’ असा गौरव केला होता. आताच्या पिढीलाही हा गौरवशाली इतिहास माहिती व्हावा यासाठी हा लेखप्रपंच. ज्येष्ठ श्रेष्ठ लेखकांच्या साहित्यकृती कॉन्टिनेन्टलकडे येण्याची परंपरा अजूनही टिकून आहे, हे कॉन्टिनेन्टलच्या यशस्वी वाटचालीचे गमक आहे. अनंत मनोहर, अनिल अवचट, संदीप खरे, सलील कुलकर्णी, सदानंद देशमुख, श्रीनिवास भणगे, शिवराज गोर्ले, रेखा बैजल, राजेंद्र देशपांडे, सुधाकर शुक्ल, रा. रं. बोराडे यांच्यासारखे सुप्रसिद्ध लेखक-लेखिका कॉन्टिनेन्टल परिवाराचाच भाग बनले आहेत. कै. निनाद बेडेकर यांचाही सहवास कॉन्टिनेन्टलला मिळाला होता. ‘कालातीत व्यवस्थापनशास्त्राची तत्त्वे’ ह्या महत्त्वपूर्ण अशा आगळ्यावेगळ्या ग्रंथाच्या संपादनात त्यांचा मोलाचा सहभाग होता. अशा लेखकांचा सहवास घडणे ही प्रकाशनाला अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. कै. मीना वांगीकर यांचे कॉन्टिनेन्टल परिवाराशी अगदी घट्ट नाते होते. त्या कायम अनंतराव, अनिरुद्ध आणि रत्नाकर या तिघांविषयी भरभरून बोलत असत. ‘मुकज्जी’ या शिवराम कारंथ यांच्या कादंबरीचा अनुवाद करतानाचा अनुभव त्या अनेकदा सांगत असत. सिनेअभिनेत्री स्मिता जयकर त्यांच्या ‘आत्ता नाहीतर केव्हा?’ या पुस्तकाच्या निमित्ताने कॉन्टिनेन्टल परिवाराशी नव्याने जोडल्या गेल्या. अशा अनेक आठवणी इथे सांगता येतील. ऐतिहासिक आणि पौराणिक कादंब-या हा कॉन्टिनेन्टलचा एक खास विशेष आहे. तसेच शेतीविषयक पुस्तकांचा चांगला संग्रह कॉन्टिनेन्टलने प्रकाशित केलेला आहे. भी. गो. भुजबळ, शिवाजी ठोंबरे, उगांवकर पतिपत्नी, मुकुंदराव गायकवाड, हेमा साने, कांचनगंगा गंधे हे आणि इतरही अनेक लेखकांची शेती-बागा-फुलझाडे यांच्यावरची पुस्तके प्रसिद्ध आहेत. अंजली धडफळे, के. वि. पानसे, जाई केळकर, मधुसूदन देसाई, प. म. आलेगावकर यांच्यासारख्या इतरही लेखकांची आरोग्यविषयक पुस्तके कॉन्टिनेन्टलने प्रकाशित केलेली आहेत. चिं. वि. जोशी यांच्या 29 पुस्तकांचा मोठा संच हाही कॉन्टिनेन्टलच्या इतिहासातील मानाचे पान आहे. गो. म. कुलकर्णी, रा. ग. जाधव, पु. ग. सहस्रबुद्धे, शालिनी जावडेकर, शं. दा. पेंडसे, वि. रा. करंदीकर, रा. शं. वाळिंबे यांच्यासारखे जुने विचारवंत लेखक तसेच यशवंत मनोहर, श्रीनिवास हवालदार, सुरेश भृगुवार, विजय देव, वि. म. गोविलकर यांच्यासारख्या ज्येष्ठ चिकित्सक समीक्षकांच्या वैचारिक आणि समीक्षात्मक ग्रंथांचा दर्जेदार संग्रह कॉन्टिनेन्टलने प्रकाशित केलेला आहे. शंकरराव खरात यांचे ‘तराळ अंतराळ’ हे आत्मचरित्र अनंतरावांनी प्रकाशित करून मराठी साहित्यातील नव्या प्रवाहाशी स्वतःला जोडून घेतले होते. बाबासाहेब आंबेडकरांवरील काही पुस्तके कॉन्टिनेन्टलने प्रकाशित केली आहेत. ई-बुकसारख्या तांत्रिक पद्धतीचाही अवलंब कॉन्टिनेन्टलने केलेला आहे. काही लेखकांच्या पुस्तकांची ई-आवृत्ती निघाली आहे. वर्धापनदिनाच्या निमित्ताने कॉन्टिनेन्टलचे संकेतस्थळ सुरू होत आहे. तरुण वाचक, अभ्यासक आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे या संकेतस्थळामुळे सुलभ होणार आहे. प्रकाशनाची समग्र माहिती या संकेतस्थळाद्वारे जगभरातल्या वाचकांना होऊ शकेल. महत्त्वपूर्ण ललित-वैचारिक ग्रंथाची परिक्षणे या संकेतस्थळावर वाचायला मिळतील. वाचकांनी जरूर या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच पूर्वी कॉन्टिनेन्टलचा फिरते ग्रंथदालन हा उपक्रम चालत असे. तो आता वर्धापनदिनाच्या निमित्ताने पुन्हा सुरू होत आहे. कॉन्टिनेन्टल बुक क्लबचे सभासदत्व घेतल्यावर वाचकांना सवलतीत पुस्तकखरेदी करता येणार आहे. वर्धापनदिनाच्या निमित्ताने काही सवलती प्रकाशनाने पुस्तकखरेदीवर ठेवल्या आहेत. त्याचा वाचकांनी, ग्रंथालयांनी, ग्रंथविक्रेत्यांनी जरूर लाभ घ्यावा. ऐंशीव्या वर्षात पदार्पण करणा-या कॉन्टिनेन्टलचा इतिहास भव्य होता आणि भविष्य उज्ज्वल आहे. आतापर्यंत प्रकाशनाने 2000हून अधिक पुस्तकांची निर्मिती केलेली आहे. 2015मधे उत्कृष्ट प्रकाशन म्हणून कॉन्टिनेन्टल प्रकाशनाला महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला आणि त्याच्या यशस्वितेत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. महाराष्ट्र राज्य पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या कॉन्टिनेन्टल प्रकाशनाचा इथपर्यंतचा व्यावसायिक, वाङ्मयीन प्रवास मोठा वैविध्यपूर्ण आहे. आतापर्यंत कॉन्टिनेन्टलने प्रकाशित केलेल्या अनेक ललित, वैचारिक ग्रंथांना विविध पुरस्कार मिळाले आहेत. लेखकांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. काही पुस्तकांना उत्कृष्ट निर्मितीचे पुरस्कार मिळाले आहेत. शिवाजी सावंत यांच्या ‘मृत्युंजय’ या अत्यंत लोकप्रिय कादंबरीला ‘ज्ञानपीठ’ पारितोषिक मिळाले आहे. ना. सं. इनामदार यांच्या ‘शहेनशहा’ या कादंबरीला उत्कृष्ट निर्मितीचे पारितोषिक मिळाले आहे. नुकताच त्यांच्या ‘राऊ’ या कादंबरीवरून ‘बाजीराव मस्तानी’ हा हिंदी सिनेमा काढला गेला. तसेच सदानंद देशमुख यांच्या ‘बारोमास’ आणि ‘तहान’ या दोन कादंब-यांवरून मराठी सिनेमे काढले गेले. ‘बारोमास’ या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. दत्तप्रसाद दाभोळकर यांच्यावरील ‘रंग त्याचा वेगळा’ या ग्रंथाचे संपादन भानू काळे यांनी केले आहे, या ग्रंथाला महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला आहे. ‘फेडरेशन ऑफ इंडिया पब्लिशर्स, दिल्ली’ यांचे उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीसाठीचे प्रथम पुरस्कार काही ग्रंथांना मिळाले आहेत. ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’चे दहापेक्षा अधिक पुरस्कार मिळाले आहेत. प्रकाशनातर्फे चिं. वि. जोशी पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार हे पुरस्कार देण्यात येतात. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे हे पुरस्कार दिले जातात. तसेच प्रकाशनाच्या वर्धापन दिनानिमित्त प्रा. आर. एम. गोखले पारितोषिके ठेवली आहेत. कॉन्टिनेन्टलचे घोषवाक्यच ‘परंपरा आणि प्रगती’ आहे. त्याला अनुसरून प्रकाशनसंस्थेची वाटचाल जन्मापासूनच चालू होती, ती तशीच अजूनही चालू आहे. संस्थेची स्थापना करणे सोपे असते, मात्र ती आजच्या काळाच्या वेगानुसार नेटाने कार्यरत ठेवणे हे मोठे कठीण काम आहे. हे काम आजची तिसरी पिढी यशस्वीरीत्या करते आहे, हे कॉन्टिनेन्टलचा आताचा ग्रंथविस्तार पाहता दिसून येते. कॉन्टिनेन्टलच्या पुढच्या वाटचालीस अनंत शुभेच्छा !!