Book Categories


द्वारकाविनाश - सुधाकर चिंचोलकर

द्वारकाविनाश -  सुधाकर चिंचोलकर

कॉन्टिनेन्टलने प्रकाशित केलेले श्री. अनंत मनोहरांचे ‘द्वारकाविनाश’ हे एका वेगळ्या दृष्टिकोनातून लिहिलेले पुस्तक ठरणार आहे. महाभारत या महाकाव्याने अनेकांना लिहिण्यास प्रवृत्त केले आहे. अनंत मनोहरांचे ‘द्वारकाविनाश’ नेहमीच्या पठडीतील पुस्तक नाही हे प्रथम सांगितले पाहिजे.

त्यांचा मुख्य महत्त्वाचा विचार म्हणजे कुठल्याही साम्राज्याच्या विनाशाचा इतिहास सारखाच असतो. मग ते रोमन साम्राज्य असो, ग्रीक साम्राज्य असो वा बायझंटाईन असो. अगदी इंका, ॲझटेक आणि मायन साम्राज्याचा इतिहासही तसाच आहे.

यादवांचा विनाश हा गांधारीच्या शापाचा परिणाम आहे असे सर्वसाधारणपणे मानले जाते. मात्र या पुस्तकात तो विनाश अटळच होता कारण कर्तबगार, तरुण रक्ताला वाव नव्हता. पराक्रमाची महत्वाकांक्षा आणि भव्य दिव्य स्वप्नांची जागा भोग, विलास, व्यसने, अंतर्गत हेवेदावे यांनी घेतली. पेशवाईचा इतिहास तरी काय वेगळा आहे? बाळाजी विश्र्वनाथ आणि थोरले बाजीराव कोठे आणि दुसरे बाजीराव आणि सवाई माधवराव कोठे!

आपले मुद्दे मांडतांना अनंत मनोहरांनी गेल्या शे दिडशे वर्षांतल्या घटनांची नोंद घेतली आहे. उदहारणार्थ क्रान्ति आपल्या पिल्लांना खाते हे रशियन राज्यक्रान्ती किंवा फ्रेंच राज्यक्रान्तीनंतरचे प्रसिद्ध विधान आहे. समुद्रावरील चाचेगिरीचा इतिहास त्यात येतो. मग तो द्वारका आणि कोचिनमधला व्यापार असो किंवा इराण (पर्शिया) इजिप्तमधला व्यापार असो. युरोपचा सर्वात जुना इतिहास तर नॉर्वे स्वीडनमधील चाचेगिरी (व्हायकिंग्ज) करणाऱ्या जमातीचाच आहे.

सुदाम्याला द्वारकेला जातांना चोराचिलटांचे, लुटारूंचे वर्णन कदाचित कुणाला रुचणार नाही. परंतु वाटमारी रामायणकालातही दंडकारण्य आणि दक्षिणेकडे होतच होती हे सर्वज्ञात आहे. त्याचा संशयाचा फायदा अनंत मनोहरांना द्यायला हवा.

‘द्वारका विनाश’ मधील वैद्य, वैश्य, भिक्षुक हे येऊ घातलेल्या कलियुगाचे पूर्वचिन्ह आहे. महाभारतीय युद्ध हे ‘युगान्त’ होते हे सर्वज्ञात आहे. उत्तम मुखपृष्ठ, सुरेख कागद, दर्जेदार टाईप आणि मांडणी हे कॉन्टिनेन्टलचे वैशिष्ट्य कायम आहेच, त्याबद्दल वेगळे काय लिहावे.

- सुधाकर चिंचोलकर