Book Categories


'मृत्युंजय', 'छावा' आणि 'युगंधर' आता देखण्या रुपात येणार वाचकांच्या भेटीला

'मृत्युंजय', 'छावा' आणि 'युगंधर' आता देखण्या रुपात येणार वाचकांच्या भेटीला

शिवाजी सावंतांच्या साहित्यकृती म्हणजे कॉन्टिनेन्टलच्या शिरपेचातील तुरा असल्याची संचालकांची भावना

'मृत्युंजय', 'छावा' आणि 'युगंधर' आता देखण्या रुपात येणार वाचकांच्या भेटीला

पुणे- साहित्यासारख्या संवेदनशील क्षेत्रात नैतिकता बाजूला सारून आणि कायदा गुंडाळून ठेवत केवळ पैसा आणि दबावाच्या जोरावर मेहता पब्लिशिंग हाऊसने दिवंगत प्रसिद्ध लेखक शिवाजी सावंत यांच्या तीन पुस्तकांच्या प्रकाशनाचे अधिकार मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र याविरोधात कॉन्टिनेन्टल प्रकाशनाने कायदेशीररित्या दिलेला लढा यशस्वी झाला आहे. शिवाजी सावंत यांच्या 'मृत्युंजय', 'छावा' आणि 'युगंधर' या तीन साहित्यकृती म्हणजे कॉन्टिनेन्टल शिरपेचातील तुरा असून ही पुस्तके आता लवकरच नव्या रुपात वाचकांच्या भेटीला येतील, असा विश्वास कॉन्टिनेन्टल प्रकाशनाचे संचालक ऋतुपर्ण कुलकर्णी आणि अमृता कुलकर्णी यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला. दिवंगत प्रसिद्ध लेखक शिवाजी सावंत यांच्या 'मृत्युंजय', 'छावा' आणि 'युगंधर' या तीन पुस्तकांच्या मराठी प्रकाशन आणि वितरणाचे संपूर्ण अधिकार कॉन्टिनेन्टल प्रकाशनाला असल्याचा निकाल या वादाच्या सुनावणीसाठी नेमण्यात आलेल्या लवाद न्यायाधीकरणाने नुकताच दिला आहे. त्यासंदर्भात आज आयोजित पत्रकार परिषदेत ऋतुपर्ण आणि अमृता कुलकर्णी बोलत होते. यावेळी उत्कर्ष प्रकाशनाचे संस्थापक-संचालक सु.वा. जोशी, काॅन्टिनेन्टल प्रकाशनाच्या संपादिका अंजली जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. लवाद न्यायाधीकरणाने दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर हा संपूर्ण वाद नेमका काय होता, त्यातील दावे-प्रतिदावे आणि याबाबत कॉन्टिनेन्टल प्रकाशनाची नेमकी भूमिका मांडण्यासाठी आज या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. उत्कर्ष प्रकाशनाचे संस्थापक-संचालक सु.वा. जोशी यांनी देखील कॉन्टिनेन्टल प्रकाशनाचे शिवाजी सावंत यांच्याशी असलेले जुने ऋणानुबंध आणि 'मृत्युंजय'च्या निर्मितीच्या इतिहासाला यावेळी उजाळा दिला.

यावेळी बोलताना ऋतुपर्ण कुलकर्णी म्हणाले की, 2008 साली शिवाजी सावंत यांच्या 'मृत्युंजय', 'छावा' आणि 'युगंधर' या तीन साहित्यकृतींची पायरसी होऊन त्यांची अल्प किमतीत विक्री होत असल्याचे आमच्या निदर्शनास आले. तसेच आम्ही प्रकाशित केलल्या या मूळ पुस्तकांचा खपही कमी झाला. त्यावेळी प्रकाशक या नात्याने आम्ही शिवाजी सावंत यांच्या वारसदार या नात्याने मृणालिनी सावंत यांच्यासह पायरेटेड पुस्तके विकणार्यांविरोधात कारवाई केली. मात्र दुर्दैवाने पायरसीची ही साखळी मोठी असून त्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याइतकी आपली यंत्रणा सक्षम नसल्याचेही आमच्या लक्षात आले. त्यामुळे आम्ही तो विषय तिथेच थांबविला. दरम्यान, 2012 मध्ये मेहता पब्लिशिंग हाऊसने दिवंगत प्रसिद्ध लेखक शिवाजी सावंत यांच्या कुटुंबियांशी परस्पर संधान साधून त्यांना करारबद्ध करुन घेतले. पैश्यांची देवाण-घेवाण होऊन मेहता पब्लिशिंग हाऊसने 'मृत्युंजय', 'छावा' आणि 'युगंधर' ही तीन पुस्तके राजरोसपणे छापून त्याच्या विक्रीसाठी वितरक आणि विक्रेत्यांवरही दबाव टाकला. या तिनही पुस्तकांचे प्रकाशन आणि वितरणाचे अधिकार कॉन्टिनेन्टल प्रकाशनाकडे असताना मेहता पब्लिशिंग हाऊसने केलेल्या दादागिरीविरुद्ध कॉन्टिनेन्टल प्रकाशनाने कायद्याच्या आधारे न्यायलयात धाव घेतली. जिल्हा न्यायलय, उच्च न्यायलय आणि सर्वोच्च न्यायलय असा गेल्या साडेपाच वर्षातील या खटल्याचा प्रवास चालला. याप्रकरणी सर्वोच्च न्यायलयाने तीन सदस्यीय लवाद न्यायाधीकरणाची (arbitration tribunal) नेमणूक केली. यामध्ये उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आर.एम.बापट आणि डि.जी. कर्णीक, तसेच जिल्हा न्यायलयाचे एस.व्हि.नाईक यांचा समावेश होता. या तीन सदस्यीय लवाद न्यायाधीकरणाला 1999 पासून ते 2012 पर्यंतची सर्व कागदपत्रे दाखवून काॅन्टिनेन्टल प्रकाशनाने आपली सत्य बाजू न्यायालयापुढे सिद्ध केली आणि त्यामध्ये यश मिळवले.

यावेळी बोलताना अमृता कुलकर्णी म्हणाल्या की, 1966 साली शिवाजी सावंतांनी स्वतः कॉन्टिनेन्टल प्रकाशनाबरोबर करार केला होता आणि त्यात काही विशेष अटी आणि नियम देखील नमूद केले होते. याच कराराची कॉपी घेऊन स्वतः लेखकाने 2000 साली कॉन्टिनेन्टल प्रकाशनाबरोबर करार केला होता. हा करार त्यांनी त्यांच्या संपूर्ण सचेत अवस्थेत (conscious) केला होता आणि याची त्यांच्या कुटुंबियांना देखील पूर्ण कल्पना होती. पंरतू त्यांना यातून पळवाट हवी होती म्हणुन त्यांनी बेकायदेशीररित्या मेहता पब्लिशिंग हाऊसबरोबर संगनमत करुन त्यांच्याशी करार केला. 2011 मध्ये कालमर्यादा नसेल तर करार संपुष्टात येतो ही कायद्यातील सुधारणा 2011 साली आली. पंरतू मूळ करारात हा करार संपुष्टात येण्यासंबंधीचा एकच क्लॉज होता. त्यानुसार ही पुस्तके खुप वर्षे आऊट ऑफ प्रिंट राहिली तर किंवा या पुस्तकांच्या विक्रिवर काही परिणाम केला तर हा करार संपुष्टात येईल, अन्यथा हा करार कॉन्टिनेन्टल प्रकाशन आणि त्यांच्या वाली वारश्यांवर बंधनकारक आहे. त्यामुळे शिवाजी सावंतांच्या मृत्यूनंतर या पुस्तकांशी संबंधीत स्वामित्व अधिकार हे सर्व आगामी 60 वर्षांकरीता कॉन्टिनेन्टल प्रकाशनाकडे राहतील, हे यातून स्पष्ट होते.

कॉन्टिनेन्टल प्रकाशनाला साहित्य निर्मितीची दीर्घ परंपरा असून गेल्या 80 वर्षात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या प्रसंगाला सामोरे जावे लागले. पंरतु, प्रामाणिकपणाची दिर्घ पंरपरा कॉन्टिनेन्टलला असल्याने यात आम्हाला यश आले आणि कॉन्टिनेन्टलच्या शिरपेचातील ही तीन पुस्तके आता कायमस्वरुपी कॉन्टिनेन्टलकडे राहतील, याचे आम्हाला खूप समाधान वाटत आहे. या सर्व कायदेशीर प्रक्रियेमुळे लेखकाचे वारस आमच्यापासून दुरावले होते, पंरतू शिवाजी सावंत यांची कॉन्टिनेन्टलशी जोडलेली नाळ अतिशय घट्ट होती, हे या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशनविश्वातील पारदर्शकता नाहीशी करण्याचा प्रयत्न चालवला होता, मात्र त्यावर आम्ही संयमाने कायदेशीर विजय प्राप्त केला आहे. आता ही तिनही पुस्तके आमच्या वाचकांना नव्या आणि देखण्या स्वरुपात लवकरच उपलब्ध करुन देणार आहोत.

या संपूर्ण प्रकारात कॉन्टिनेन्टल प्रकाशनाचे मोठे आर्थिक नुकसानही झाले, त्याच्या भरपाई संदर्भात देखील लवकरच कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच यामुळे सावंत कुटुंबियांबरोबरचे कॉन्टिनेन्टल प्रकाशनाचे ऋणानुबंध दुरावले आहेत. हे ऋणानुबंध पुन्हा सशक्त होण्यासाठी कॉन्टिनेन्टल प्रकाशन पुढाकार घेणार आहे. कॉन्टिनेन्टल प्रकाशनाचे संस्थापक कै.अनंतराव कुलकर्णी यांचा व्यवसायतील सचोटी आणि नैतिकतेचा वारसा कायम जपला जाईल, असा विश्वासही कॉन्टिनेन्टल प्रकाशनचे संचालक ऋतुपर्ण कुलकर्णी आणि अमृता कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केला.