Book Categories


मे महिना ब्लॉग

मे महिना ब्लॉग

मे महिना म्हणजे अगदी मौजमजेचाच महिना!! छोट्यांचाच नाही तर मोठ्यांचाही!! नुकतंच मार्च एंडिंग झालेलं असतं, परीक्षा संपलेल्या असतात. कैरीची आंबट चव जिभेवर रेंगाळत असते. आंब्याची वाट पाहत कैरीचे पदार्थ लोकं खात असतात. पालकांच्या चर्चा चाललेल्या असतात या वेळेस कोणत्या थंड हवेच्या ठिकाणी जायचं. त्यासंबंधीच्या बुकिंगसंबधी फोनाफोनी चालू झालेली असते. त्यातच आप्तस्वकीयांच्या लग्न-मुंजीमधेही लोक आनंदाने सहभागीही होत असतात. उन्हाळी कपड्यांचे सेल लागलेले असतात. लग्नबस्त्याची गडबड उडालेली असते. महिलावर्ग खरेदीसाठी उन्हाची तमा न बाळगता अत्यंत उत्साहानं दुकानं हिंडत असतात. असा सगळा मे महिन्याचा एक माहोल असतो. मुलांना तर काय रानच मोकळं झालेलं असतं!! परीक्षा संपल्यामुळं कोणत्या तरी शिबिरात जा, पोहायचा क्लास लावा, हिमालयात कँपला जा, मित्रमैत्रिणींबरोबर धुडगुस घाला, सिनेमे पाहा, आइस्क्रीम पार्ट्या करा असा भरगच्च कार्यक्रम मुलांचा मे महिना सुरू व्हायच्या आधीच ठरलेला असतो. यामध्ये वाचन ही गोष्ट मात्र नेमकी कुठं बसते, हे मात्र कळत नाही. एखाद्या सुजाण पालकाने मुलांना काही चांगली पुस्तकं वाचायला दिली तर त्यांची प्रतिक्रिया काय असते, हे तुम्हाला मुद्दामहून सांगायची गरज नाही, आपल्यापैकी प्रत्येकाला याचा वेगवेगळा अनुभव आहेच.

नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनातही काही भरीव हाताला लागलेलं दिसत नाही, नेहमीप्रमाणेच!! अनेक गोष्टींची चर्चा त्यात घडली, नेहमीचे रुसवे-फुगवेही झाले; पण जे उद्याचे लेखक होणारेत त्यांच्या बाबतीत काही विचार केला गेला का? या प्रश्नांची उत्तरं आपली आपणच द्यायची असतात, तशी आपण देऊ यात. नुसतं मुलं हल्ली वाचत नाहीत अशी ओरड केली जाते. पण शिक्षक, पालक यांनी मुलांना वाचनाची गोडी लावावी लागते. पुस्तकांची दुनियाही किती मोहमयी आहे हे दाखवून द्यावं लागतं. केवळ व्हिडिओ गेम्स, सिनेमे यांमधूनच मनोरंजन होतं असं नाही. सध्या तर काय मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळे आंतरजालाच्या (इंटरनेट)च्या जाळ्यात अडकलेले आहेत. नव्या पुस्तकाचा वास किती सुंदर असतो, नवी कोरी पानं हाताळण्यात काय मजा येते, प्रत्येक पुस्तकाला स्वत:चं असं व्यक्तिमत्त्व असतं. पुस्तकाच्या पानापानातून लेखक आपल्याशी बोलत असतो. पुस्तकं चाळली तरच या गोष्टी समजतात. पुस्तकं चाळण्यातदेखील काय गंमत असते, हे मुलांना आपण सांगायला हवं. वाचनातली गंमत तर पुढं आहे आणि ती आपली आपण घ्यायची असते. या साऱ्या गोष्टी मुलांना आपण अनुभवून द्यायच्या असतात.

आमच्या कॉन्टिनेन्टलनी मात्र मुलांना आकर्षित करतील अशा बहुसंख्य विषयांवरची पुस्तकं प्रकाशित केली आहेत. करियर मार्गदर्शन करणारी अवर करियर डायरीज, सॉफ्ट स्किल्स शिकवणारी पुस्तकं काढली आहेत. तसंच फुटबॉलवरचं पुस्तक आहे, जंगल सफर घडवणारी पुस्तकं आहेत. मिल्खासिंग, सचिन तेंडुलकरवरची पुस्तक आहेत. मुलांना आपल्या प्रांतातील संतांची ओळख करून देणारी, राष्ट्रसंतांच्या कथा सांगणारी पुस्तकं आहेत. मुलांना यशाची गमकं सांगणारी प्रतिकूलतेतून यशाकडे, यशस्वी जीवनसूत्रे यांसारखी पुस्तकं आहेत. अभ्यास कसा करावा सांगणारी पुस्तकं आहेत. विज्ञानासंबंधीची दृष्टी घडवणारी पुस्तकं आहेत. जुन्या लेखकांपैकी नाथमाधव, महादेवशास्त्री जोशी यांच्या कथा-कादंबऱ्या आहेत, की ज्यातून त्या त्या काळचा समाज मुलांना समजतो. ऐतिहासिक, पौराणिक व्यक्ती यांच्यावरच्या शिवाजी सावंत, ना. . इनामदारांनी लिहिलेल्या कादंबऱ्या आहेत. आम्ही त्या पुनर्मुद्रित करतो आहोत. जेणेकरून जुन्या साहित्यातील चांगले साहित्य पुढच्या पिढीला समजावं. तसंच संदीप खरे सारख्या मुलामाणसांमध्ये लोकप्रिय असलेल्या कवीचीही काही पुस्तकं आमच्याकडे आहेत.

एकंदर मुलांना आवडतील असे बरेचसे विषय आम्ही हाताळले आहेत. अगदी पिटुकल्यांपासून ते कॉलेजियन्सपर्यंतच्या मुलांसाठीची पुस्तकं आम्ही काढली आहेत. केवळ संस्कारच नव्हे तर मनोरंजन करण्याचंही काम कॉन्टिनेन्टलनं केलं आहे. सुट्टीत वाचता येतील अशी छान छान गोष्टींची पुस्तकंही आमच्याकडे आहेत. मग काय मुलांनो येणार ना आमच्याकडे? आईबाबांना सांगा की, आम्हाला पुस्तकं हवी आहेत. मग बघा आईबाबांची रिॲक्शन काय होते ते!!

चला तर मग लवकर!! आम्ही वाट बघतोय तुमची!! 

-डॉ. अंजली जोशी