'महाराष्ट्र गीत' लिहिणार्या श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचे शिष्योत्तम राम गणेश गडकरी यांनी महाराष्ट्राला 'राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा' म्हंटले आहे. कोकण आणि घाटमाथ्यावरील अवघड जीवन तसेच देशातीलही नगर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर सारख्या अवर्षण ग्रस्त भागामुळे हातातोंडची गाठ पडण्याची भ्रांत असलेल्या लोकांना विलासी जीवन सुचणे शक्य नव्हते.
बाबरने मोगल साम्राज्याची स्थापना केल्यानंतर मोगलांचे विलासी षौक जहंगिरच्या काळात जवळ जवळ सर्व उत्तर भारताला परिचित झाले होते. महाराष्ट्राला मात्र त्याची कल्पना नव्हती. पहिल्या बाजीरावाने नर्मदा ओलांडून माळवा, बुंदेलखंड, राजस्थान, दिल्लीपर्यन्त मजल मारल्यानंतर संपन्नता, श्रीमंती ऐषाराम आणि विलासी जीवनाची महाराष्ट्राला जाणीव झाली. पेशवाईतल्या विलासी जीवनावर प्रकाश टाकणारे डॉ. वर्षा शिरगावकरांचे पुस्तक अभ्यासपूर्ण असल्याचे पानोपानी जाणवते. नुसती संदर्भसूची वाचली आणि पानोपानी दिलेल्या तळटीपा पहिल्या तर ते विशेषत्वाने जाणवते.
विलासी जीवन म्हटले की अय्याशी, षौक (विशेषत: आंबटषौक) हे सारे आलेच. अर्थात त्यातले सर्वात महत्त्वाचे विवाहबाह्य संबंधातील अनिर्बंध वर्तन ओघानेच येते. नाटकशाळा आणि कुणबिणी या प्रकरणात त्याचा वेध घेतला आहे. तसे पाहिले
तर अगदी ययाति, शंतनू यांच्या पुराणकालीन कथांपासून विषयलोलूपता पदोपदी आढळते. पण सातशे नाटकशाळा बाळगणाऱ्या सवाई माधवराव आणि बारा तेरा लग्नाने जणू समाधान झाले नाही म्हणून आपल्या सरदारांच्या स्त्रियांशी संबंध
ठेवणारे दुसरा बाजीरावासारखा पेशवा असल्यानंतर पेशवाई व पर्यायाने मराठी सत्ता विलयाला गेल्याचे आश्र्चर्य वाटत नाही.
आजकालच्या हाय सोसायटीतले विवाह समारंभ किंवा त्यासारख्या सोहळ्यांमध्ये अनुत्पादक खर्चाबद्दल आपण सारे जाणतो. पेशवे काळातल्या सणासमारंभात याचे प्रत्यंतर दिसून येते. मग तो गणेशोत्सव असो वा होळी असो. मिरवायला, आपले वैभवाचे ओंगळवाणे प्रदर्शन करायला काही सीमा नव्हती.
मनोरंजनाचे प्रकार तर किती अश्र्लाध्य होते याचे प्रत्ययकारी वर्णन एका प्रकरणात विस्ताराने केले आहे. एकेकाळचे शाहीर आणि पोवाडे याचे युग संपून तमाशा आणि लावण्या यांचेच प्रस्थ माजले. अर्थात त्याकाळीही होनाजी सारखे ‘घन:श्याम सुंदरा श्रीधरा’ लिहिणारे आणि शाहीर रामजोशी यांच्यासारखे ‘नरजन्मामध्ये नरा करून घे’ सारखे लिहिणारे होतेच. परंतु एकूण ग्राम्य वातावरण होते. ‘यथा राजा तथा प्रजा’ हेच खरे.
शेवटच्या प्रकरणात ब्रिटीश राजवट आल्यानंतर झालेल्या बदलातही आपण पाश्र्चात्यांचे वैज्ञानिक दृष्टिकोन वा इतर चांगले गुण न घेता सोयिस्करपणे मद्य, नृत्ये, क्लब हेच स्वीकारले याचे छान चित्रण केले आहे. अगदी राजा राममोहन रॉय यांच्यासकट सुधारणावाद्यांचेही मर्यादित मद्यप्राशन वगैरेवर प्रकाश टाकला आहे. त्यातल्या त्यात आनंदाची गोष्ट म्हणजे आपण शेक्सपियरकडे वळलो. म्हणजे तमाशा-लावणी ते हॅम्लेट-सॉनेट असा प्रवास निदान प्रतिष्ठित समाजात तरी झाला.
एकूणच हे एक पुस्तक पेशवाईचा अस्त का झाला हे समजण्याला पुरेसे आहे आणि हे यश काही कमी नाही. बाकी कॉन्टिनेन्टलच्या लौकिकाला साजेल असेच प्रकाशन झाले आहे एवढे म्हटले की पुरे!
-सुधाकर चिंचोलकर
मोबा. ८८८८४२४२७०