संदीप खरे

Sandeep Khare

सुप्रसिद्ध मराठी कवी आणि गीतकार, गायक आणि अभिनेते म्हणूनही प्रसिद्ध आहेत. ‘दमलेल्या बाबाची कहाणीया मराठी चित्रपटात संदीप यांनी प्रमुख भूमिका केली आहे. आयुष्यावर बोलू काही आणि इर्शाद हे त्यांचे कवितांवरील कार्यक्रम. अत्यंत लोकप्रिय आहेत. आयुष्यावर बोलू काही हा कार्यक्रम सलील कुलकर्णी यांच्याबरोबरीने ते सादर करतात. तरुणांना कविता या वाङ्‌मयप्रकाराची गोडी लावणारा हा कार्यक्रम अजूनही अतिशय लोकप्रिय आहे. इर्शाद हा कवितांचा कार्यक्रम वैभव जोशी यांच्याबरोबर संदीप सादर करतात. याचेही अजून कार्यक्रम होत आहेत.

पुण्यगौरव पुरस्कार, झी गौरव पुरस्कार, आद्यकवी मुकुंदराज पुरस्कार, कै. बालगंधर्व पुरस्कार, विशेष व्यावसायिक गुणवत्ता रोटरी पुरस्कार आणि काव्यदीप पुरस्कार असे विविध पुरस्कार संदीप खरे यांना मिळाले आहेत.

कॉन्टिनेन्टल परिवारातील महत्त्वाचे कवी संदीप खरे यांच्या कॉन्टिनेन्टल प्रकाशित पुस्तकांची ओळख रसिकवाचकांना करून देत आहोत.

असेन जरी मी सर्वांनी सोडलेला!

असेनही जरी सांप्रतकाळी मोडलेला!

परंतु इतुके निश्चित मजला ठाव की

मी इथला-पण नक्षत्रांशी जोडलेला!!

अशा मनाला भिडणाऱ्या अनेक कविता संदीप खरे यांच्या चारही कवितासंग्रहातून रसिकांना वाचायला मिळतील. मराठी रसिकवाचकांचा लाडका कवी संदीप खरे कॉन्टिनेन्टल परिवाराचा भाग आहे याचा आम्हाला अभिमान आहे.

 

 

अग्गोबाई ढग्गोबाई

बालकवितासंग्रह म्हणून महाराष्ट्रातल्या बाळगोपाळांच्या मनी रुजलेला संग्रह. सहज म्हणून गुणगुणता येतील अशा कविता या संग्रहात आहेत. अग्गोबाई ढग्गोबाई ही कविता तर अगदी शालेय विविध कार्यक्रमांमधून आवर्जून गायली जाते. हा कवितासंग्रह वाचणं आणि पाहणं दोन्ही आकर्षक आहे. यातली चित्रं पाहणं हाही मुलांच्या आवडीचा भाग आहे. प्रस्तुत कवितासंग्रह अभ्यासक्रमासाठी नियुक्त केला आहे.

 

तुझ्यावरच्या कविता

Tuzyavarchya Kavita

कवीच्या मनातल्या विविध आविष्कारांची रूपं या संग्रहात दिसतात. मात्र हा आविष्कार स्त्री रूप घेऊन येताना दिसतो. कारण तो सर्जनशील आहे. सृजन म्हणजे स्त्रीत्व. मग हे सृजन प्रतिभेच्या स्वरूपातून, सखीच्या स्वरूपातून या संग्रहातल्या कवितांमधून व्यक्त झाले आहे. भावनेतला एक धुंदपणा या संग्रहातल्या काही कवितांमधून जाणवतो.

 

नेणिवेची अक्षरे

Nenivechi Akshare

कवी नेहमी स्वत:शी संवाद करत असतो. त्या संवादातून त्याच्या मनातली कविता बाहेर येते. कवीचं नेणिवेचं क्षेत्र अमर्याद असतं. त्यातल्या भावभावना व्यक्त करणं ही त्या कवीची कवी म्हणून गरज असते. अशा पद्धतीच्या कविता संदीप खरे यांच्या ‘नेणिवेची अक्षरे’ या संग्रहात आहेत. कविता या वाङ्मयप्रकाराची गोडी असणाऱ्या रसिकाला या कविता अधिक भावतात.

 

मौनाची भाषांतरे

Maunachi Bhashantare

मेघ नसताः वीज नसता सारख्या सुंदर कविता हे या संग्रहाचं वैशिष्ट्य आहे. कवीच्या मनात चाललेल्या भावभावनांची भाषांतरं होऊन जणू काही त्यातल्या कविता आल्या नाहीत. या कवितासंग्रहाला ब्लर्ब नाही हे अगदी सयुक्तिक आहे कारण ब्लर्बमधून पुस्तकाविषयीची कल्पना वाचकांना येते. पण संदीप यांचा ‘मौनाची भाषांतरे’ हा संग्रह अनुभवण्याचा संग्रह आहे. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो त्यामुळे संग्रहाबाबतचं स्वत:चं जाणवणं हे भिन्न असणार. म्हणूनच कवितासंग्रहाचं मलपृष्ठ कोरं आहे याला हा अर्थ आहे.

 

आरसपानी

Aarashpani

स्वत:च्या शब्दांशी आयुष्यभर प्रामाणिक असणारे, पारदर्शी दृष्टीनं जीवनाकडे पाहणारे सुप्रसिद्ध कवी आणि गीतकार सुधीर मोघे यांच्या निवडक कवितांचं संपादन संदीप खरे यांनी ‘आरसपानी या पुस्तकाद्वारे केलं आहे. संदीप खरे यांनी निवडलेल्या कविता या वाचकश्रोत्यांच्या मनात ठसलेल्या आहेत. पुनर्वाचनाचा आनंद देणारं हे संपादन आहे. एका तरुण कवीनं मागच्या पिढीतील ज्येष्ठ श्रेष्ठ कवीला दिलेली ही मानवंदनाच आहे.