Book Categories


ग्रेस

ग्रेस

माणिक सीताराम गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस यांचा स्मृतीदिन (२६ मार्च,२०१२) हे मराठी कवी होते. मर्ढेकरांच्या नंतर नवकवींच्या दुसऱ्या पिढीतील प्रमुख कवींमध्ये यांची गणना होते. "वाऱ्याने हलते रान" ह्या त्यांच्या ललित लेखसंग्रहासाठी त्यांना २०१२ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला होता. त्यांचे पाच काव्यसंग्रह आणि सात ललित लेखसंग्रह आजवर प्रकाशित झाले आहेत. नागपुरात त्यांचे कुटुंब राहत होते. ग्रेस यांचे प्रारंभीचे जीवन कष्टमय होते. आईच्या अकाली मृत्यूमुळे विस्कळित झालेले घर त्यांना सांभाळावे लागले. नोकरी आणि शिक्षण यांच्याशी त्यांना झगडावे लागले. डॉ. लीला माटे यांच्याशी विवाह झाल्यानंतरही हा संघर्ष सुरूच राहिला. एम.ए. ची परीक्षा जवळ आलेली असताना त्यांना बसचा अपघात झाला. १९६६ मध्ये मराठी विषयातील ना.के. बेहरे सुवर्णपदक जिंकून नागपूर विद्यापीठातून माणिक गोडघाटे एम.ए. झाले. १९६६ ते १९६८ या काळात नागपूरच्या धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये अधिव्याख्याता म्हणून त्यांनी काम केले. १९६८ पासून ते नागपूरच्याचवसंतराव नाईक समाजविज्ञान संस्थेत (मॉरिस कॉलेज) मराठीचे अध्यापन करू लागले. प्राध्यापक म्हणून १९९७ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर २००४ पर्यंत नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात मराठी विभागात व ललित कला विभागात संशोधन मार्गदर्शक म्हणून कार्यरत होते. 'सौंदर्यशास्त्र' या विषयाचे अध्यापनही या विद्यापीठात त्यांनी केले. १९७१ ते १९७६ या काळात दिल्लीच्या भारतीय साहित्य अकादमीच्या मराठी सल्लागार समितीचे ते सदस्य होते. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे १९८२ ते १९८६ या काळात ते सदस्य होते. 'युगवाणी' या विदर्भ साहित्य संघाच्या मुखपत्राचे १९७१ ते १९७४ या काळात ग्रेस यांनी संपादन केले. मुंबईतील 'संदर्भ' या लेखक केंद्राचेही ते काही काळ संपादक होते. १९७५ च्या सालात रामदास भटकळ यांनी रायटर्स सेंटर मुंबई या संस्थेचं 'संदर्भ' हे वाङ्मयीन द्वैमासिक सुरू केले. त्याचे संपादन कवी ग्रेस करत असत. १९५८ पासून माणिक गोडघाटे यांनी काव्यलेखनास प्रारंभ केला. इन्ग्रिड बर्गमन या पाश्चात्य अभिनेत्रीच्या अभिनयाने प्रभावित होऊन गोडघाट्यांनी "ग्रेस" हे साहित्यिक नाव धारण केले. ''दी इन ऑफ द सिक्स्थ हॅपिनेस'' या बोलपटात इन्ग्रिडसंबंधी शी इज इन ग्रेस असे वाक्य येते. हा बोलपट पाहत असताना तिने आपल्याला शीळ घातलेली आहे, असे गोडघाट्यांना वाटले. त्या लहरीने आपल्याला प्रतिभा-रूपाचा पहिला साक्षात्कार इन्ग्रिडमध्ये झाला; तिचे ऋण आठवीत राहण्यासाठी आपण ग्रेस हे नाव धारण केले, असे गोडघाटे यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. वैशिष्ट्यपूर्ण अर्पणपत्रिका आणि स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये काही ओळी छापण्याची पद्धत ह्या दोन खास गोष्टी संध्याकाळच्या कविता ह्या १९६७ साली प्रकाशित केलेल्या आपल्या पहिल्या काव्यसंग्रहात त्यांनी वाचकांना सादर केल्या, आणि ती परंपरा त्यांनी पुढेही चालू ठेवली. "कठीण भाषेत सांगितले तर ते दुर्बोध आणि सोप्या भाषेत सांगितले तर हे काय सांगता, असा लोक प्रश्न करतात पण, माझी जगण्याची एक पद्धत आहे आणि मी आपल्याच प्रकारे जगणार आणि मरणार आहे. वेळेपूर्वी मला मरायचे नाही आणि मेल्यावरही जगायचे आहे. मी जे काव्य करतो ते माझे ‘स्वगत’ आहे, असे समजा. ‘स्वगता’मध्ये भान नसते, बेभान व्हायचे असते. स्वगतामध्ये श्रोता नसतो तर कवी स्वत: निर्माताच असतो. त्यामुळे कुणाची पर्वा करायची नसते. पण हे ही स्पष्ट करतो की, मी ज्ञानाचे सोंग करत नाही आणि अज्ञान मिरवत नाही, ज्ञानर्षीचा अवमान करत नाही. मी शब्दकोषांना नवे शब्द देणारा आहे," असे प्रतिपादन त्यांनी राळेगाव येथील भाषणात केले होते. माझ्या कवितेने मराठीला काय दिले आहे व ती काय देत आहे याचा विचार मला स्वतःला करण्याचे अजिबात कारण नाही, असे ग्रेस यांनी 'दुर्बोधतेची बेसरबिंदी' या ललितलेखात म्हटलेले आहे. दुर्बोध गणल्या गेलेल्या/गाजलेल्या कविता १. असे रंग आणि ढगांच्या किनारी २. अज्ञेयाहून गूढ गूढ दिसती झाडातली वर्तुळे ३. आठवण ४. ओळख ५. ओळखीच्या वार्‍या तुझे घर कुठे सांग? ६. ऊर्मिलेचा सर्पखेळ’ ७. कंठात दिशांचे हार ८. कर्णभूल ९. कर्णधून १०. क्षितिज जसे दिसते११. ग्रेसची वृत्ती. १२. घर थकलेले संन्यासी १३. घनकंप मयूरा १४. जे सोसत नाही असले १५. डहाळी १६. तुळशीतले बिल्वदल १७. ती गेली तेव्हा रिमझिम१८. तुला पाहिले मी नदीच्या किनारी १९. .तांबे-सोन्याची नांदी २०. तुझी बहार मंदशी तृषार्त जाग ये जरी २१. तुझ्यात नभवाहिनी कुठून रक्त गंधावले २२. देखना कबीर२३. देवी २४. दुःख घराला आले २५. दु:ख २६. निनाद २७. निरोप२८. प्रणाली. प्रकाशित साहित्य ओल्या वेळूची बासरी--कावळे उडाले स्वामी--चंद्रमाधवीचे प्रदेश चर्चबेल--मितवा--मृगजळाचे बांधकाम--राजपुत्र आणि डार्लिंग वार्‍याने हलते रान--संध्याकाळच्या कविता--संध्यामग्न पुरुषाची लक्षणे सांजभयाच्या साजणी--सांध्यपर्वातील वैष्णवी चित्रपट निवडुंग (१९८९) या जब्बार पटेल दिग्दर्शित चित्रपटात 'वार्‍याने हलते रान' ही ग्रेस यांची रचना गीतबद्ध झालेली आहे. मालिका दूरदर्शनवरून प्रसारित झालेल्या 'महाश्वेता' या मालिकेत ग्रेस यांच्या 'निष्पर्ण तरूंची राई' (चंद्रमाधवीचे प्रदेश) या कवितेचा शीर्षकगीत म्हणून (भय इथले संपत नाही) वापर करण्यात आला. कवी ग्रेस हे २०१२ साली झालेल्या दुसर्‍या ई-साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. कर्करोगाशी सुमारे तीन वर्षे लढा दिल्यानंतर अखेर वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी २६ मार्च २०१२ रोजी पुण्यात त्यांचे निधन झाले. कवी ग्रेस यांना विनम्र अभिवादन . प्रसाद जोग.सांगली. ९४२२०४११५०