Book Categories


कवी संदिप खरे संपादित ‘आरसपानीः निवडक सुधीर मोघे’ या पुस्तकाचे प्रकाशन

कवी संदिप खरे संपादित ‘आरसपानीः निवडक सुधीर मोघे’ या पुस्तकाचे प्रकाशन

सुधीर मोघेंना चिंतनाचे अधिष्ठान लाभले होतेः- ज्येष्ठ लेखिका वीणा देव
पुणेः- पु.ल.देशपांडे, माडगूळकर, हे मोघेंसाठी दैवत होते, पंरतू केवळ भक्तीत लीन होऊन न जाता प्रत्येकाची त्याच्या गुणदोषांसह नोंद करणारी मोघे यांची नजर पारखी होती.सुधीर मोघे यांना चिंतनाचे अधिष्ठान लाभलेले होते.
असे मत ज्येष्ठ लेखिका वीणा देव यांनी व्यक्त केले. येथील कॉन्टिनेन्टल प्रकाशनातर्फे प्रकाशीत आणि कवी संदिप खरे यांनी संपादित केलेल्या ‘आरसपानीः निवडक सुधीर मोघे’ या पुस्तकाचा प्रकाशन ज्येष्ठ लेखिका वीणा देव यांच्या अध्यक्षतेखालील कार्यक्रमात करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर कॉन्टिनेन्टल प्रकाशनाच्या संचालीका अमृता कुलकर्णी, कवी संदिप खरे, शुभदा मोघे आदी मान्यवर उपस्थित होते.

वीणा देव पुढे म्हणाल्या, मोघे म्हणजे ऊर्जा देणारे व्यक्तिमत्त्व होते. व्यासपीठांवरील कवीतांच्या कार्यक्रमात कवीता कशा सादर करायच्या याबाबत त्याच्या सुचना म्हणजे समृद्ध करणारा अनुभव असायचा. कवीता कशी सादर करायची, कोणत्या शब्दांवर कसा जोर द्यायचा याबाबतच्या त्याच्या सुचना माझ्यासह इतर सहकाऱ्यांना देखील परिपक्व करणारा होता. त्याला त्याच्या कार्यक्रमांतून केवळ शब्द पोहचवायचे नव्हते तर त्यांचा भाव देखील पोहचविण्याबाबत तो नेहमी आग्रही असायचा. अभिजाततेचा संस्कार त्याला घरातूनच मिळाला होता. शांताबाई आणि सुधीर कवीतांच्या बाबतीत तर संगणकला देखील मागे टाकतील अशी त्यांची स्मृती होती. कवी त्यांच्या कवीतांचा विषय निघाला तर ही दोघे पटापट संर्दभासह कवीता पाठ असल्याने पटापट म्हणायचे. गदीमांना जसे शब्द शरण यायचे तसेच मोघेंना देखील शब्द शरण यायचे. सुधीर मोघे यांनी नाविऩ्यपूर्ण वाटा निवडल्या. त्यांनी त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमातून आणि सजृनता प्रयोगशीलता जपली. मोघे यांच्या सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या स्वभावामुळे अनेक नवोदीत कलाकारांना देखील त्यांनी व्यासपीठ प्राप्त करुन दिले. कवी आणि गीतकार यांच्यातील सीमारेक्षा आणि बलस्थानंसोबतच त्या त्या भुमिकेतील मर्यादा मोघे यांना माहित होत्या.

संपादकीय मनोगत व्यक्त करतांना कवी संदीप खरे म्हणाले की, मोघे यांना कधीच ते कवी, गीतकार असल्याचा अभिनिवेष बाळगला नाही. त्यांच्या वागण्यात एक सहजता होती की ज्यामुळे त्यांच्यातील आणि त्यांच्या पुढील पिढीचा प्रतिनिधी या नात्याने आमच्यातील वयाच अंतर गळून पडायचे. ते कवी असूनही तंद्रीत न राहता त्यांचा स्वभाव हा भिडणारा आणि भावणाार होता. ते ज्या उंचीवर आणि त्यांना जी प्रतिष्ठा प्राप्त झाली होती त्याला त्या तंद्रीत गुंतणे आणि स्वतःच्याच कोषात गुरफुटून राहणे अपेक्षित होती त्याबद्दल त्यांना कोणी दोषही दिला नसाता पंरतू ते आरसपाणी होते म्हणुनच ते सर्वांचे होते. यावेळी कवी संदीप खरे यांनी पुस्तकातील एक उतारा आणि कवीता देखील सादर केली.

कॉन्टिनेन्टल प्रकाशनाच्या संचालीका अमृता कुलकर्णी यांनी प्रकाशकीय मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अवधूत पटवर्धन यांनी केले.