कॉन्टिनेन्टल प्रकाशन - परिचय

मराठी प्रकाशन व्यवसायातील एक अग्रगण्य प्रकाशन संस्था.

१ जून, १९३८ रोजी कै. अनंतराव कुलकर्णीनी लावलेले हे 'इवलेसे रोप .... तयाचा वेळु गेला गगनावरी ....' या उक्तीप्रमाणे २०१६ मध्ये एक वटवृक्षाच बनला आहे. आणि गेली ७८ वर्षे आपली पाळंमुळं मराठी प्रकाशनविश्वात घट्ट रोवून उभा आहे. अनेक दर्जेदार साहित्यकृतींचा निर्मितीची परंपरा कै. अनंतराव त्यांचे चिरंजीव कै. अनिरुद्ध, कै. रत्नाकर आणि त्यानंतर आज तिसऱ्या पिढीतील त्यांचे नातू श्री. ऋतुपर्ण, नात देवयानी व नातसून सौ. अमृता समर्थपणे सांभाळत आहेत.

संस्थेने २०१३ हे अमृतमहोत्सवी वर्ष मोठ्या दिमाखात, ऑनलाईन बुक विक्री, ग्रंथप्रदर्शन आदी नवनवीन उपक्रमाद्वारे साजरे केले.

परंपरा व प्रगती हे ब्रीदवाक्य जपत कॉन्टिनेंटलने आजवर २००० हून अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत. फक्त ललितगद्यच नव्हे तर कथा, कादंबऱ्या, नाटके, समीक्षा, पर्यटन, आहारआरोग्य, चरित्र्य, विज्ञान, कृषिविज्ञान, इतिहास, राजकारण, अर्थशास्त्र इत्यादी नानाविध वाङ्मयप्रकार वाचकांपर्यंत पोहोचविलेत. ज्येष्ठ साहित्यिक लेखक शिवाजी सावंत, ना. सं. इनामदार, चिं, वि. जोशी, गो. नी. दांडेकर, जी. ए. कुलकर्णी, श्री . ना. पेंडसे, कुसुमाग्रज, मिरासदार, माडगूळकर, अरविंद गोखले, ते आत्ताच्या पिढीतील संदीप खरे, सलील कुलकर्णी, अनंत मनोहर, सदानंद देशमुख, शिवराज गोर्ले, राजेंद्र देशपांडे, अभिनेत्री स्मिता जयकर, विजय देव- वीणा देव, हे कॉन्टिनेंटलच्या कोंदणातील एकेक हिरे-रत्ने आहेत.

कृषीविषयक ग्रंथदालन शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रात प्रथम खुले केले ते हि कॉन्टिनेंटलनेच !

या संस्थेस आजवर राज्य व राष्ट्रीय पातळीवरचे अनेक पुरस्कार प्राप्त आहेत. 'फेडरेशन ऑफ इंडिया पुब्लिशर्स ' दिल्ली उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीचे एकूण नऊ 'प्रथम -पुरस्कार ' तर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे दहा पेक्षा अधिक पुरस्कार आजवर प्राप्त आहेत. साहित्यनिर्मिती क्षेत्रात या संस्थेने दिलेले भरीव व मोलाचे योगदान वेळोवेळी राष्ट्रीय व राज्य पातळीवरील संस्थांनी अधोरेखित केले आहे. 'मृत्युन्जय ' या कादंबरीस ज्ञानपीठ पारितोषिक मिळाले आहे. तसेच उत्कृष्ट छपाई चे 'राष्ट्रपती पारितोषिक' ज्येष्ठ लेखक कै. ना. सं. इनामदार यांच्या 'शहेनशहा' या कादंबरीला मिळाले आहे. बाजीराव मस्तानी हा हिंदी चित्रपट ना. सं. इनामदार यांच्याच राऊ या कादंबरीवरून काढला आहे. तसेच सदानंद देशमुखांच्या 'बारोमास' कादंबरीवर देखील हिंदी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आणि या कादंबरीला 'साहित्य अकादमी पुरस्कार' ही मिळाला आहे.

अनेक ग्रंथ विविध विद्यापीठांनी त्यांच्या बी. ए., एम. ए. च्या अभ्यासक्रमात समाविष्ट केलेत तर अनेक ग्रंथांचे विविध भाषेत भाषांतरही झाले आहे.

कॉन्टिनेंटलच्या इतिहासातील अभिमानाची गोष्ट २०१५ मध्ये महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट प्रकाशक हा श्री. पु. भागवतांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार ह्या प्रकाशनाला मिळाला. अशाप्रकारे प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या या संस्थेचा वारसा असाच पुढे चालत राहो ही पांडुरंगचरणी प्रार्थना !!