शिवरायांच्या मावळ्यांना प्रकाशात आणणारा इतिहास अभ्यासक : डॉ. सचिन पोवार (शिरोळे)

Shivchatrapatinche Shiledar


‘‘जय भवानी जय शिवाजी’’ हि स्टार प्रवाह या वाहिनीवर प्रक्षेपित होणारी मालिका चांगलीच लोकप्रिय होत आहे. आजवर छत्रपती शिवरायांच्या चरित्रावर बऱ्याच मालिका चित्रपट बनवले गेले. पण छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांचा इतिहास कथन करणारी हि पहिलीच मालिका या मालिकेतील ऐतिहासिक माहितीचा मुख्य स्रोत आहे डॉ. सचिन पोवार लिखित ‘‘शिवछत्रपतींचे शिलेदार’’ हे पुस्तक. आजवर महाराष्ट्रातील मान्यवर साहित्यकारानी आणि इतिहासकारानी शिवरायांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्यावर विपुल अशी साहित्यसंपदा निर्माण केली. पण शिवरायांच्या खांद्याला खांदा भिडवून रणांगणी अतीव शौर्याने लढणाऱ्या त्यांच्या मावळ्यांचा जीवनपट मात्र यापूर्वी विस्ताराने कुणी रेखाटला नव्हता. शिवरायांच्या मावल्यांचा संपूर्ण जीवनपट अगदी विस्ताराने सहसंदर्भ रेखाटण्याचा प्रथम मान जातो तो कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले नगरीचे इतिहास अभ्यासक डॉ. सचिन पोवार यांना. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या पोवार सरांनी २००५ साली मावळ्यांच्यावरील संशोधनाला प्रारंभ केला. तब्बल ७ वर्षांच्या अथक परिश्रमानंतर साकार झाले ‘‘शिवछत्रपतींचे शिलेदार’’ हे त्यांचे पुस्तक. सदर पुस्तकात शिवरायांच्या २७ मावळ्यांचा जीवनपट त्यांनी अगदी विस्ताराने मांडला आहे. कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या या पुस्तकात शिवरायांच्या मावळ्यांची मूळ नावे, गावे, त्यांची कूळ पुरुष, शिवरायांच्या चाकरीत ते कसे दाखल झाले? आपणास ज्ञात असलेल्या कामगिरीशिवाय हिंदवी स्वराज्यासाठी त्यांनी कोणकोणत्या कामगिऱ्या बजावल्या? त्यांचा मृत्यू नेमका कधी व कसा झाला इत्यादि विषयी विपुल माहिती सहसंदर्भ वाचावयास मिळते. याशिवाय सरसेनापती नेताजी पालकर यांनी मुस्लीम धर्माचा स्वीकार केला होता का? फिरंगोजींना राजांनी तोफेच्या तोंडी दिले होते का? सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी अवघ्या सहा शिलेदारानिशी बहलोल खानच्या अजस्र फौजेवर का हल्ला केला? या व यासारख्या इतिहास पुरुषांनी अनुत्तरीत ठेवलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे डॉक्टरांनी सदरच्या पुस्तकात दिलेली आहे. शिवरायाच्या मावळ्यांचा खरा इतिहास सहसंदर्भ जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा ‘‘शिवछत्रपतींचे शिलेदार’’ हे पुस्तक.

- गौरव जाधव

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

व्यक्तिरंग – डॉ. कुमार सप्तर्षी

महत्त्वाचे आणि वेधक

Vyaktirang

‘कॉन्टिनेन्टल प्रकाशन’ने ‘व्यक्तिरंग’ हे डॉ. कुमार सप्तर्षी यांचे नुकतेच प्रसिद्ध केलेले पुस्तक आवडले. ते महत्त्वाचे आणि वेधक आहे. महत्त्वाचे एवढ्यासाठी की महाराष्ट्राचे शासन सांभाळणाऱ्या वसंतदादा पाटील, शरद पवार अशा चार मुख्यमंत्र्यांविषयी त्यांनी लिहिले आहे. त्यांना जवळून पाहून त्यांच्या व्यक्तित्वाविषरी आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांविषयी ते लिहितात.

जय प्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, एस्‌. एम. जोशी यांच्यासारख्या व्यक्तींनी भारतीय समाजमानसाचा अभ्यास केला होता. त्यांनी भारतीय समाजजीवनाची नव्या समतावादी जाणिवांतून जडणघडण करण्याचा प्रयत्न केला. या विषयी ते पुस्तकात मोकळेपणाने बोलतात. या थोर व्यक्तींनी त्यांच्या स्वत:च्या जीवनाला कसे वळण लावले याबद्दलही ते सांगतात.

एकवीस व्यक्तींविषयी त्यांनी लिहिले आहे. काही राजकीय सामाजिक जीवन घडवणाऱ्या. काही रूढ अर्थाने सामान्य वाटल्या तरी मोठे आदर्श उराशी बाळगून जगणाऱ्या. माणूसपणाची प्रतिष्ठा जपणारे आणि शोषितांबद्दल कळवळा बाळगणारे डॉ. सप्तर्षी यांचे व्यक्तिमत्त्वही झळाळून उभे राहाते. वाङ्मयीन, सामाजिक – दोन्ही दृष्टींनी महत्त्वाचे असे हे लेखन.

स्वत:चे जीवन बदलण्यासाठी बिहारमधून महाराष्ट्रात आलेला आणि नंतर कोमेजलेला सुखदेव मनाला चटका लावून जातो. जांबुवंतराव धोटे हा अवलिया अफलातून. जॉर्ज फर्नांडिस यांचे एका वेगळ्या प्रकाशात दर्शन घडते.

डॉ. सप्तर्षी ‘सत्याग्रही’ या वैचारिक मासिकाचे संपादक म्हणून अग्रलेख लिहितात. त्यात विचारसरणी, राजकीय गुंतागुंती आणि महत्त्वाच्या घडामोडी असतात. तरीही तो वेधक असतो. व्यक्तिचित्रांचे त्यांचे पुस्तक वेधक बनले तर त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. हे पुस्तक वाचकांना आवडेल आणि त्यांची सामाजिक राजकीय जाणीव समृद्ध करेल.

 

-    डॉ. अंजली सोमण

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

`भैरप्पा साहित्य: मराठी समीक्षा’ - संपादन: उमा कुलकर्णी.

Bhairappa

पुस्तकं वाचून जगता येत नाही’ हे जितकं खरं आहे तितकंच ‘पुस्तकांवाचून जगता येत नाही’ हेही खरं आहे. आपल्या इवल्याश्या आयुष्यात किती आणि कोणती पुस्तकं वाचायची हा एक मोठाच प्रश्न असतो. निव्वळ मातृभाषा अवगत असल्याने वाचनाचा परीघ आक्रसत असला तरीही अनुवादित पुस्तकांमुळे इतर भाषांमधील पुस्तकांची ओळखही विनासायास घडू शकते. म्हणजे पुन्हा किती अन् काय वाचायचं हा प्रश्न शिल्लक उरतोच. मात्र यावर उपाय सापडतो तोही पुस्तकांमुळेच!

 

डॉ. एस. एल. भैरप्पा ह्यांच्या कादंबर्‍यांच्या मोठ्या आकारमानामुळे त्या वाचण्याइतका सलग वेळ काढता येणं अवघड आहे हे लक्षात आल्यानंतर चुटपुट वाटत राहिली, की आता कधी बरं वाचायचं त्यांचं साहित्य? हे पुस्तक प्रकाशित झाल्याचं समजलं आणि हायसं वाटलं. त्यांचं आत्मचरित्र वाचल्यानंतर वाटत होतं की किमान त्यांच्या साहित्याची तोंडओळख तरी व्हावी ही इच्छा ह्या पुस्तकाने, 'भैरप्पा साहित्य: मराठी समीक्षा’, पूर्ण झाली.

 

भैरप्पा यांचं लेखन मुख्यत्त्वेकरून कादंबरी स्वरूपातील आहे, तसंच त्यांनी आत्मचरित्रही लिहिलं आहे. ह्यापैकी निम्म्याहून अधिक कादंबर्‍या आणि आत्मचरित्र अनुवाद-रूपाने मराठी भाषेत उपलब्ध झाली आहेत. ह्या सगळ्या पुस्तकांविषयीच्या मराठी समीक्षा-लेखांच्या पुस्तकाची पहिली आवृत्ती १ डिसेंबर २०१७ रोजी कॉन्टिनेन्टल प्रकाशनने काढली असून रु.२००/- किंमतीच्या, १९९ पृष्ठांच्या पुस्तकाला डॉ. द. दि. पुंडे यांनी प्रस्तावना लिहिली आहे.

 

कन्नड साहित्यात डॉ. एस. एल. भैरप्पा ह्यांच्या कादंबर्‍या लोकप्रिय आहेत. त्याचं एक उदाहरण म्हणजे ‘अष्टावधानी’ ह्या बौध्दिक खेळाचा डॉ. आर. गणेश यांनी केलेला प्रयोग आणि सुमारे दीडहजार भैरप्पा-प्रेमींची ह्या खेळाला असणारी उपस्थिती! ह्या लोकप्रियतेचं प्रमुख कारण म्हणजे त्यांच्या साहित्यातील ‘भारतीयत्व’ असावं असं संपादक उमा कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.

ह्या पुस्तकात काय काय आहे?

-- भैरप्पांचं आत्मचरित्र आणि कादंबर्‍यांवर लिहिलेले एकूण १५ लेख,

-- अखिल भारतीय कन्नड साहित्यसंमेलनातील भैरप्पांच्या भाषणाचा संक्षिप्त अंश,

-- भैरप्पांची मुलाखत,  --लेखिका-संपादिका उमा कुलकर्णींचा तसेच ह्या पुस्तकात लेख लिहिणार्‍या लेखकांचा परिचय.

 

माझं नाव भैरप्पा’ (आत्मचरित्र), ‘धर्मश्री’, ‘वंशवृक्ष’ (२), ‘पारखा’ (२), ‘परिशोध’, ‘पर्व’, ‘जा ओलांडुनी’, ‘तंतू’, ‘काठ’, ‘मंद्र’ (२), ‘आवरण’, ‘तडा’ ह्या पुस्तकांचे  लेख साहित्याच्या निरनिराळ्या अभ्यासकांनी आणि मानसशास्त्रज्ञ असलेल्या मुंबईच्या डॉ. अंजली जोशी यांनी लिहिले आहेत.

एखाद्या साहित्यिकाचा मानसशास्त्राच्या अभ्यासकाने आत्मचरित्राच्या सहाय्याने केलेला अभ्यास मी तरी पहिल्यांदाच बघितला-वाचला-आवडला.

 

ह्या सर्व लेखांपैकी मला सर्वांत जास्त आवडलेले लेख -

पर्व’बद्दल डॉ. अरूणा ढेरेंचा लेख आणि ‘धर्मश्री’बद्दल पुण्याच्या डॉ. अंजली जोशी यांचा.

 

भैरप्पा यांच्या साहित्यावर मराठी स्नातकोत्तर अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांना अशा एकत्रित लेखनाची गरज भासते’ ह्या संपादक उमा कुलकर्णींच्या अनुभवातून पुस्तकरूपाने हे सगळे लेख एकत्रितपणे उपलब्ध झाले आहेत. त्याचप्रमाणे ज्यांनी आजवर भैरप्पा वाचलेले नाहीत अशा माझ्यासारख्या वाचकांना भारतीय साहित्यातील एका महत्त्वाच्या लेखकाच्या साहित्याचा परिचय करून घेण्यासाठीदेखील हे पुस्तक नक्कीच उपयोगी आहे.

 

-चित्रा राजेन्द्र जोशी.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

भारुडाचे गारुड

Bharudatil Garud

समाजाला नैतिकता शिकवण्यासाठी संत मंडळींनी अनेक मार्ग अवलंबिले. शिकवण रुक्ष असेल तर ती लवकर पोचत नाही. ती रंजक असेल तर स्वीकारले जाण्याची शक्यता वाढते याची जाणीव भागवत संप्रदायातील सर्व संतांना होती. ही शिकवण पोचवण्यासाठी जे वेगवेगळे मार्ग वापरले गेले त्यातील एक लोकप्रिय मार्ग म्हणजे भारुड. या प्रकारात एक वेगळी नाट्यमयता असल्यामुळे हा प्रकार विशेषत्वाने लोकप्रिय झाला. भारुड शब्दाच्या अनेक व्युत्पत्या सांगितल्या जातात. बहुरूढ म्हणून भारुड, भारडी समाज गातो म्हणून भारुड ते भारुंड नावाच्या त्द्विमुखी पक्षाप्रमाणे आतून दोन अर्थ निघतात म्हणून ते भारुड अशी वेगवेगळी शाब्दिक समर्थने दिली जातात.श्री संत एकनाथ महाराजांनी हा प्रकार महाराष्ट्रात घरोघरी लिहिला. त्यांचे” विंचू चावला” हे भारुड ऐकले नाही अशी व्यक्ती सापडणे अवघड.कालौघात हा प्रकार विस्मृतीत जाऊ लागला होता. त्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी इंडियन नॅशनल थिएटर व कैलासवासी अशोकजी परांजपे यांनी विशेष प्रयत्न केले. या पुनरुज्जीवनाचा एक धागा आपल्या पंढरपुरात निर्माण झाला वाढला व राष्ट्रपती भवनापर्यंत पोचला. भारुडाचा बुरगुंडा वाढवणारी ही माऊली म्हणजे आपल्या चंदाबाई तिवाडी. बुरगुंडा हा कैकाडी भाषेतला शब्द आहे. मुलगा हा त्याचा लौकिक अर्थ तर ज्ञान हा अध्यात्मिक अर्थ.भारुडाच्या लोकप्रियतेवर ती आरुढ होऊन पंढरपुरातील एका मनस्विनीचा सोलापुरातील नगरेश्वर मंदिरा शेजारी असलेल्या याचम वाड्यात सुरू झालेला प्रवास संगीत नाटक अकादमी पुरस्कार व राष्ट्रपती भवन या पर्यंत कसा जाऊन पोहोचला त्याचा आलेख पवन कुमार झंवर या उदयन्मुख लेखकाने” भारूडातील वादळ चंदा ताई….” या आपल्या पुस्तकाद्वारे मांडला आहे. पुण्यातील ख्यातकीर्त कॉन्टिनेन्टल प्रकाशनाने नुकतेच पंढरपुरातील एका कार्यक्रमात या पुस्तकाचे प्रकाशन केले.
मारवाडी समाज हा तसा थोडासा कर्मठ व परंपरानिष्ठ आहे. या समाजात जन्म होऊन, फारसे लौकिक शिक्षण झाले नसतानाही चौकस बुद्धी, लोकांकडून ऐकून घेण्याची व शिकण्याची तयारी व ज्ञानलालसा याच्या जोरावर चंदाताई तिवाडी यांचा हा प्रवास झाला. या पुस्तकाच्या निमित्ताने भारुड या लोककलेच्या एका काहीशा दुर्लक्षित प्रकाराकडे पुन्हा एकदा लोकांचे लक्ष वेधले जात आहे हे चांगलेच आहे.चंदाताई म्हणजे भारुड असे समीकरण गेल्या काही वर्षात रूढ झाले आहे. परंतु भारुड अभ्यासाबरोबरच चंदा बाईंना पुरुष प्रधान संस्कृती, रूढी ग्रस्त समाज, समाजातील आर्थिक विषमता यांनाही कसे तोंड द्यावे लागले त्याचा आलेख ही या पुस्तकातून आपल्याला वाचायला मिळतो आणि हा प्रवास किती खडतर होता हे जाणवते. गृहनिर्माण व रोजगार निर्मिती हे आजच्या काळातील दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत. चंदा बाईंनी या दोन प्रश्नांकडे कसे पाहिले. त्यावर काहीतरी तोडगा काढण्याचे एकविरा टेलरिंग फर्म व इंदिरा गृहनिर्माण संस्था यांच्या माध्यमातून काय प्रयत्न केले. त्यांच्या या खारीच्या प्रयत्नांना अडथळा आणण्याचे तथाकथित प्रस्थापितांनी कसे प्रयत्न केले ,चंदा ताईंनी चिकाटी व अफाट लोकसंग्रह यांच्या बळावर हे प्रयत्न कसे मोडून पाडले, हा सर्व इतिहास मुळातून वाचण्यासारखा आहे.लेखक पवन कुमार जवळ यांनी चंदाताईंचा स्थायीभाव असलेला त्यांचा उत्स्फूर्तपणा विविध प्रसंगातून व्यवस्थित दाखवला आहे. त्यांचे हे दुसरे पुस्तक. पहिले पुस्तक अमेरिकेच्या प्रवास वर्णनावर होते. आता दुसरे पुस्तक हे या चंद्रभागेचा प्रवास रेखाटणारे आहे. साध्या प्रवासवर्णनापेक्षा व्यक्तीचा प्रवास रेखाटणे हे तसे आव्हानात्मक. परंतु चंदा ताईंची प्रदीर्घ चर्चा करून अनेक संदर्भ गोळा करत पवननी ही वाटचाल सर्व वळणांसह व्यवस्थित दाखवली आहे. या पुस्तकात एडवोकेट डॉक्टर नारायणराव बडवे यांचा चंदाबाईंचे भारुडातील गुरु म्हणून उल्लेख आला आहे .त्यांनी चंदाबाईना भारूडाचे कसे व काय शिक्षण दिले त्याबद्दल थोडे विस्ताराने यायला हवे होते. पुस्तकात मुद्रितशोधनाच्या काही ढोबळ चुका ही झाल्या आहेत. त्या टाळता आल्या असत्या.
चंदाबाई व पवन नी मिळून भारुडाचा बुरगुंडा आपल्यासमोर उकलताना साठ-सत्तर वर्षांपूर्वीचा पंढरपुरातील काळ आपल्यासमोर उभा केला आहे. या पुस्तकाला डॉक्टर रामचंद्र देखणे व डॉक्टर ताराबाई भवाळकर यांचे लिखित पुरस्कारही लाभले आहेत. श्री आनंद जाजू यांनी पुस्तकाचे देखणे मुखपृष्ठ तयार केले आहे. लोक कलाप्रेमी, स्त्री चळवळीशी संबंधित कार्यकर्ते , वारकरी संप्रदाय व अर्थातच सर्वसामान्य रसिक या सर्वांनी आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे.

डॉ अनिल जोशी
९४२२६४७२८३
jaysss12@gmail.com ३०/०६/२०२१ .
“भारूडातील वादळ चंदाताई….”
लेखक: सीए पवनकुमार झंवर
प्रकाशक: कॉन्टिनेन्टल प्रकाशन पुणे

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शिवराज गोर्ले यांच्या 'सर्वस्व' या पुस्तकाविषयी वाचकांच्या प्रतिक्रिया 

Shivraj Gorle

Shivraj Gorle

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मनस्विनी :  एक निर्मळ कादंबरी

Manaswini

अगदी सोप्या सुलभ अशा भाषेत 'अर्चना देव ' यांनी ' काशीबाई ' प्रत्यक्ष डोळ्यांसमोरच उभी केली. यापूर्वी इतकं सुंदर वर्णन (काशीबाइंचे व्यक्तिमत्त्व) कुठेच वाचले नाही आणि ऐकलेही नाही. काशीबाइंचा सहनशीलपणा, मनाचा मोठेपणा! मनातलं वादळ शांत ठेवून बाजीरावांशी संयमानं वागणं. बापरे! खरंच कौतुकास्पद आहे. मनाचा मोठेपणा तरी किती! मस्तानीचा मुलगा समशेर ह्याला सुद्धा पोटच्या मुलासारखीच वागणूक.

माहेरी श्रीमंतीत, लाडात वाढलेल्या लाडूबाई आणि पेशवीण झाल्यानंतरच्या काशीबाई हा प्रवास खूपच सुंदर रेखाटला आहे. त्यांच्या स्वभावातले अनेक पैलू लेखिकेने उलगडले आहेत. " काशीबाई म्हणजे सगळ्यांना सामावून घेणारी पवित्र गंगाबाई " ही उपमा फार सुंदर आहे. केवळ नवर्‍याच्या किर्तीला, एका अपराजित योद्ध्याला डाग नको म्हणून काशीबाईने स्वतःच्या आईने सोडलेले वाक्बाण सुद्धा तितक्याच ताकदीने परतवून लावले. केवढा हा खंबीरपणा !

एकंदर ' मनस्विनी ' ही कादंबरी खरोखरच मनस्वी झाली हे.

 

- श्रीमती विजया मोहोळकर, पुणे

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Paramhans

Anjali Joshi Parikshan

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Aakash Ujaltana

परपुरुषावर लोभावलेल्या स्त्रीच्या मनाचा धांडोळा

स्त्री-पुरुषसंबंधांमधल्याव्यमिश्रतेचावेधघेणाऱ्या ‘देहाचियेगुंती’ याकादंबरीनंतरडॉ. अंजलीसोमणयांची ‘आकाशउजळताना’ हीनवीकादंबरी ‘कॉन्टिनेन्टल प्रकाशनने प्रकाशित केली आहे.

घर उत्तम सांभाळून फावल्या वेळात सोशल वर्क करणारी एक गृहीणीअशीच जिच्या मनात आपल्या आईचीममाची प्रतिमा आहे अशी इरा. आपल्या कर्तृत्ववान वडिलांना आदर्श मानणारी इरा. त्यांच्यासारखं कणखर होण्याचा प्रयत्न करणारी. ‘जोडीदाराला समजून घ्यावं लागतंहा ममाचा सल्ला धुडकावून एक लग्न आणि नंतर एकलिव्ह इन रिलेशनशीपतोडून टाकणारी पण ममाने मृत्यूपर्वीखास इरासाठीअशी नोंद करून लिहून ठेवलेल्या आठवणी वाचून इरा सैरभैर झाली. आपल्या साध्याभोळ्या दिसणाऱ्या, संसारात रमलेल्या आईचे विवाहबाह्य संबंध होते, ही गोष्ट तिला सहनच होत नाही. ममाबद्दलची कटुता आणखीच वाढते.

यशाची शिखरे पादाक्रांत करत पुढे जाणारा नवरा, दोन गोजिरवाणी मुलं, घर-दार असा दृष्ट लागण्यासारखा संसार असताना इराची ममाविभा निनादवर का भाळते? ‘प्रेम काळ अथवा नियमांची पर्वा करीत नाही, असं कामसूत्र लिहिणाऱ्या वात्सायनानं म्हटलं आहे. हेच या प्रश्नाचे उत्तर आहे का? प्रेमभावना ही नैसर्गिक आहे. एखाद्याविषयी ते आपसूक उमलून येतं आणि जोपर्यंत या प्रेमाचा इतरांना त्रास होत नाही, तोपर्यंत त्यात काहीही गैर नाही, असं या कादंबरीचा नायक निनाद सांगतो. या जगावेगळ्या प्रेमाचा दोन्ही कुटुंबांवर परिणाम होऊ नये, मुलांचं भावविश्व उधळून जाऊ नये म्हणून दोघांनाही अनेक कसरती कराव्या लागतात. हे प्रेम जगासमोर उघडपणे दाखवताही येत नाही आणि मनाला लागलेली जिवलगाची ओढ दाबूनही टाकता येत नाही. अशा वेळी स्त्रीच्या मनाची होणारी तगमग, कासाविशी या कादंबरीत विभाच्या माध्यमातून उत्तम प्रकारे चित्रित केली गेली आहे.

प्रत्येक व्यक्तीमध्ये स्त्रीतत्त्व आणि पुरुषतत्त्व अशी दोन्ही तत्त्वे असतात. पुरुषतत्त्व म्हणजे स्वामीत्त्व भावना, आक्रमकता तर स्त्रीतत्त्व म्हणजे समर्पण, संयम. ज्या व्यक्तीमध्ये पुरुषतत्त्व प्रबळ असते ती व्यक्ती जोडीदाराला समजून घेण्यात कमी पडते. विभाचा नवरा सतीश आणि इरा यांच्या माध्यमातून लेखिकेने हीच गोष्ट अधोरेखित केली आहे. या दोन्ही तत्त्वांचा सुयोग्य मेळ निनादसारख्या एखाद्या व्यक्तीतच असतो. म्हणूनच ही कादंबरीजगावेगळ्या पुरुषांनाअर्पण केली असावी!‍

या कादंबरीत मुख्य पात्रे तीनच. विभा, इरा आणि निनाद. विभा आणि इरा या मायलेकी दोन पिढ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या. विभा निनाद भेटण्याआधी थोडी घुसमटलेली पण समंजस, सगळ्यांना जोडून ठेवणारी. इरा इम्पलसिन्ह. परिणामांचा विचार न करता निर्णय घेऊन मोकळी होणारी. या दोघींच्याही व्यक्तिमत्त्वात बदल घडून यायला कारणीभूत ठरतो निनाद. विभाच्या बाबतीत प्रत्यक्षपणे तर इराच्या बाबतीत अप्रत्यक्षपणे. हा बदल कसा घडतो ते कादंबरी वाचूनच समजून घ्यायला हवं. ओघवती भाषा आणि प्रसंग डोळ्यांसमोर उभे करण्याची शैली यामुळे कादंबरी वाचकाला खिळवून ठेवते. सामंजस्य, सख्य हा प्रेमाचा पाया आहे आणि प्रेमाकरता तन आणि मन यांची सायुज्यता आवश्यक आहे, हे मनावर ठसवण्यात लेखिका यशस्वी झाली आहे.

 

-   ज्योती जोशी

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बारोमास : ले. सदानंद देशमुख

शेतकरी कुटुंबातील दुःखाचा आणि सतत तणावात जगणाऱ्या त्यांच्या वेदनेचा पट मांडत शेतकरी आत्महत्येची उलक करणारी, हृदय पिळवटून टाकणाऱ्या साहित्य अकादमी विजेत्या कादंबरीचा परिचय
- हेरंब कुलकर्णी

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

विजयनगर हृदयस्थ साम्राज्य

डॉ. अस्मिता हवालदार यांनी लिहिलेले 'विजयनगर हृदयस्थ साम्राज्य' या कॉन्टिनेन्टल ने प्रकाशित केलेल्या पुस्तकात अडीचशे वर्षांहून अधिक काळ दक्षिण भारतात अधिराज्य गाजवणाऱ्या वैभवशाली साम्राज्याचा समग्र गौरवशाली इतिहास आहे.कर्नाटकातले हम्पी नगर ,जे आता वैश्विक वारसा जाहीर झाले आहे ,ते तत्कालीन गौरवशाली विजयनगर साम्राज्याची राजधानी होते .
याच साम्राज्यकालात बांधलेल्या प्रसिद्ध 'लेपाक्षी' मंदिराची साद्यंत रंजक माहिती चित्रीकरण आणि संगीतलहरींसह सोबतच्या video मध्ये लेखिकेने सांगितली आहे.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

'मोक्ष' एक थक्क करणारा वाचनानुभव-

Moksha

सौ. प्रियांका कर्णिक यांची ‘मोक्ष’ ही कादंबरी हा माझ्यासारख्या सामान्य वाचकाला थक्क करणारा वाचनानुभव आहे असे विधान मी प्रामाणिकपणे व्यक्त करतो. कारण, या कादंबरीच्या प्रकाशन समारंभास उपस्थित राहण्याचा योग आला. आणि घरी आल्यानंतर एका बैठकीत ही कादंबरी वाचण्याची संधी लाभली. वाचनास सुरुवात केल्यानंतर पुस्तक खाली ठेवलेच नाही. एवढी ताकत या कादंबरीच्या कथासूत्रामध्ये आणि विषयामध्ये आहे. प्रा. मिलिंद जोशी यांनी म्हटल्याप्रमाणे कादंबरीचे निम्मे यश हे विषयाच्या निवडीमध्ये असते याचा प्रत्यय कादंबरी पूर्ण वाचून झाल्यावर येतो. लेखिकेचे समाजातील विविध विषयांचे कालानुरूप आणि विविध स्तरांवरील निरीक्षण अतिशय प्रगल्भ असल्याचा अनुभव कादंबरीतील प्रत्येक वळणावर येतो. कथेमध्ये अनेक प्रसंग असूनही ते अतिशय खुबीने प्रस्तुत केले असून प्रसंगांच्या साखळीतील गुंफण आजीबात सैल होत नाही आणि कथा वेगाने पुढे सरकते.

मोक्ष ही धार्मिक कादंबरी नसून सामाजिक बैठक असलेली कादंबरी आहे. जीवनाची इतिकर्तव्यता जीवनातील सुख, दु:ख आणि संपत्ती भोगून मोक्ष मिळवण्यासाठी प्रवास करण्यात असते असे ही कादंबरी सांगते. कथानायक आणि कादंबरीतील सर्व पात्रे आपल्या नेहमीच्या परिचयातील असावीत असे वर्णन अतिशय ताकदीने उभे करण्यास लेखिका यशस्वी झाली आहे. म्हणूनच शेखरची घुसमट, अप्पांची आकांक्षा, सागरचे स्वप्न आणि सविताची तगमग सहज सुलभ वाक्यांमधून वाचकाच्या हृदयास भिडते. लेखिकेचे भाषेवरील प्रभुत्व वेळोवेळी जाणवते. उदा. शेखरची घुसमटलेली असहायता दाखवताना ‘‘मघाशी डोकं काढून आलेला तो पराभूत भाव आता शरीरभर पसरला’’ किंवा ‘‘अडचणींनी भरलेला खडतर मार्ग ते पार करू शकतायत कारण त्या मार्गावर तुमच्याभोवती आहेत तसे रेशमी पाश नाहीयेत. ‘‘ही वाक्ये वाचकाच्या काळजाला भिडतात.

एकूण बऱ्याच दिवसांनी वेगळ्या विषयाचे, समाजाभिमुख आणि अंतर्मुख करणारे साहित्य सौ. प्रियांका कर्णिक यांच्या मोक्ष या कादंबरीद्वारे वाचण्यास मिळाले म्हणून त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन. तसेच ही उत्तम कादंबरी वाचकांपर्यंत पोचवल्याबद्दल कॉन्टिनेन्टल प्रकाशनचे आभार!!
- महेश पां. भागवत

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Sahachari

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Ramshastri Loksatta

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Karant

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Kadambarikar Karanth Parikshan

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अस्तपर्व
श्रीमंत बाकाबाईसाहेब भोसले

लेखक: उदय जोशी
प्रकाशन: काँन्टिनेन्टल

नागपूरचे रघुजीराजे भोसले द्वितीय व त्यांची चतुर्थ पत्नी बाकाबाई पट्टराणी यांचा राजघराण्याचा राजकारणी प्रवास ५५० पानांत वाचायला मिळतो. नकळत्या वयात बाकाबाईंचे लग्न व त्यानंतर माहेराप्रती राणीसाहेब म्हणून मिळणारे अदबीचे वागणे असा सूर ऐकूनच ती मोठी होते. नागपूरच्या त्या भव्य राजवाड्यात हिंडतांना हरखून गेल्या. पण राजकारणात असलेले राजे आपल्या वाटेला फार कमी येणार हे समजून घेणारी बाकाबाई आवडली. विचारी व संयमी मुळात बुद्धीवान व चाणाक्ष बाकाबाईंना राजकारण जास्त कळत नव्हतं, पण सतत तेच मसलती, चर्चा ऐकून चिंतन, विचार सुरू असत. कधी कधी त्या महाराजांना, वकिलांना प्रश्न विचारून चर्चेत भाग घेऊन सूचना करीत.

त्यांचे बुद्धीचातुर्य, निरिक्षण, दूरदर्शीपणा सौजन्यपूर्ण संवाद करण्याची कला यामुळे राजे त्यांना मसलतीत घेत असत. एकदा इंग्रज अधिकारी कोलब्रुक व सर्व मंडळींसमोर धिटाईने तहाच्या चर्चा सुरू असतांना बाकाबाईंनी विचारले ‘समजा आम्ही तह केला. साहेबांची फौज ठेवली. निजामाकडेही साहेबांची फौज असणारच, उदा. निजामांनी आमच्यावर हल्ला केला तर आमची फौज निजामाविरुद्ध लढेल?’ हा प्रश्न साहेब कोलब्रुकच्या अंगावर भुईनळ्यासारखा आदळला. खरं तर हा प्रश्न वकील, रघुजीराजे ह्यांच्याही मनांत आला होता पण कुणी व कसा विचारायचा? बाकाबाईंनी धैर्य दाखवले. राजेसाहेबांनी त्यांना त्यांच्या महालात मनापासून कौतुकाची थाप व धैर्याचे समर्थन केले. पुढेही राजकारणात पुण्याचे पेशवे, होळकर, शिंदे, इंग्रज या सर्वांशी सभेट चर्चा, संघर्षमय संवाद वारंवार वाचायला मिळतो.

इंग्रज कोलब्रुकसाहेबांना बाकाबाईने तहाची बोलणी न करता २ वर्षं होकार… नकार, अन्य डावपेच खेळत थोपवून धरले होते. त्यांचा सावत्रपुत्र परसोजी मंदबुद्धीचे म्हणून वारसाचा प्रश्न उभा राहिला. भाऊबंदकी ठरलेली. त्यात रघुजीराजे दत्तक घेण्यास सदैव विरोध करीत. या वादात आजारपण येऊन रघुजीराजे निवर्तले. तात्पुरता उत्तराधिकारी म्हणून परसोजीना राज्याभिषेक केला. पण दुसरा पुत्र आप्पासाहेब उभे ठाकले. त्यांचेवर बाकाबाईंनी परसोजीला आपणच मारले व चंद्रपुरात (चांदा) गेला असा अप्रत्यक्ष आरोप केला केवढे धीट व रोखठोक बोलणे. त्यांचा सदैव प्रयत्न भोसल्यांचे राज्य हे बंगालपासून मध्यप्रदेश नर्मदा नदीपर्यंत पसरले आहे, ते कायम रहावे हा उद्देश, कारण रघुजीराजेंनी आयुष्यभर जो संघर्ष केला तो इंग्रजांशी तैनाती फौज तह होऊ नये. राज्य कसे वाचवायचे हे सर्व वर्णन लेखकांनी सुंदर शब्दांत सांगितले आहे.

परसोजींची पत्नी काशीबाई सती जातात तो करुण प्रसंग व बाकाबाई त्यांना नमस्कार करतात. तेव्हा वाचकांचे डोळे भरून येतात वाचताना. तसेच कलंकी ब्राह्मणांना फसवून मौलवीने बाटवले व नंतर वैदिक ब्राह्मण त्यांना शुद्धीपत्र देईना तेव्हा महादेवशास्त्रींशी बाकाबाई इतक्या सुसंबद्ध बोलल्या, चर्चा केली की अगदी ज्ञानेश्र्वरांपासून शिवाजी महाराजांची उदाहरणे, धर्मग्रंथ पुढे ठेवा असा आग्रह केला. यावरून त्यांच्या बुद्धीची झेप, प्रजेबद्दल कळवळा लक्षात येतो.

बाकाबाई झाशीच्या राणीसारख्या लढाऊ वृत्तीच्या कधीच नव्हत्या. डावपेच खेळत समजूतीने भोसले घराणे टिकवण्याची केविलवाणी धडपड अखेरपर्यंत केली. दत्तकाला मान्यता मिळवण्यासाठी इंग्रजांचे दरवाजे ठोठावले. इंग्रज अधिकारी कोलब्रुक यांनी बोलतांना एकदा म्हटले की, ‘हॅम्लेट नाटकातील लेडी ॲक्वेथची नजर, पूर्ण राजकारणी, निर्भिड आपल्याला महागात पडणार आहे बाकाबाई.’ लेखकांनी मधून मधून चतुराईने पुष्कळदा शाश्वतविचार मांडले. उदा. राजकारणात नियती वय पहात नाही. त्यांना वेळेच्या व वयाच्या पुढे धावावे लागते. माधवराव पेशवे, शिवाजी महाराज ही अगदी जवळची उदाहरणे.

शेवटी इंग्रजांशी डावपेच करण्यात बाकाबाईसाहेब कमी पडल्या. भाऊबंदकी, फितुरी, परभेदीपणा, स्वार्थाची कमाल, वकिली डावपेच यामुळे त्या हतबल झाल्या. लेखक म्हणतात, ‘राजकारण हा क्रूर खेळ आहे म्हणतात. कारण त्यात नातीगोती, गुरु राजा, मित्र असे काही नाही. कंसमाता, कैकयीमाता, शिवाजीच्या वेळी सोयराबाई, लोकमान्यांना दगा देणारे मित्र व अगदी ----- राजकारण आज समोर आहे.
इंग्रजांनी बाकाबाईंना फसवून खोटे आरोप करून भोसलेवाडा अक्षरश: खणून संपत्ती, दागिने, पशुधन, हत्तीघोडे, चौरंग, चांदीची भांडी, बैलगाड्यात भरून नेले. त्या हताश नजरेने सर्व पहात होत्या. ‘घर फिरले की घराचे वासे फिरतात तसे झाले.’ त्यांच्या नजरेने आपणही गहीवरतो शरीराने व मनाने.

लेखकाने मात्र भोसले घराणे नागपूरकर यांचे ६०-६५ वर्षांचा इतिहास १७८१ ते १८५८ कार्यकाल खूप अभ्यासपूर्ण लिहला. या ऐतिहासिक कादंबरीचा प्रथम प्रयत्न कुठेही कमी पडत नाही त्यांचा. सहज हलके फुलके संवाद असो वा राजघराण्याची भाषा असो लेखकांनी समर्थपणे हाताळले. श्रीमंत बाकाबाईंनी रघुजीराजे निवर्तल्यावर ४० वर्षे भोसले घराणे टिकवले. हेच त्यांचे कार्यकर्तृत्व तरी अस्तपर्व. मोठ्या जलाशयातून नौका विहरत जावी तसा कादंबरीचा प्रवास संथ व धीमा आहे म्हणूनच अस्तपर्व पृष्ठसंख्या ५८० झाली. कथानकाच्या गाभ्याकडे मात्र लेखकाचे दुर्लक्ष झाले नाही. माणसाचे आयुष्य साधे सरळ असतेच असे नाही. खूप खाचखळगे, संकटं अडचणी यातून जरून जाणे, जिद्दीने न डगमगता प्रवास करणे आवश्यक आहे मग ते सत महात्मे, देशभक्त असो की राजे महाराजे, गरीब कामगार असो. नशिबाशी तडजोड नाही. त्यात कधी यश कधी अपयश असणारच.

मंगला नातू
दहिसर पूर्व

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Baap Navachi Maay

काळजाचा ठाव घेणारी बाप नावाची माय

लेखक: डॉ. राजेश गायकवाड
प्रकाशन: काँन्टिनेन्टल


‘बाप नावाची माय’ हे डॉ. राजेश गायकवाड यांचे आत्मकथन अनेक नाट्यपूर्ण प्रसंग आणि विविध स्वभावधर्माच्या व्यक्तिरेखांनी परिपूर्ण आहे. ही आत्मकथा डॉ. गायकवाड यांच्या वडिलांचे चरित्र आहे. तसेच त्यांच्या गावकुसातील बारा बलुतेदारांचेही अंशत: चरित्र आहे. जमिन विकून मुलांना शिकवणारा अज्ञानी बाप खेडूत असला तरी त्याचे अनुभवाचे शहाणपण अस्सल आहे. लेखकाच्या लहानपणी आईचा मृत्यू होतो. पण त्याच्या वडिलांनी लग्न न करता मुलांसाठी संपूर्ण आयुष्य शिक्षणाच्या ध्यासात समर्पित केले. म्हणूनच लेखक गायकवाड यांना त्यांच्या बापात आईचे दर्शन घडते.

या आत्मचरित्राची भाषा परभणी परीसरातील बोली भाषा असल्याने ग्रामीण व्यक्तिरेखांचा जिवंतपणा हुबेहुब चित्रित झालाय. पुढे राजेश गाडकवाड यांची ही जीवनकथा संघर्षानी ओतप्रोत आहे. त्यांचा भौगोलिक प्रवास आणि नोकरीचा प्रवास सिद्ध होताना कोर्ट-कचेऱ्या, संघर्ष, सुख-दु:खाचे अनेक प्रसंग घडतात. त्या सर्वांचे सुंदर व प्रत्ययकारी वर्णन डॉ. गायकवाड यांनी केलेय. काही प्रसंग प्रचंड विनोदी आहेत. जयश्री पाटील या विद्यार्थीनीचा डबा आणणारा नोकर वर्गात येऊन ‘जयश्री गडकर’ म्हणून संबोधितो - तेव्हा हास्य पिकतो. ‘परी’ या शब्दावर लेखक गायकवाड यांनी केलेल्या कोट्या त्यांच्या वाङ्मयीन सामर्थ्याची साक्ष देतात. या गुणवतेमुळेच कॉन्टिनेन्टल सारख्या दर्जेदार प्रकाशनाने हे पुस्तक प्रसिद्ध केलेय. जीवंत व्यक्तिरेखांची मालिका, बापातील मातृत्वाचा अविट ठसा, ग्रामिण-शहरी संस्कृतीचे हुबेहुब चित्रण, बोलीभाषेचा तडका या गुणामुळे हे आत्मकथन सर्वांग सुंदर झाले आहे.

- श्रीपाल सबनीस

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Ramshastri Prabhune

न्यायनिष्ठ रामशास्त्री प्रभूणे

लेखक: रमाकांत देशपांडे
प्रकाशन: काँन्टिनेन्टल

रामशास्त्री बाणा माहिती होता पण या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांच्या व्यक्तीमत्वाचे अनेक पैलू कळले. लेखकाच्या ओघवत्या शैलीने वाचक नकळत त्या कादंबरीत रममाण होतो. माहुलीसारख्या लहानशा गावात जन्माला आलेले रामशास्त्री काशीला जाऊन आचार्य बाळंभट यांच्याकडे न्यायशास्त्र आणि चाणक्यनिती शिकून शास्त्री ही पदवी प्राप्त करतात. पुढे नानासाहेब पेशवे त्यांना शास्त्रार्थ सांगण्यास आमंत्रित करतात आणि त्यांची न्यायनिष्ठता पाहून ते पेशव्यांचे सरन्यायाधीश होतात.

आपल्या र्निभीड व्यक्तिमत्वाने त्यांनी न्यायनिवाडे तर केलेच पण नानासाहेबांच्या निधनानंतर माधवराव पेशवे यांनाही त्याच निष्ठेने साथ दिली. माधवरावांनंतर नारायणरावांना पेशवेपद मिळाले त्यावेळी राघोबादादांच्या कट कारस्थानांना ऊत आला होता. जेव्हा केवळ पेशवे पदासाठी राघोबादादांच्या सांगण्यावरून कोवळ्या नारायणरावांचा बळी घेतला गेला त्यावेळी रामशास्त्री पेटून उठले आणि कुठलीही पर्वा न करता राघोबादादासारख्या भावी पेशव्याला देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा सुनावली.

आपल्या अंतिम समयी सुध्दा घरातील परिस्थिती कफल्लक असतांना रामशास्त्रींच्या मुलाला नाना फडणवीसांनी पेशवाईत काही व्यवस्था करण्याविषयी त्यांना विचारले असता तो अविद्वान असल्याने त्याला पेशव्यांची धोतरं बडविण्याचे काम देण्यात यावे असे सांगितले. अशा या थोर व्यक्तीमत्वास खरोखरच मानाचा मुजरा. आपल्या कामाप्रती असलेली निष्ठा, प्रामाणिकपणा, निःस्वार्थीपणा आणि त्यांचा निर्भीडपणा यामुळे ते अमर झालेत.


सौ.ऊर्वशी शरद डावरे
ग्रंथ तुमच्या दारी, नागपूर