Book Categories


शिवाजीराव सावंत

शिवाजीराव सावंत

युगंधर साहित्यिक आणि राजा माणूस

- प्रा. मिलिंद जोशी

भारतीय साहित्यविश्‍वात आपल्या लेखनकर्तृत्वाची ठसठशीत नाममुद्रा उमटवून श्रेष्ठ कादंबरीकार असा नावलौकिक प्राप्त केलेले मृत्युंजयकार शिवाजी सावंत हे मराठी सारस्वताचे भूषण आहे.‘मृत्युंजय’कार हा शब्द उच्चारताच डोळ्यासमोर उभे राहतात ते पाच फूट नऊ इंच उंचीचे, छिप्पाड शरीरयष्टीचे, कधी जाकीट, कधी कोट घालणारे,कपाळावर अष्टगंध लावणारे, डोक्यावर मिलिटरी बॅरेट कॅप घालणारे, नाकावर किंचित खाली आलेला चष्मा आणि डोळे यांच्या फटीतून स्वत:च्या कडक भेदक नजरेने समोरच्याचा बेध घेणारे शिवाजीराव सावंत. रसिकजन आणि साहित्यिक वर्तुळात सर्वजण त्यांचा ’राजे’ असा उल्लेख करायचे.

हिरण्यकेशी आणि चित्रा नद्यांच्या संगमावर वसलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा या निसर्गसंपन्न गावात एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात शिवाजीराव जन्मले आणि वाढले. त्यांच्या ऐतिहासिक आणि पौराणिक आवडीचा बीजांकुर त्यांच्या मातोश्री राधाबाई यांनी संस्कारातून रूजवला. लहानपणापासून त्यांना खेळाची, अभ्यासाची आणि व्यायामाची आवड होती. पुढे अखिल भारतीय पातळीवरील उत्कृष्ट कबड्डी खेळाडू म्हणून ते गाजले. आजर्‍याच्या व्यंकटराव प्रशालेतून माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते कोल्हापूरला आले. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांनी नोकरी करीत शिकावे म्हणून शॉर्टहॅण्ड आणि टंकलेखनाचा डिप्लोमा पूर्ण केला. त्यांना कोल्हापूरच्या जिल्हा सत्र न्यायालयात नोकरी मिळाली, पण तिथे ते रमले नाहीत. विद्यार्थ्यांशी नाते जोडावे, लेखक व्हावे असे त्यांना वाटत होते. तसा योगही आला. कोल्हापूरच्या राजाराम प्रशालेत ते शिक्षक म्हणून रूजू झाले.
या कालावधीत बाहेरून अभ्यास करून पुणे विद्यापीठाची एफ्.वाय्. बी.ए.ची परीक्षा देत असताना हिंदीतील प्रसिध्द कवी केदारनाथ मिश्र यांचे ‘कर्ण’ हे खंडकाव्य त्यांच्या वाचनात आले आणि त्याने ते प्रभावित झाले. परंतु तत्पूर्वी इयत्ता नववीत शिकत असताना शिवाजीरावांनी आणि त्यांच्या मित्रांनी शि. म. परांजपे लिखित ‘अंगराज कर्ण’ ही एकांकिका स्नेहसंमेलनासाठी बसवली होती. राजबिंडे रूप आणि स्पष्ट शब्दोच्चार यामुळे श्रीकृष्णाची भूमिका शिवाजीरावांना मिळाली. पण श्रीकृष्णापेक्षाही कर्णाचे संवाद त्यांना अस्वस्थ आणि अंतर्मुख करीत होते. कारण ते तर्कशुध्द आणि सडेतोड होते. रथचक्र उध्दरणाच्या वेळी कर्णाने उच्चारलेले प्रत्येक वाक्य त्यांच्या अंत:करणात बाणाप्रमाणे रूतले आणि ‘कर्ण’ हा त्यांच्या चिंतनाचा विषय होऊन ‘मृत्युंजय’ या अजरामर कादंबरीचे बीज त्यांच्या मनात रूजले. त्यांचे ‘कर्ण’ या विषयावरचे वाचन सुरूच होते. करवीर नगर वाचन मंदिर आणि गोखले कॉलेजच्या लायब्ररीत ते तासन्तास बसत होते. त्यांच्या वाचनात, मनात आणि चिंतनात फक्त कर्ण आणि कर्णच होता.

1963 साली त्यांनी प्रत्यक्ष लेखनाला प्रारंभ केला. त्यांचा पिंड लेखकाचा असला तरी वृत्ती संशोधकाची होती. त्यामुळे प्रत्येक गोष्ट, घटना यांचे वैज्ञानिक पध्दतीने पृथक्करण केल्याशिवाय त्यांची प्रतिभा शब्दांवर स्वार होत नव्हती. ‘फुली मारणे’ हा एक त्यांचा आवडता शब्दप्रयोग. याचा अर्थ असा की, त्या कालखंडात ती व्यक्तिरेखा झालीच नाही अशी फुली एकदा मारली की, त्या व्यक्तिरेखेकडे अधिक त्रयस्थपणे आणि तटस्थपणे पाहून अभ्यास करता येतो. त्यामुळे शब्दांच्या फुलोर्‍यात आणि कल्पनेच्या विश्‍वात न रमता कादंबरी अधिक वास्तववादी व्हावी म्हणून त्यांनी कुरूक्षेत्राचा प्रवास करायचे ठरवले. पण प्रश्‍न होता तो शाळेतून रजा मिळण्याचा आणि पैशाचा.
कोल्हापूरच्या सरकारी दवाखान्याचे डॉक्टर पाथरकर यांना शिवाजीरावांनी आपली अडचण सांगितली. त्यांनी शिवाजीरावांना ‘आजारी पाडले’. त्यांना दोन महिन्याची रजा मंजूर झाली. करवीरवासियांनी त्यांना आठ दिवसात अठराशे रूपये जमा करून दिले. त्यातला पहिला सव्वाशे रूपयांचा चेक होता तो चित्रतपस्वी भालजी पेंढारकरांचा. कोल्हापूरहून मुंबईला आल्यानंतर त्यांनी मधुकरराव चौधरी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, प्रबोधनकार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटी घेतल्या. दिल्लीतील वास्तव्यासाठी त्यांच्याकडून पत्रे घेतली. प्रत्यक्ष कुरूक्षेत्रावर शिवाजीरावांनी एक महिना मुक्काम केला. गीता हायस्कूलचे मुख्याध्यापक विश्‍वनाथ बाबू भल्ला यांनी त्यांना आपल्या घरी ठेवून घेतले. तिथल्या मुक्कामात शिवाजीरावांनी उपलब्ध संदर्भ तपासले. डोळस पर्यटन केले. जाणत्या लोकांच्या मुलाखती घेतल्या.

तिथून परत आल्यानंतर त्यांनी तीन महिन्यात पंधराशे पानांचे हस्तलिखित लिहून पूर्ण केले. अनेक प्रकाशकांच्या भेटी घेतल्या. या नवोदित लेखकाची ‘मृत्युंजय’ ही महाकादंबरी प्रकाशित करण्यासाठी महाराष्ट्रातील एकही प्रकाशक त्यावेळी तयार नव्हता. शिवाजीराव पुण्यात येऊन ग.दि. माडगूळकरांना भेटले. त्यांनी ती कादंबरी वाचून कॉन्टिनेन्टल प्रकाशनाचे अनंतराव कुलकर्णी यांना या कादंबरीच्या प्रकाशनासंदर्भात फोनवरून सांगितले. अनंतरावांनी गदिमांच्या सांगण्यानुसार कादंबरी वाचली आणि प्रकाशित करण्याचे ठरविले. गदिमांच्या हस्ते घरगुती पूजनानंतर ‘मृत्युंजय’ ही कादंबरी प्रकाशित झाली. पुढे जगन्मान्यता, अफाट लोकप्रियता आणि खपाचे सर्व विक्रम या कादंबरीने मोडले. वयाच्या 23व्या वर्षी शिवाजी सावंतांनी ही कादंबरी लिहीली. ती प्रकाशित झाली तेव्हा ते सत्तावीस वर्षाचे होते. पहिल्या तीन महिन्यात तीन हजारांची आवृत्ती संपली. इतक्या लहान वयात एवढी मोठी झेप घेणार्‍या या लेखकाने आपल्या ‘शिवाजी’ या नावाला साजेसे कर्तृत्व करून दाखविले. 4 ऑगस्ट, 1968 रोजी आचार्य अत्र्यांनी ‘मराठा’ मध्ये अग्रलेख लिहून या नव्या कादंबरीकाराचे तोंडभरून कौतुक केले आणि शिवाजी सावंतांना ‘मृत्युंजय’कार अशी उपाधीही दिली. ‘अनंत विदग्ध भावनाकल्लोळांनी मृत्युंजय ही कादंबरी वाचकांचे मन ढवळून काढते’, अशा शब्दात आचार्य अत्र्यांनी या कादंबरीचा गौरव केला.4 फेब्रुवारी 1968 च्या दै. केसरीमध्ये डॉ. पु.ग. सहस्त्रबुद्धे यांनी ‘महाभारताचे महातेज आत्मसात केलेली साहित्यकृती’ असा शीर्षकाचा समीक्षा लेख लिहिला. ‘महाभारताचे तेज सूर्याइतकेच प्रखर आहे, जसे सूर्याच्या जवळपास जाणे कठीण आहे तसेच या ग्रंथाच्या जवळपास जाणे अशक्य आहे, सावंतांनी मात्र हे धाडस केले. ही कादंबरी वाचत असताना माझे मन आनंदाने भारावून गेले ते या प्रचितीने. काही उत्कट भव्य पाहत असल्याचे समाधान मला मिळाले’ अशा शब्दात त्यांनी मृत्युंजयचा गौरव केला. मृत्युंजय या कादंबरीला अनेक मानाच्या पुरस्कारासह भारतीय ज्ञानपीठाचा मूर्तीदेवी पुरस्कार मिळाला. नोबेल पुरस्कारासाठी कलकत्त्याहून 1990 साली मराठीतील पहिले नामांकन ‘मृत्युंजय’ला मिळाले. हिंदी, इंग्लिश, कन्नड, गुजराती, उडिया, मल्याळम्, बंगाली, तेलगु, राजस्थानी इ. दहा भाषांत ‘मृत्युंजय’ अनुवादित झाली आहे. आजही ही कादंबरी खपाचे विक्रम करीत आहे.

शिवाजीरावांच्या लेखणीला वर्ज्य असे काहीच नव्हते तरीही त्यांची लेखणी भव्यतेच्या, दिव्यत्वाच्या दर्शनाने भारावून जात होती. जिथे जिथे संघर्ष आहे, नाट्य आहे, उपेक्षा आहे अशा व्यक्तिमत्वाबद्दल शिवाजीरावांना कुतूहल होते. कादंबरी कशी लिहावी याची शिस्त त्यांनी स्वत:ला लावून घेतली होती. जे काही सांगायचे ते विस्तृत,सविस्तर अशीच त्यांची रीत होती. त्यामुळे त्यांनी त्रोटक, आटोपशीर असे काही लिहिले नाही. मानवी इतिहासातील महापुरूषांच्या सामर्थ्यांचा आणि मर्यादांचा वेध घेण्याची क्षमता या चितंनशील साहित्यिकामध्ये होती.

समकालीन जीवनाची रूपे साहित्यातून मांडताना लेखकाला आव्हानाला तोंड द्यावे लागत नाही असे नाही. परंतु तेथे त्याला आजूबाजूच्या परिसराचा सामाजिक रूप-रस-गंध-ध्वनी यांचा आधार लाभलेला असतो. अशा वेळी वाचकांच्या कल्पनाशक्तीला जागृत करून त्यांना झुलवत ठेवण्याचे आव्हान तुलनेने सोपे असते. पण जो काळ लेखकाने आणि वाचकाने दोघांनीही पाहिलेला नाही, अनुभवलेला नाही. पण जो पूर्वसुरींच्या अभिजात साहित्यकृतीतून आणि इतिहासाच्या पानापानातून धुक्याचे अनेक पदर लपेटून उभा आहे, तो विश्‍वसनीयरित्या वाचकांसमोर उभा करणे हे मोठे आव्हान असते. ते सावंतांनी समर्थपणे पेलले म्हणूनच ते ‘युगंधर साहित्यिक’ ठरतात.
लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या आणि वाचकांच्या मनावर अधिराज्य करणार्‍या या साहित्यिकाकडे दुर्लक्ष करण्याचे काम मराठी समीक्षकांनी केले. त्यात सावंतांचे काहीच नुकसान झाले नाही. करंटेपणा आणि कूपमंडूक वृत्ती दिसली ती समीक्षा क्षेत्राची. कोतेपणा दिसला तो ठोकळेबाज समीक्षा दृष्टिकोनाचा. साहित्यातील नवतेचा पुरस्कार करणार्‍या, साहित्यातील नवतेच्या दबावाखाली वावरणार्‍या तथाकथित विचारवंतांना आणि लेखकांना आपली माती आणि जीवनमूल्ये यातून प्रेरणा घेणारे सावंतांचे लेखन आपले वाटले नाही ही दुर्देवी वस्तुस्थिती आहे. लोकप्रियता हे कोणत्याही साहित्यकृतीच्या श्रेष्ठतेचे गमक ठरत नसते, ही वस्तुस्थिती असली तरी लोकप्रिय कलाकृतींची केवळ उपेक्षाच करणेही योग्य नाही. वास्तविक पाहता ‘मृत्युंजय’ सारख्या साहित्यकृती समीक्षकांच्या चिंतनाला आव्हान देणार्‍या असतात. त्यांचा विचार करताना साहित्यकृतीच्या श्रेष्ठतेचे नवे निकषही सापडू शकतात. पण असे घडले नाही. वाचक रसिकांनी मात्र या कादंबरीवर भरभरून प्रेम केले. त्यांचे चाहते जगभर विखुरले आहेत. ते सर्व वयोगटातले आहेत. आजही या कादंबरीच्या आवृत्त्यावर आवृत्त्या निघत आहे

मी शिवाजीरावांना अनेकदा विचारत असे ‘‘तुम्हाला महाभारताचे जेवढे आकर्षण वाटते तेवढे रामायणाचे का वाटत नाही?’’ त्यावर शिवाजीराव सांगत, ‘रामायण जीवन कसं असावं हे सांगते. महाराभारत जीवन कसं आहे हे सांगते’. ’महाभारत म्हणजे मानवी जीवनाचा आरसा, शतके लोटली पण या आरशावर धूळ कशी साठली नाही. तडे कसे गेले नाही. यांच्यासाठी मानवी जीवनाच्या अशा कोणत्या पार्‍याचा लेप वापरला आहे, की जो टवकाभरही उडून जात नाही.’

कर्ण आणि द्रौपदी यांच्यात काही भावनिक आकर्षण होते का? या प्रश्‍नावर ते उत्तर देत,‘कर्ण हा सूर्यपुत्र. द्रौपदी ही अग्नीतून उत्पन्न झालेली. त्यांच्यातले आकर्षण शारीरिक नव्हते, तेजाला तेजाचे असणारे ते आकर्षण होते.’ या सार्‍यावरून त्यांच्या विचारांची उंची आणि चिंतनाची खोली लक्षात येत असे. शिवाजीरावांचा उल्लेख ऐतिहासिक आणि पौराणिक कादंबरीकार म्हणून केला जातो. परंतु त्यांची लेखणी पुराण, इतिहास आणि वर्तमान अशा तीनही काळांना स्पर्श करणारी होती. अशा या थोर साहित्यिकाने मृत्युंजय, छावा, युगंधरसारख्या महाकादंबर्‍यांचे लेखन करून मराठी साहित्यशारदेचा दरबार श्रीमंत केला आहे.या राजा माणसाची आणि माझी पहिली भेट झाली ती बार्शीतल्या एका व्याख्यानमालेत. 'कर्ण' या विषयावर त्यांचे व्याख्यान होते. त्या व्याख्यानात श्रीकृष्णाच्या महानिर्वाणाचा विषय आला होता. ते व्याख्यान संपल्यानंतर चड्डी, शर्ट घातलेला मी शाळकरी मुलगा शिवाजीरावांच्या जवळ गेलो, त्यांच्या पाया पडलो आणि म्हणालो, "कृष्ण इतका पराक्रमी, कालियाला मारून टाकणारा, कंसाला मारून टाकणारा आणि तो बाणाने कसा काय मरतो? "माझ्या प्रश्नासरशी त्यांनी त्यांची ती करारी नजर माझ्यावर रोखली. मला जवळ बोलावले. एक हात धरून त्यांच्याकडे पाठ करायला लावली आणि पाठीत एक जोरदार धपाटा घातला आणि म्हणाले, "प्रश्न छान विचारलास. पण थोडा मोठा झालास, की उत्तर देईन." आजपर्यंत मी अनेक लेखकांना भेटलो होतो पण असा धपाटा वगैरे खाण्याचा अनुभव कधी आला नव्हता. त्याच दिवशी मी त्यांच्या अक्षरशः प्रेमात पडलो.

त्याला कारणीभूत म्हणजे एखादा मिलिटरीमधला माणूस शोभावा असे त्यांचे राजबिंडे व्यक्तिमत्त्व. माझे शिक्षक कवी सुरेश पाठक यांनी शिवाजीरावांना 'मिलिंद हा माझा विद्यार्थी आहे' असा परिचय करून दिला. शिवाजीरावांचे आमच्या बार्शीवर आणि बार्शीतल्या माणसांवर विलक्षण प्रेम. मराठवाड्यात कुठेही त्यांचा दौरा असला, की त्यांचा बार्शीत मुक्काम होणारच. त्या वेळी एखादा कार्यक्रमही व्हायचा. जाणत्या वयात मी शिवाजीरावांना सविस्तर अशी पत्रे लिहिली होती. त्याची सविस्तर उत्तरे त्यांनी पाठविली होती. मी कराडला शिकत असताना शिवाजीरावांचा कार्यक्रम सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत कुठेही असला तरी कॉलेज बुडवून जायचो. त्यांना भेटायचो. अनेकदा परतीच्या प्रवासात ते मला कराडला सोडून पुढे जात. त्यातून स्नेहबंध दृढ होत गेले. नोकरीसाठी मी पुण्यात आलो. सुरुवातीला बांधकाम व्यवसायात नोकरीला होतो. त्या वेळी फोनवरून किंवा फारतर एखाद्या समारंभात त्यांची भेट व्हायची. मी प्राध्यापकी स्वीकारली आणि शिवाजीरावांशी असणारा माझा संपर्क वाढू लागला. त्यांच्या घरी जो अखंड दरबार भरलेला असायचा, त्यातला मी एक सदस्य असायचो. सावंतांच्या महाकादंबऱ्या आपल्या कौतुकाचा आणि आकर्षणाचा विषय होतात. त्यांचे जीवनही असेच विलक्षण आणि अद्भुत.

कोल्हापूरच्या रांगड्या मातीत वाढलेल्या आणि माणुसकीच्या, प्रेमाच्या ओलाव्याने गहिवरणाऱ्या या असामान्य प्रतिभावंताचे वेगवेगळे. भाव त्या त्या क्षणी आदी लख्ख दिसायचे. शिवाजीरावांना एकांत कधीच मानबला नाही. सतत माणसे सभोवती असावीत असा त्यांचा आग्रह असायचा, त्यांच्या घरी तर अक्षरश: दरबार भरलेला असायचा. आरामखुर्चीत एका हाताच्या तळव्यावर दुसऱ्या हाताचा तळवा ठेवून शिवाजीराव बसलेले असायचे आणि सभोवती माणसेच माणसे! शिवाजीराव पुण्यातल्या किंवा बाहेरगावच्या कार्यक्रमाला कधीही एकटे गेले नाहीत, चार-पाच लोकांचा फौजफाटा कायम त्यांच्याबरोबर असायचा, मग साहित्य, राजकारण, समाजकारणापर्यंतचे अनेक विषय चर्चेला यायचे, यात इतरांना बोलते करत त्यांची भूमिका या परिसंवादाचा आस्वाद घेणाऱ्या निखळ श्रोत्याची असायची, पुण्याहून आम्ही कार्यक्रमासाठी बाहेर निघालो, की गाडी हमखास सारसबागेवरून घेतली जायची, तिथे मोगऱ्याच्या फुलांचे गजरे ते विकत घ्यायचे, एक गाडीत, एक ड्रायव्हरला, तसेच बरोबरच्या लोकांना गजरे दिल्यानंतर स्वत: च्या पांढऱ्या शुभ्र रुमालात एक गजरा ठेवून, शिवाजीराव त्याचा मंद सुगंध घेत राहायचे शिवाजीरावांची राहणी नेहमीच टापटिपीची असायची. त्यांच्या डोक्यावरची ती मिलिटरी बॅरेट कॅप म्हणजे त्यांची खास ओळख होती. प्रवासात आमची गाडी एखाद्या पोलिसाने अडवली तर जवळ आल्यानंतर शिवाजीरावांचा तो पेहराव पाहून हा कुणीतरी मिलिटरीतला माणूस आहे. असे समजून तो सॅल्युट ठोकायचा, शिवाजीराव नंतर मनमुराद हसायचे. परफ्यूम्सचा त्यांना भारी शौक होता, कुठेही व्यवस्थेतली कुचराई या मानी माणसाला अजिबात सहन व्हायची नाही, महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावी त्यांची मनोभावे सेवा करणारा एखादा खास माणूस असायचाच. मग शिवाजीराव ज्या हटिलात उतरतील, तिथल्या वेटरपासून ते मालकापर्यंत सर्वांशी एक मैत्रीचे नाते निर्माण करायचे. त्यामुळे त्यांचा चाहतावर्ग हा पुण्या-मुंबईपुरता मर्यादित नबता, तर तो महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात होता.

७६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कराड येथे होणार असे जाहीर झाले. शिवाजीरावांनी उभे राहावे असा आमचा आग्रह होता. त्यांचे पुण्यातून दोन अर्ज भरले गेले. सूचक-अनुमोदक म्हणून प्रा. द. मा. मिरासदार, ना. सं. इनामदार, ग. प्र. प्रधान, कॉन्टिनेन्टलचे अनिरुद्ध कुलकर्णी यांच्या स्वाक्षऱ्या होत्या. शिवाजी सावंत, सुभाष भेंडे आणि जवाहर मुथा हे तीन उमेदवार रिंगणात होते. या काळात माझे कॉलेज संपले, की दुपारी पाच वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत मी शिवाजीरावांकडे असे. मी आलो, की भडंग-चहाचा कार्यक्रम व्हायचा. पत्रे पाठविणे, फोन लावून देणे अशी कामे असायची. या कालावधीत' माझा प्रवक्ता' अशी शिवाजीरावांनी माझी सर्वांना ओळख करून दिली.

मी शिवाजीरावांबरोबर फिरू लागलो. औरंगाबादचा दौरा छान झाला. प्रकाशक अनिल कुलकर्णी आणि कवी सुरेश पाठक बरोबर होते. गोव्याला जाण्याचे नियोजन आम्ही करीत होतो. माझी पत्नी मनीषा हिच्या हातचे धपाटे, भुरका, पिठले, भाकरी, दही आणि फोडणीचा भात हे पदार्थ शिवाजीरावांना खूप आवडत. आदल्या दिवशी ते फोन करून तिला पदार्थ बनवायला सांगत, पुणे सोडले, की दोन तासांनी आम्ही एखाद्या झाडाखाली थांबून या पदार्थावर ताव मारायचो. कविता, जोगवा, देवीची गाणी, भारुडे, नकला अशा गोष्टी ते मला ऐकवायला आणि करायला लावायचे. शिवाजीरावांचा थाट राजेशाही असायचा. एखाद्या धाब्यावर आम्ही जेवायला थांबलो तर तिथला मालक मृत्युंजयप्रेमी निघायचा. तो सगळ्या गोष्टी खूप प्रेमाने करायचा. एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर एखादा वेटर सारखं विचारायचा, "और क्या लाऊ साब!" त्यावर शिवाजीराव म्हणायचे, "कुछ भी लाव, लेकिन बिल मत लाव!

शिवाजीरावांच्या औषधांची माहिती मला असल्यामुळे आणि न थकता सेवा करण्याची सवय असल्यामुळे मी नेहमीच त्यांचा रूमपार्टनर असायचो. त्यांच्या बॅगा उघडणे, कपडे बाहेर काढणे, नको असलेले कपडे आत ठेवणे, त्यांचा इन्शर्ट करून देणे, औषधे काढून देणे, झोपताना पाठीला मालीश करून मलम लावून देणे, पाय दाबून देणे, आंघोळीला पाणी काढून देणे अशी असंख्य कामे न थकता करावी लागत. त्यांना मध्येच जाग आली तर उठून गप्पा मारणे हेही एक काम असायचे. हॉटेलमध्ये उतरल्या उतरल्या त्या रूममध्ये बरोबर आणलेली उदबत्ती लावणे हा एक कार्यक्रम असायचा. त्यातली कुचराई त्यांना अजिबात सहन व्हायची नाही. प्रसंगी चिडायचेही, कधी गमतीने म्हणायचे, "एवढी सेवा तू आई - वडिलांची केलीस तर तुला विमान येण्याइतकं पुण्य मिळेल. "पापपुण्याच्या कल्पना मी मानत नाही, पण त्यांच्या सहवासात मला प्रचंड आनंद मिळायचा. गाढ झोपेत त्यांचा तो दांडगा हात कपाळावरून फिरतोय असे जाणवायचे. मला जाग यायची. शिवाजीराव एवढेच म्हणायचे, "किती करतोस?"

१४ सप्टेंबरला आम्ही पुण्याहून गोव्याला जाण्यासाठी निघालो बरोबर सावंतांचे मित्र जयराम देसाई आणि पत्रकार सागर देशपांडे होते. तेव्हा एक घोंघावणारे वादळ आपला पाठलाग करतय याची आम्हाला जाणीव नव्हती. आजरा या त्यांच्या जन्मगावी आमचा मुक्काम त्यांच्या घरी होता. पहाटे पाच वाजताच शिवाजीरावांनी मला उठवले. पक्ष्याच्या सुंदर किलबिलाट सुरू होता. प्रसन्न होऊन शिवाजीराव म्हणाले, "हे खरे विश्वाचं गीत आहे.” दोन डोंगराच्या मधून केशरी छटा येऊन सूर्यबिंब वर येत होते. शिवाजीरावांनी डोळे बंद करून नमस्कार केला, तो तेजाने तेजाला केलेला नमस्कार होता. शिवाजीराव निरवानिरवीची भाषा करीत होते. त्यांनी आजऱ्यात जिथे आनंदाचे क्षण घालवले, त्या प्रत्येक स्थळी मला तिथले संदर्भ ते आवर्जून सांगात होते. गोव्याहून परतताना आजऱ्याहून यायचे ठरले होते. मी शिवाजीरावांना म्हणालो, "येताना राहिलेल्या गोष्ट दाखवा. त्यावर ते म्हणाले, “येतानाचे कुणी पाहिलंय!” माझ्या काळजात चर्रर्र झालं.

आजरा ते गोवा हा प्रवास म्हणजे आनंदसोहळा होता. एक तर निसर्गाचा मनमोहक बहर आणि त्याच्या जोडीला शिवाजीरावाचे मार्मिक भाष्य, माजी मंत्री रमाकांत खलपांच्या घरी जेवण करून आम्ही मडगावला उद्योगपती जॉन ऑलेक्स फर्नांडिस यांच्या घरी मुक्कामाला आलो. रात्री अनेक साहित्यिक शिवाजीरावांना भेटण्यासाठी आले होते. १८ सप्टेंबरचा काळाकुट्ट दिवस उजाडला. शिवाजीराव आंघोळ करून आले आणि त्यांना दम लागला. जॉन ऑलेक्स यांनी ताबडतोब डॉक्टरांना घरी बोलावले. डॉक्टरांनी इ. सी. जी. काढला ताबडतोब दवाख्यान्यात दाखल होण्याचा सल्ला दिला दवाखान्यात नेताना खुर्चीत बसवून आम्ही त्यांना उचलून अम्ब्युलन्सपर्यंत आणले. त्यांचे हात नमस्कारासाठी जोडले होते. “माझ्या पाठीवर शाल द्याल,” असे त्यांनी मला सांगितले. मुखातून 'जगदम्ब जगदम्ब' असा घोष सुरु होता. दवाखान्यात दाखल झाल्यानंतर त्यांनी गळयातली रुद्राक्षाची माळ, हातातल्या अंगठ्या, लॉकेट पैसे माझ्या ताब्यात दिले. त्याच दिवशी पत्रकार परिषद असल्याने आम्ही पत्रकारांशी बातचीत करावी, असा शिवाजीरावांचा आग्रह सुरू होता, आमचा काही केल्या दवाखान्यातून पाय निघत नव्हता. मी त्यांचा हात हातात घेऊन म्हणालो, "राजे तुमच्या जिवापेक्षा काहीही महत्त्वाचं नाही. "पण त्यांनी पत्रकार परिषदेसाठी जाण्याची आज्ञा केली. जड अंत: करणाने निघालो. "श्रीकृष्ण आपल्या पाठीशी आहे," असेच ते म्हणत होते.

प्रेस कॉन्फरन्ससाठी पणजीकडे निघालो. पाचच मिनिटांत मोबाईल वाजला. 'शिवाजीराव गेले. ताबडतोब निघा' असा डॉक्टरांचा निरोप होता. त्याच वेळी दुसऱ्या मोबाईलवर वहिनी पुण्याहून शिवाजीरावांच्या तब्येतीची चौकशी करीत होत्या. काळजाचा ठोका चुकला. दवाखान्यात आलो. भावनांना वाट मोकळी करून दिली. पाचच मिनिटांपूर्वी माझा हात हातात घेऊन माझ्याशी बोलणारे शिवाजीराव काळाच्या पडद्याआड गेले होते. दुःख करायला वेळच नव्हता. बॅगा उघडून नर्सेसच्या मदतीने त्यांचे कपडे बदलले. त्यांची ती मिलिटरी कॅप त्यांच्या डोक्यावर चढवली. हा माणूस आयुष्यभर राजेशाही थाटात जगला. त्याच रुबाबात तो जातानाही चाहत्यांसमोर यायला हवा एवढीच भूमिका होती. सर्व औपचारिकता पूर्ण करून त्यांचे शव घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. त्यांच्या आजरा गावावर अक्षरशः शोककळा पसरली होती. अॅम्ब्युलन्समध्ये हारांचे ढीग साठत होते. "शिवाजीराव अमर रहे' असा जयजयकार होत होता. माध्यमातल्या मंडळींचे फोन येत होते. महाराष्ट्रभर ही दुःखद वार्ता गेली होती. पुणे ते गोवा या प्रवासात गाव आले, की लोक अंत्यदर्शनासाठी येत होते. पहाटे साडेपाच वाजता आम्ही पुण्यात पोहोचलो. एरवी परगावचा कार्यक्रम करून आलो, की आम्ही त्यांच्या बॅगा घरात नेऊन ठेवायचो आणि वहिनींना म्हणायचो, “आम्ही राजांना सुखरूप आणलं बरं का?" या वेळी मात्र शिवाजीरावांचा निष्प्राण, अचेतन देह आम्ही त्यांच्यापुढे आणून ठेवला. वयाची आणि मोठेपणाची कसलीही तमा न बाळगता समोरच्या माणसांशी एकरूप होणारा हा युगंधर साहित्यिक युगंधर श्रीकृष्णाच्या आत्मरूपाशी एकरूप झाला होता. आमचा आधारवड कोसळला होता.

काही दिवसांनी प्राचार्य शिवाजीराव भोसलेंचे पत्र आले. त्यात त्यांनी लिहिले होते, "आप्तस्वकीयांना जरबेत ठेवणारा हा उग्रगंभीर पुरुष प्रथमदर्शनी सर्वांना भयचकित करायचा पण थोड्याच वेळात बैठकीत स्नेहकस्तुरीचा गंध दरवळू लागायचा आणि माणसे त्यांच्या पायी खुळी व्हायची. देहाने घरात, मनाने कुरुक्षेत्रात आणि कल्पनेने श्रीकृष्णाच्या सहवासात वावरणारा हा माणूस थोरल्या महाराजांच्या दरबारात कधी दाखल व्हायचा ते समजायचं नाही. आरंभी कुंतीपुत्राची कथा, मग शिवपुत्राची व्यथा आणि शेवटी श्रीकृष्णाची गीता असे त्यांचे साहित्यभारत विस्तारत गेले. शिवाजीराव साहित्यरूपात अजूनही या जगात आहेत. तुम्हांला सहवास लाभला, सेवा घडली हे परमभाग्य. आजरा या गावाने आजवर सुगंधी तांदूळ आणि वजनदार व गोड गऱ्यांनी भरलेले फणस महाराष्ट्राला पुरविले, पण शिवाजीराव सावंत ही भेट देऊन त्यांनी महाराष्ट्रलक्ष्मीस अलंकृत केले. धन्य ते गाव आणि गावकरी! आपल्या या भूमीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी परत आलेले शिवाजीराव आजऱ्याला एखाद्या पाळण्यात असतील, गावकऱ्यांनी लक्ष ठेवावे.' पत्र वाचताना डोळे भरून आले.