Book Categories


एकवार पंखावरूनी फिरो तुझा हात....

एकवार पंखावरूनी फिरो तुझा हात....

एकवार पंखावरूनी फिरो तुझा हात....

दादरच्या खांडके बिल्डिंग मध्ये घडलेल्या एका सत्य घटनेवर  गदिमांनी कथा- पटकथा व संवाद लिहिले  आणि  दिनकर द पाटील यांनी   दिग्दर्शन केले आणि "वरदक्षिणा "हा सुंदर चित्रपट निर्माण झाला...याच  चित्रपटातील एक अतिशय भावुक करणारे हे  गीत....नावातच चित्रपटाचा विषय दडलाय..."हुंडा बंदी"हाच विषय होता....नायक शांताराम म्हणजे रमेश देव हा आपटे गुरुजींचा विद्यार्थी आणि आश्रित....!!!!त्यांच्या लेकीवर, "कृष्णावर" मनापासून प्रेम करणारा....पण हे प्रेम तो "आश्रित "असल्याने कधीच व्यक्त करत नाही....तिला वरसंशोधनासाठी तो गुरुजींच्या स्नेह्यांकडे घेऊन जातो..त्यांच्या आजारी पत्नी शांताराम चा आवाज ऐकून एक गाणे ऐकण्याची इच्छा व्यक्त करतात......कृष्णा,स्नेही,त्यांची पत्नी यांच्या उपस्थितीत शांताराम साईबाबांच्या फोटोसमोर जे गीत म्हणतो तेच हे माझे आवडते गीत....."एकवार पंखावरूनी फिरो तुझा हात...."

समोर असलेला साईबाबांचा फोटो आणि बसलेली कृष्णा या दोघांना उद्देशून म्हटलेले हे कमालीचे आर्त गीत.....!!!!शायरीत "इष्क-ए-हकिकी" आणि "इष्क-ए-मजाजी "असे दोन प्रकार असतात. एक देवावरचं आणि एक माणसावरचं प्रेम. अशी गाणी असतात की जी दोन्ही प्रकारांना लागू होतात.या गीतातील काव्य  ही  याच प्रकारातील....प्रिया आणि ईश्वर दोहोंना लागू होते. "एकवार पंखावरून" हे वरदक्षिणातलं गीत याच प्रकारातलं आहे. ही माहिती एक स्नेही" श्री अजय पुरोहित "यांनी दिली....या गीताच्या अर्थासंबंधी माझ्या मनात खूप गोंधळ होता,पण या त्यांच्या स्पष्टीकरणाने अर्थ स्पष्ट झाला....तसेच प्रत्यक्ष गदिमांच्या स्नुषा "सौ नीता जी" यांचेही असेच मत पडले.

धरेवरी अवघ्या फिरलो
निळ्या अंतराळी शिरलो
कधी उन्हामध्ये न्हालो कधी चांदण्यात


वने, माळराने, राई
ठायीठायी केले स्‍नेही
तुझ्याविना नव्हते कोणी आत अंतरात

संगीत दिग्दर्शक "वसंत पवार "यांची गीताची सुंदर चाल,"गदिमांचे "अलौकिक शब्द आणि "बाबूजींचे" भावार्थ अधिक स्पष्ट करणारी गायकी यामुळे गीताचे सौंदर्य वाढले आहे....पहिल्या दोन कडव्याची चाल सारखी...हि सुंदर धरा ...जिच्या अंकी कधी उन्हात तर कधी चांदण्यात फिरलो...सुख दुःखाचा लपंडाव अनुभवला....तेव्हा तुझी म्हणजे परमेश्वराची साथ लाभली....सर्व खडतर प्रसंगी तोच पाठीराखा होता.....आता जिच्यावर शांताराम  प्रेम करतात त्या कृष्णामुळेही हे जीवन सुखकर झाले आहे असाही भावार्थ येथे व्यक्त होतो...माझ्या अंत:करणात फक्त तू आणि तूच होतास किंवा होतीस.....(द्व्यर्थी) तिसऱ्या आणि चौथ्या अंतऱ्याची चाल मात्र वेगळी....पक्षी जसा आपल्या धन्याच्या मनगटी विराजमान होतो,तसेच अनेक तरुण तुला आपल्या श्रीमंतीची भुरळ घालतील..आपल्या साखरेसारख्या गोड शब्दात गुंतवितील...पण तुझ्या प्राक्तनी असलेला तरुण खरंच भाग्यवान....!!!!पण माझ्यासारखा गरीब,साधाभोळा तुझ्या नजरेस पडेल का....ईश्वरासहि हे लागू होते....षड रिपुने मलिन झालेल्या माझ्यासारख्या तरुणाला तू स्वीकारशील का....(हे ईश्वरास आणि "आश्रित" असल्याच्या भावनेने मलिन झालेला असा मी हे कृष्णास)कृष्णाच्या कुटुंबाविषयी असलेला आदर,कृतज्ञता नायकाला प्रेम भावना व्यक्त करू देत नाही..त्याचे हे पराकोटीचे प्रेम अबोल आहे....पण खरे आहे....हा प्रेम भाव अत्यंत सोज्वळपणे नायकाने म्हणजेच रमेश देव यांनी व्यक्त केला आहे...या गीतात त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारे सोज्वळ भाव पाहणे हा आनंद होय...

सीमा ताईंनी आपल्या "सुवासिनी"या आत्मचरित्रात वर्णील्या प्रमाणे हा चित्रपट त्यांनी रमेशजी आणि त्यांच्यात अबोला असताना केला आणि हा अबोलाही या गीतांच्या शब्दांनी सुटला..."एकवार पंखावरूनी....." असे गीताचे शब्द रमेशजींनी एका कागदावर लिहिले आणि त्याखाली "आता पुरे भांडण"असे लिहून तो कागद सीमाताईंना दिला आणि त्यांचा अबोला संपला.....आणि खरोखरच त्यांचे आणि सीमाताईंचे रेशमी घरटे साकारले....

हे गीत बाबूजींनी फार सुंदर म्हटले आहे ....नुकत्याच झालेल्या चतुरंग च्या कार्यक्रमात श्री श्रीधर फडके यांनी हे गीत फार सुंदर  म्हटले आणि थोडक्यात त्यातील सौंदर्य स्थळांविषयी सांगितले....श्री वसंत पवार हे खरोखरीच सृजनशील संगीतकार...श्रीधरजींनी या गीतातील वसंत रावांनी केलेली 'त'ची करामत सांगितली...प्रत्येक अंतर्याची शेवटची ओळ "त"वर संपते....या त वरील छोटीशी सुरांची नक्षी नीट गळ्यातून उतरली तर तालाशी जमेल...पहा...

कधी उन्हामध्ये न्हालो कधी चांदण्यात
तुझ्याविना नव्हते कोणी आत अंतरात
तुझ्या मनगटीही बसले कुणी भाग्यवंत
मलिनपणे कैसा येऊ तुझ्या मंदिरात
तेव्हा "त"वरील मुरकी जमणे आवश्यक ,नाहीतर ताल साथ सोडेल....

या गीतात..."मुका बावरा मी भोळा,पडेन का तुझीया डोळा "हि ओळ म्हणताना "भोळा "चा बाबूजींचा उच्चार ऐकण्यासारखा...खर तर "भ"हे ओष्ठय व्यंजन...त्यावर नैसर्गिक आघात येतो ,पण बाबूजींनी या "भ" म्हणताना मृदुतेने म्हटले आहे,त्यामुळे ओळीतील अर्थाची गहनता गडद होते....तसेच पहिल्यांदा हि ओळ सरळ आरोहात वर चढते मात्र दुसऱ्यांदा जेव्हा म्हटली जाते त्यानंतर"पडेन का तुझिया डोळा "हे शब्द जणू माळेतील मोती घरंगळ ल्याप्रमाणे अवतरतात.....फार सुंदर गायकी आणि गीत संगीत...या गीतात आपले मन गुंतते....गीत संपल्यावरही ते मनात रेंगाळते....त्या शांताराम ची भक्ती,अबोल प्रेम मनात ठसते...डोळे भरून येतात....आणि एक अत्युच्य सृजन ऐकल्याचे समाधान मिळते.....मनोमनी हे साकारणाऱ्या दिग्गजांपुढे आपण नतमस्तक होतो.....!!!!

सुप्रसिद्ध लेखक श्री मधू पोतदार यांनाही हि पोस्ट दाखविली केवळ त्यात त्रुटी राहू नये म्हणून.....पोतदारजीनी "वसंत वीणा"हे वसंत देसाई यांचे तर "मानसीचा चित्रकार तो "हे वसंत प्रभू यांचे आणि "वसंत लावण्य "हे वसंत पवार यांचे अशी त्यांचे मोलाचे कार्य  दर्शविणारी पुस्तके लिहिली आहेत...हि पुढील अभ्यासपूर्ण माहिती त्यांनीच दिली....."वरदक्षिणा "चित्रपटाचे हे स्क्रिप्ट पानशेतच्या पुराच्या वेळी गदिमांचे लेखनिक बाळ चितळे यांच्या नदीकाठच्या घरी लाकडी टेबलावर होते. घर पाण्यात होते पण टेबल छताला लागले आणि स्क्रिप्ट (तुकारामाच्या अभंगांप्रमाणे) तरंगून सुरक्षित राहिले .या चित्रपटातील 'घनघन माला नभी दाटल्या 'या गीतात दस्तुरखुद्द संगीतकार वसंत पवार पेटीवर बसलेले दिसतात .....!!!!

अशी अद्भुत गीते आणि त्यांच्या गोष्टी ऐकल्या कि मन थक्क होते.....!!!!!
          श्रीमती  मानसी पटवर्धन...एकवार पंखावरूनी फिरो तुझा हात....