माझीही आत्मकथा

Continental Prakashan Old Photo

अलीकडे लहानमोठ्या व्यक्ती स्वत:च्या आत्मकथा, आत्मचरित्रे लिहितात. काही प्राण्यांनीही लिहिल्या आहेत. असा प्रयत्न कुणी संस्थेने केला होता का? मला माहीत नाही. मी तो करून पाहते आहे. ज्यांना आत्मकथा आवडीने वाचायला आवडतात त्यांना हीदेखील आवडेल अशी माझी आशा आहे.

ही माझी आत्म ‘कथा’ आहे. चरित्राप्रमाणे किंवा कादंबरीप्रमाणे ती प्रदीर्घ नाही. खंडन-मंडन, समर्थने यांचा मोह मी टाळलेला आहे. माझी प्रशंसा दुसर्‍यांनी केली ती मी दिली आहे. कारण स्वत:ची प्रशंसा मला आवडत असली तरी ती स्वत:च करणे बरोबर नाही.

1 जून 1988 माझा पन्नासावा वाढदिवस. हा दिवस साधून गेल्या 50 वर्षांची ग्रंथसेवा सांगणारी ही आत्मकथा मी लिहिली आहे. प्रसंग आनंदाचा असल्यामुळे ‘औचित्यविवेक’ सांभाळला आहे. त्यातूनही कुणाला काही बोचले, कुठे विस्मरण झाले असले तर क्षमा असावी. ज्यांनी ज्यांनी मला लहानाची मोठी करायचा प्रयत्न केला, यशस्वी केले आणि समर्थ केले त्या सर्वांनाच ही कथा अर्पण.

जन्मखुणा :

गोपाळ पाटणकर, जनार्दन महाजन व अनंत कुलकर्णी (पाटसकर) हे तिघे तरुण गुरुवर्य रा. प. सबनीस यांच्या, जुन्नरच्या ‘न्यू स्कूल’ मधील एकमेकांचे मित्र. त्यांनी एकत्र येऊन पुण्याला एक प्रकाशन संस्था सुरू केली. 1 जून 1938 हा शुभारंभाचा दिवस. तीच मी ‘कॉन्टिनेन्टल’.

माझा जन्म झाला तो मात्र गोपाळ  रा. पाटणकर यांच्या टिळक रोडवरील  वाचनालयात. कॉन्टिनेन्टल बुक सर्व्हिसमध्ये हे वाचनालय 1936 मध्येच सुरू झालेले होते.

पुण्याच्या एखाद्या मराठी प्रकाशन संस्थेचे नाव इंग्रजी असावे ते का? याबद्दल कुणाला आश्‍चर्य वाटू शकेल पण त्यामागे एक कथा आहे.

माझे मूळ नियोजित नाव होते ‘शारदा प्रकाशन’. चित्रकार वाटेगावकर यांच्याकडून संस्थेचे जे बोधचिन्ह करून घेतले होते ते कमळात असलेल्या वीणाधारी शारदेचेच होते. पन्नास वर्षे ते लक्षावधी वाचकांच्या परिचयाचे झाले आहे. पण नावात ‘शारदा’ ऐवजी ‘कॉन्टिनेन्टल’ हा शब्द रूढ करावा लागला आणि तोही अगदी पहिल्या प्रकाशनापासून.

एक तर पाटणकरांना भागीदारीमध्ये सुरू होणार्‍या या प्रकाशन संस्थेच्या प्रकाशित पुस्तकांवर त्यांच्या सर्व्हिसमधले ‘कॉन्टिनेन्टल’ हे नाव कुठेतरी यावे असे वाटत होते तसा त्यांचा आग्रह होता. ब्रिटिश अंमलात संस्थांची नावे आर्वजून इंग्रजी ठेवण्याकडे कल असे. आणखीही एक कारण होते. ते तांत्रिक होते. 1939 पासून सुरू झालेल्या महायुद्धाच्या काळात छपाईच्या कागद वापराला सरकारी परवानगी लागे. तो परवाना मिळाला होता तो कॉन्टिनेन्टल बुक सर्व्हिसच्या नावे. पत्रव्यवहार झाला होता तो त्या नावे. पुढे ही पेपर इकॉनॉमी ऑर्डर रद्द झाली पण तोपर्यंत ‘कॉन्टिनेन्टल प्रकाशन’ या नावाने चांगली 18-20 पुस्तके प्रसिद्ध झालेली होती. त्यानंतर रूढ झालेले नाव टाकून नव्याने ‘शारदा प्रकाशन’ या नावाने पुस्तके काढणे नको वाटले आणि परिणामी झाले ‘कॉन्टिनेन्टल प्रकाशन’ हेच नाव कायम झाले.

त्या वेळच्या निवांत, स्वच्छ पण वाहत्या टिळक रोडवरील सर्वांना या नावाविषयी आकर्षण आणि आपुलकी निर्माण झाली. तो स्वातंत्र्यपूर्व काळ उत्साहाचा आणि देशभक्तीचा होता. त्यातच माझी जडणघडण झाली.

पहिली चार पाच पुस्तके झाल्यावर पाटणकर यांनी स्वेच्छेने आपली कॉन्टिनेन्टल बुक सर्व्हिस वर्षा-दीड वर्षातच अप्पा बळवंत चौकात नेली आणि नंतर आणखी पाच-सहा पुस्तके झाल्यावर श्री. महाजन यांनाही या व्यवसायात रस वाटेना म्हणून सारा भार अनंतरावांवर सोपवून तेही आपण होऊन निवृत्त झाले. कुठलेही भांडण-तंटण न होता तीन वर्षांतच भागीदारी रद्द झाली आणि मग सप्टेंबर 1941 पासून अनंतराव एकटेच मालक राहिले.

पहिले प्रकाशन ‘नादनिनाद’ दत्त रघुनाथ कवठेकर यांचा हा कथासंग्रह वाजतगाजत 1 जानेवारी 1939 रोजी प्रसिद्ध झाला. प्रकाशन समारंभाची टूम आज शिगेला पोहोचली असली तरी पूर्वी असे समारंभ क्वचितच होत.

श्री. न. चिं. केळकर यांच्या शुभहस्ते हे पहिले पुस्तक प्रकाशित झाले. तात्यासाहेब समारंभाच्या वेळी टांग्यातून आले व टांग्यातून गेले. बरेच लेखक, प्रकाशक या समारंभास उपस्थित होते. गुरुवर्य माटे, य. गो. जोशी, वि. वि. बोकील, अरविंद गोखले तसेच मनोहर ग्रंथमालेचे श्री. केळकर, तात्यासाहेब ढमढेरे हजर होते. दत्त रघुनाथ कवठेकरांचे अगदी जवळचे लेखक मित्र व विविध वृत्ताचे सहसंपादक र. गो. सरदेसाई मुंबईहून समारंभासाठी आलेले होते, असे काही काही अजून आठवते. तात्यासाहेब केळकर मुख्य पाहुणे म्हणून असणे औचित्याला धरून झाले. न. चिं. केळकरांचे सारे लिहिणे बोलणे परंपरा आणि प्रगती यांचा नित्य समन्वय साधू पाहणारे असेच असे. पुस्तके प्रकाशनाच्या बाबतीत कॉन्टिनेन्टलचे धोरणही पुढे ‘परंपरा आणि प्रगती’ असे राहिले.

‘नादनिनाद’ हे तुमचे पहिले प्रकाशन अंतर्बाह्य चांगले झालेले आहे, असे बोलले जात होते, कारणे अनेक होती. एक तर दत्त रघुनाथ कवठेकर हे त्या वेळचे आघाडीवरचे लेखक मानले जात. पुस्तकाची छपाई त्या काळच्या पुण्यातील प्रसिद्ध राजगुरू प्रेसमध्ये झालेली होती. कागद चांगला जर्मन अ‍ॅटिक क्रिमलेड व्हाइट प्रिंटिंग होता. टाइप निर्णय सागरचा पायका वापरलेला होता. रॅपरवरचे चित्र श्री. दीनानाथ दलाल यांचे होते. पहिली आठ पाने दोन रंगात छान छापलेली होती. बांधणी वाढत्या पुठ्ठ्याची होती. पृष्ठ संख्या 176 असूनही किंमत अवघी दीड रुपया होती.                

(क्रमश:)