---------------------------------------------------------------------------------

कॉन्टिनेन्टल प्रकाशित, डॉ. राजेश गायकवाड लिखित ‘बाप नावाची माय’ या पुस्तकास राज्यस्तरीय, कवयित्री हरणाबाई शिंदे
साहित्य पुरस्कार देण्यात आला.
संकल्प, शिक्षण आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान, "यशस्वी" औरंगाबाद आयोजित
१२ व्या " झेप "साहित्य संमेलनामध्ये संमेलनाध्यक्ष - मा श्री प्रवीण बर्दापूरकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

‘बाप नावाची माय’ या जीवन चरित्राला मिळालेला हा २८ वा पुरस्कार आहे.
डॉ. राजेश गायकवाड यांचे हार्दिक अभिनंदन!

---------------------------------------------------------------------------------

ॐ भास्कराय पुत्रं देहि महातेजसे । धीमहि तन्न: सूर्य प्रचोदयात्‌ ।


२१ ऑगस्ट २०२२…. एका तळपत्या सूर्याचे
८२व्या वर्षात पदार्पण! सूर्याचे सहस्रचंद्रदर्शन पूर्ण!


युवक क्रांती दल (युक्रांद), भारतीय समाज विकास व संशोधन संस्था आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष, सत्याग्रही विचारधारा मासिकाचे संपादक, माजी आमदार मा. डॉ. कुमार सप्तर्षी यांनी २१ ऑगस्ट २०२२ रोजी वयाच्या ८२ वर्षात पदार्पण केले आहे. त्यानिमित्त त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आणि ‘डॉ. कुमार सप्तर्षी : व्यक्ती आणि कार्य : बहुआयामी परिवर्तन प्रेरणा’ या ग्रंथाचे अनावरण काल गांधीभवन, कोथरूड येथे अनेक सुहृद, कार्यकर्ते तसेच प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी, पुणेच्या उपाध्यक्ष मा. आबेदा इनामदार, करण ग्रुप ऑफ बिल्डर्सचे मा. कल्याण तावरे तसेच प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते ग्रंथप्रकाशन तसेच डॉ. सप्तर्षींच्या कस्टमाइज्ड पोस्टल स्टॅम्पचे देखील प्रकाशन पार पडले. श्री. सुधीर गाडगीळ यांनी डॉक्टरांची मनमोकळ्या गप्पांस्वरूपात मुलाखत घेतली. श्रीमती इनामदार यांनी यादरम्यान म. गांधी स्मारक निधीला रू. ५०,०००/- ची देणगी घोषित केली.
डॉ. कुमार सप्तर्षी जीवनगौरव समिती यांच्या नियोजनाखाली हा सोहळा संपन्न झाला. कॉन्टिनेन्टल प्रकाशनातर्फे प्रस्तुत ग्रंथ अत्यंत उत्कृष्ट निर्मितीमूल्यांसहित माफक किंमतीत प्रकाशित करण्यात आला आहे. कॉन्टिनेन्टलच्या ग्रंथयादीमधील हे डॉ. सप्तर्षी यांच्यावरती लिहिलेल्या लेखांचे संपादन तसेच व्यक्तिरंग हे त्यांचे यापूर्वी प्रकाशित झालेले पुस्तक; ही दोन्ही पुस्तके वाचकांतर्फे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेली व युवा वाचकांच्या पसंतीस उतरलेली अशी निर्माण झाली याबद्दल विशेष आनंद वाटतो.
प्रस्तुत ग्रंथ ज्येष्ठ लेखिका डॉ. अंजली सोमण व गांधीभवनचे श्री. संदीप बर्वे यांनी संपादित केला असून ग्रंथामधील १९ विभागांतून समाजकारण व राजकारणातील अनेक पदाधिकारी, मान्यवर, राज्यकर्ते तसेच डॉक्टरांचे गांधीभवन कार्यकर्ते, सहकारी व सुहृद अशा अनेक व्यक्तींनी आपापल्या दृष्टिकोनातून डॉ. सप्तर्षींचे अनेकविध कार्यक्षेत्रातील पैलू आपल्या लेखांद्वारे उलगडले असून प्रत्येक समाज-कार्यकर्त्यासाठी हा ४६० पानी संदर्भग्रंथ वाचनीय व संग्राह्य नक्कीच ठरेल.
त्यांच्यासोबत सावलीप्रमाणे काम केलेल्या त्यांच्या पत्नी डॉ. उर्मिला सप्तर्षी यांनी देखील डॉक्टर व युक्रांद (१) हा ग्रंथ लिहिला आहे. या पुस्तकाच्या बऱ्याच प्रतींची खरेदी नोंदणी व प्रत्यक्ष विक्री काल कार्यक्रमस्थळी झाली.
तल्लख बुद्धी, संघटना कौशल्य, जातिनिरपेक्ष समाजकारण आणि धडाडीचे राजकारण तसेच परखड – सत्याग्रही तरीदेखील संयमी-सकारात्मक असलेल्या डॉक्टर कुमार सप्तर्षींना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन व पुस्तकास भरघोस शुभेच्छा!

---------------------------------------------------------------------------------

Shivkavya

नमस्कार

२९ मे रविवारी " श्री शिवकाव्य " प्रकाशनाचा सोहळा नेत्रदीपक असा झाला...

 कॉंटिनेंटल प्रकाशन , पुणे च्या अमृता कुलकर्णी आणि ऋतुपर्ण कुलकर्णी ह्यांचे विशेष आभार...देखणं रूप त्यांनी ह्या पुस्तकाला दिलं....अगदी कमी वेळात त्यांनी " श्री शिवकाव्य " मूर्त स्वरूपात आम्हास सुपूर्द केले..

 श्री पांडुरंग बलकवडे सर, डॉ प्राची मोघे , मा. आमदार प्रशांत दादा ठाकूर, पनवेल मनपा सभागृह नेते परेश दादा ठाकूर,नगराध्यक्षा सौ सुवर्णा जोशी, मोहनशेठ ओसवाल, भाई गायकर अशी दिग्गज मंडळी ह्यावेळी उपस्थित होती..

 "मा. आमदार महेंद्र जी थोरवे" यांनी आवर्जून कार्यक्रम स्थळी येऊन भेट दिली आणि प्रकाशन सोहळ्यास शुभेच्छा दिल्या...

 भाजपा चे जिल्ह्याचे नेते श्री अविनाश जी कोळी, श्री दीपक जी बेहरे, श्री मंदार मेहंदळे आदी मान्यवर सुद्धा उपस्थित होते..

 नुकत्याच प्रकाशित झालेल्या "धर्मवीर" चित्रपटात स्वर्गीय मा. बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका करणारे अभिनेते "श्री मकरंद पाध्ये" हे ही ह्या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते..त्यांचा सत्कार मा. पांडुरंग बलकवडे सर ह्यांच्या हस्ते झाला..

"योगिता राणे" ह्या सर जेजे महाविद्यालयाच्या मूर्ती कलाकार ह्या सुद्धा खास मुंबईहून प्रकाशन सोहळ्यासाठी आल्या होत्या..ज्येष्ठ पत्रकार "श्री विजयजी मांडे" , "श्री राजीवजी मुळेकर" हे ही आवर्जून माझ्यावरच्या प्रेमा पोटी आले होते..

 अक्षया चितळे, स्मिता जोशी, अभिषेक पटवर्धन, गणेश जगताप ही सगळी भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठाची टीम कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेत होती..

 रॉयल गार्डन हॉल चे मालक निलेश जी चौडिये , संतोष जी दगडे हे आवर्जून उपस्थित होते..

 ज्यांच्या मूळे हे शिवधनुष्य मी उचलू शकलो ते माझे जिवलग मित्र "सागर सुर्वे" आणि "जितेंद्र ओसवाल" त्यांच्या परिवारासहित आशीर्वाद देण्यास हजर होते...विश्वविख्यात चित्रकार "पराग बोरसे" हे सुद्धा वेळ काढून सोहळ्यास आले होते..

 ज्यांच्या पाठींब्याशिवाय हे लिखाण होऊच शकले नसते तो माझा वैद्य परिवार त्यात माझे दोन्ही जावई (दातार आणि गोरे) हे ही उपस्थित होते..

मी ज्यांना गुरुस्थानी मानतो त्या अनुपमा कुलकर्णी बाई सुद्धा खास माझ्यासाठी आशीर्वाद देण्यास आल्या होत्या..

अनेक मित्र , कर्जतकर रसिक मोठ्या संख्येने आले होते..

कार्यक्रमाची सांगता बलकवडे सरांच्या अप्रतिम भाषणाने नंतर "श्री केदार आठवले" यांच्या रसाळ पसायदानाने झाली...

हा सर्व सोहळा "श्री समीर खरे" यांनी त्यांच्या ओघवत्या वाणीत एका लयीत बांधून ठेवला...

हा सोहळा कार्यपूर्तीचा एक वेगळा आनंद मला, सागर सुर्वे, जितेंद्र ओसवाल या आम्हा तिघांना देऊन गेला..

अधिक काय लिहावे.. असेच आमच्या मागे आपण कायम राहाल ह्याच विश्वासाने माझ्या लेखणीला विराम देतो..

राहुल अनंत वैद्य

३० मे २०२२

कर्जत(रायगड)

---------------------------------------------------------------------------------

मराठी वाङ्‌मय परिषद, बडोदे तर्फे घेण्यात आलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य स्पर्धा २०२१ या स्पर्धेमधे सर्वोत्कृष्ट साहित्यकृती (कादंबरी) या पुरस्कारासाठी कॉन्टिनेन्टलने प्रकाशीत केलेल्या, अर्चना देव लिखित ‘मनस्विनी’ या पुस्तकास तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. लेखक, दिग्दर्शक, अभिनेता श्री अभिराम भडकमकर यांच्या हस्ते अर्चना देव यांचा सन्मान करण्यात आला.
मनस्विनी या पुस्तकास हा तिसरा पुरस्कार मिळाला आहे. अर्चना देव यांचे मनापासून अभिनंदन

mansvini

mansvini

---------------------------------------------------------------------------------

कणाकणाने प्रकाशन

३ एप्रिल २०२२

Kanakanane

रुग्णांना वाचविणारा कुशल सर्जन हा सृजनकर्ताच !

- खासदार श्रीनिवास पाटील

रुग्णांमध्ये विश्वास जागा करून मृत्यूच्या दाढेतून रुग्णाला सुखरूप बाहेर काढणारा कुशल सर्जन हा सृजनाचेच काम करीत असतो, असे मत  खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले.

दिवंगत डॉ. केतन खुर्जेकर ‘कणाकणाने’ यांचे आत्मचरित्र अभय इनामदार यांनी शब्दांकित केले आहे.  कॉन्टिनेन्टल प्रकाशनातर्फे प्रकाशित केले. या पुस्तकाचे प्रकाशन आज खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून पद्मविभूषण डॉ. के.एच. संचेती, अॅड. श्रीपाद खुर्जेकर, लेखक अभय इनामदारडॉ. देवारती केतन खुर्जेकर आणि कॉन्टिनेन्टल प्रकाशनाच्या संचाल अमृता कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले की, डॉ. केतन खुर्जेकर हे वेगळ्या धाटणीचे डॉक्टर होते. त्यांच्या केवळ उपस्थितीने देखील रुग्ण बरे व्हायचे. शिक्षणाने व्यक्ती कुशल होते, तर संस्कारांनी नम्र होते. डॉ. केतन खुर्जेकर हे कुशल डॉक्टर आणि नम्र व्यक्ती होते. संचेती रुग्णालय ही त्यांची कर्मभूमी होती आणि या कर्मभूमीसाठी ते कणाकणाने झिजले आणि क्षणाक्षणाने त्यांनी विद्यार्जन केले.

यावेळी बोलताना डॉ. के.एच. संचेती म्हणाले की, डॉ. केतन खुर्जेकर हे संस्कारी व्यक्ती होते. या पुस्तकातील विविध किस्स्यांमधून व्यक्त झालेले त्यांचे व्यक्तिमत्त्व नव्या पिढीतील डॉक्टरांसाठी आदर्श निर्माण करणारे ठरेल. याचा समावेश पाठ्यपुस्तकात देखील करता येईल. हे पुस्तक म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात येणा-या विद्यार्थ्यांपासून प्रत्यक्ष काम करणा-या डॉक्टरांसाठी मार्गदर्शक असा वस्तुपाठ आहे.

यावेळी बोलताना डॉ. पराग संचेती म्हणाले की, अतिशय आत्मविश्वासाने भरलेले आणि झपाटलले असे डॉक्टर केतन खुर्जेकर होते. अवघडातील अवघड शस्त्रक्रिया देखील ते लीलया पार पाडत असत. त्यांची संचेती हॉस्पिटल मधील गुंतवणूक केवळ व्यावसायिक नव्हती, तर भावनिक देखील होती. रुग्णालयाच्या प्रशासकीय प्रश्नांमध्ये देखील अनेक कठीण प्रसंगी ते मित्र म्हणून उभे राहिले. त्यांची माझी पहिली भेट ही अपघाताने झालेली आणि अल्पकाळाची होती. पण त्या भेटीतूनच आमचे ऋणानुबंध जुळून आले. ते अतिशय महत्त्वाकांक्षी होते आणि कोणताही रुग्ण कोणत्याही कारणाने उपचाराविना किंवा निराश होऊन जाऊ नये, यासाठी ते आग्रही असायचे. वेळप्रसंगी त्यांच्या डॉक्टरी कर्तव्यांच्या पलीकडे जाऊन रुग्णांना चांगले उपचार मिळावे, यासाठी ते व्यक्तिशः प्रयत्न करायचे. संचेती रुग्णालयाचा स्पाईन विभाग आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याची महत्त्वाकांक्षा ते बाळगून होते. संचेती रुग्णालयाच्या पाया खोदणीपासून अंतर्गत सजावटीपर्यंत त्यांनी लक्ष घातले होते.

यावेळी बोलताना प्रकाशक अमृता कुलकर्णी म्हणाल्या की, डॉ. केतन खुर्जेकर हे अतिशय मनमिळाऊ होते. या पुस्तकाची निर्मिती प्रक्रिया सहा-सात वर्षांपूर्वी सुरू झाली, त्यावेळी डॉ. केतन खुर्जेकर आणि अभय इनामदार हे दोघेही कॉन्टिनेन्टलच्या कार्यालयात येऊन या पुस्तकाच्या निर्मिती प्रक्रियेविषयी सखोल चर्चा करत असत. वैद्यकीय क्षेत्राबद्दल वाटत असलेला प्रचंड आदर, हीच हे पुस्तक निर्मिती करण्यामागची आमची प्रेरणा आहे.

यावेळी लेखक अभय इनामदार यांनी पुस्तक निर्मितीची प्रक्रिया कशी होती हे सविस्तर सांगितले. अॅड. श्रीपाद खुर्जेकर यांनी डॉ. केतन खुर्जेकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. डॉ. देवारती खुर्जेकर यांनी डॉ.केतन खुर्जेकर यांच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आलेल्या नवीन फौंडेशनविषयी माहिती दिली. हर्षद खुर्जेकर यांनी आभार मानले.

 

छायाचित्र ओळीः- दिवंगत डॉ. केतन खुर्जेकर यांच्यावरील अभय इनामदार लिखित आणि कॉन्टिनेन्टल प्रकाशनातर्फे प्रकाशित कणाकणाने या पुस्तकाचे प्रकाशन करताना खासदार श्रीनिवास पाटील. यावेळी (डावीकडून) ऋतूपर्ण कुलकर्णी, डॉ. पराग संचेती, अॅड. श्रीपाद खुर्जेकर, पाटील, डॉ. के.एच. संचेती, अभय इनामदार, डॉ. देवारती केतन खुर्जेकर आणि अमृता कुलकर्णी.

---------------------------------------------------------------------------------




२७ मार्च २०२२

प्रियांका कर्णिक लिखित ‘भवचक्र’ कादंबरीचा प्रकाशन समारंभ

 Bhavchakra

कॉन्टिनेन्टल प्रकाशित आणि प्रियांका कर्णिक लिखित ‘भवचक्र’ कादंबरीचा प्रकाशन समारंभ २७ मार्च २०२२ रोजी संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष आणि ज्येष्ठ कथालेखक भारत सासणे यांच्या हस्ते कादंबरीचे प्रकाशन झाले. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी होते. कॉन्टिनेंटल प्रकाशनतर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले असून प्रकाशनाच्या व्यवस्थापकीय संचाल अमृता कुलकर्णी व्यासपीठावर होत्या.

भारत सासणे यांचे प्रतिपादन :

‘भवचक्र’मध्ये मूर्तीच्या स्थलांतराचा फक्त इतिहास नाही तर मानवाच्या स्थित्यंतराचा उत्तम आलेख मांडलेला आहे. या कादंबरीत गूढता आहे पण ही गूढ कादंबरी नाही, मात्र गूढतेकडे निर्देश करणारी आहे. लेखिकेच्या प्रवाही लेखनशैलीमुळे कादंबरी वाचनात उत्सुकता वाढत राही, ‘भवचक्र’ गूढ नाही पण गूढतेकडे निर्देश करणारी कादंबरी आहे. असे प्रतिपादन समारंभाचे प्रमुख पाहुणे भारत सासणे यांनी केले.

गोव्यातील हिंदुंचे धर्मांतर, त्यांच्यावरील अत्याचार या घटना आणि गणपतीची एक मूर्ती यांची गुंफण, त्या अनुषंगाने घडलेले प्रसंग, मूर्तीचे प्राक्तन, गोव्याच्या संस्कृतीचे निरिक्षण करणार्‍या प्रियंका कर्णिक लिखित ‘भवचक्र’ या कादंबरीचे प्रकाशन सासणे यांच्या हस्ते एस. एम. जोशी सभागृहात झाले. त्या वेळी ते बोलत होते.

पुढे ते म्हणाले, लेखक पात्राला जन्म देतो, पण त्या पात्रांचे पुढे काय होते याचा आराखडा आखलेला नसतो. या कादंबरीतील पात्रे स्वत:चे भागध्येय स्वत:च ठरवितात. प्रत्येक पात्राला त्याच्या स्वभावधर्मानुसार स्वातंत्र्य असते, त्यामुळे त्याला अतर्क्यतेत सोडणेच योग्य असते. या कादंबरीत विलक्षण चित्रात्मकता असल्यामुळे यावर चित्रपट बनावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

प्रा. जोशी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, कादंबरी लेखनात महिला लेखक जास्त प्रमाणात दिसून येत नाहीत. कर्णिक यांचे लेखन बघता भविष्या एक आश्वासक कादंबरीकार म्हणून त्या उदयाला येतील. त्यांनी चाकोरी मोडणारे विषय आपल्या साहित्यातून मांडले आहेत. कादंबरीच्या इतिहासात निर्जिव नायक असणे हे या कादंबरीचे वेगळेपण आहे.  यातील पात्रे काल्पनिक न वाटता स्वत:चा रूप-रस-गंध घेऊन आलेली आहेत, हे जाणवते. ‘भवचक्र’ ही कादंबरी विचारचक्र निर्माण करणारी आहे.

लेखकाच्या मनात कथा येते तेव्हा लेखक एका वेगळ्याच अवकाशात असतो. कुठेतरी पाहिलेली माणसे, घटना यातून लेखकाला विषय सुचतात व कथा घडते, कथेतील पात्रे आपोआप जन्म घेतात, असे प्रियंका कर्णिक मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या.

मान्यवरांचे स्वागत प्रकाशक अमृता कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन अभय गोखले यांनी तर आभार शिरीष कर्णिक यांनी मानले.

---------------------------------------------------------------------------------

संगीत कलाविहार, एप्रिल २०२२च्या अंकात "जो भजे सूर को सदा" पुस्तक प्रकाशन सोहळ्याचा सविस्तर वृत्तान्त छापून आला आहे. हे मासिक अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातर्फे प्रकाशित केलं जातं. संगीतक्षेत्रातील महत्त्वपूर्ण मासिक म्हणून सुपरिचित आहे.

Jo bhaje kalavihar

Jo bhaje kalavihar

---------------------------------------------------------------------------------

दिनांक २२ फेब्रुवारी २०२२ रोजी महेश विद्यालय, कोथरूड या शाळेमधे मराठी राजभाषा दिनानिमित्ताने एक आगळावेगळा उपक्रम करण्यात आला. डॉ. द.दि.पुंडे यांच्या ‘गंमत शब्दांची’ या पुस्तकातील काही निवडक उतारे विद्यालयातील ७ व ८वी इयत्तेच्या विद्यार्थ्यांनी वाचून दाखवले. इंग्लिश मिडियम शाळेतील मुलं-मुली असूनही अतिशय उत्तमप्रकारे त्यांनी मराठी पुस्तकाचे वाचन केले.

या उपक्रमात शाळेतील मराठी विषयाच्या शिक्षिका प्राची वैद्य यांची मोलाची मदत झाली. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका अश्र्विनी मजुमदार यांचा सन्माननीय सहभाग आणि उपमुख्यध्यापिका इतर शिक्षिका यांचेही उत्साहपूर्ण अनुमोदन प्रस्तुत उपक्रमास लाभले. कॉन्टिनेन्टलच्या संपादक डॉ. अंजली जोशी यांनी कॉन्टिनेन्टलतर्फे या उपक्रमाची जबाबदारी पार पाडली. त्यांनी शाळेत जाऊन मुलामुलींशी संवाद साधला आणि मराठी दिनाचा उपक्रम यशस्वीरीत्या राबवण्यात आला याबद्दल शाळेच्या मुख्यध्यापिका आणि त्यांचे सर्व सहकारी शिक्षिका यांचे मनापासून आभार.

---------------------------------------------------------------------------------

दिनांक २५ फेब्रुवारी २०२२ रोजी मराठी राजभाषा दिनानिमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषद, कॉन्टिनेन्टल प्रकाशन आणि रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटी यांच्यातर्फे ‘मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धा’ घेण्यात आली. ज्येष्ठ लेखिका डॉ. वीणा देव यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

‘अभिवाचन ऐकणे हा श्रवणसुंदर अनुभव आहे’ असं मत डॉ. देव यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले. कॉन्टिनेन्टल प्रकाशनाच्या संचालक अमृता कुलकर्णी, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी व इतर पदाधिकारी आणि रोटरी क्लब प्रेसिडेंट आणि कॉन्टिनेन्टलच्या लेखिका प्रियांका कर्णिक उपस्थित होत्या. 

---------------------------------------------------------------------------------

८ मार्च २०२२ रोजी महिला दिनाच्या निमित्ताने विजयनगर वॉर्डचे नगरसेवक मा. धीरजजी घाटे यांच्या हस्ते संचालक अमृता कुलकर्णी यांचा कर्तृत्ववान उद्योगशील महिला म्हणून सन्मान करण्यात आला. शाल आणि सन्मानपत्र देण्यात आले. कॉन्टिनेन्टल प्रकाशन संस्थेच्या दृष्टीने हा सन्मान विशेष उल्लेखनीय आहे.


---------------------------------------------------------------------------------


ज्येष्ठ साहित्यकार आणि ज्ञानपिठ पुरस्कार विजेते वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या स्मृतिदिनानिमित्त जरूर ऐका, आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आलेला कार्यक्रम - 'कुसुमाग्रज - जीवन आणि साहित्य'
ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. द. दि. पुंडे यांनी सांगितलेल्या आठवणी.
सहभाग - डॉ. अंजली जोशी
सादरकर्ते - मुजम्मिल पटेल


---------------------------------------------------------------------------------




देखणा आणि नियोजनबद्ध प्रकाशन सोहळा

Jo Bhaje Sur Ko Sada

मंगळवार दिनांक १ मार्च २०२२ रोजी कॉन्टिनेन्टल प्रकाशित आणि अंजली जोशी लिखित ‘जो भजे सूर को सदा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा अत्यंत दिमाखदार पद्धतीने साजरा झाला.

कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक आणि संगीत समीक्षक डॉ. सत्यशील देशपांडे अध्यक्ष म्हणून लाभले होते. पुस्तकाचे सन्माननीय चरित्रनायक श्री. शौनक अभिषेकी आणि श्री. आनंद भाटे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम अधिक रंगतदार झाला. कार्यक्रमासाठी कॉन्टिनेन्टल परिवाराशी घनिष्ठ संबंध असलेले लेखक आणि मित्र परिवार उपस्थित होते. सुप्रसिद्ध ज्येष्ठ अनुवादक डॉ. उमा कुलकर्णी, बॉलिवुड क्षेत्रात कार्यरत असणारे प्रसिद्ध डिझायनर श्री. श्रीकांत धोंगडे, लेखिका डॉ. विजया देव, डॉ. मृणालिनी शहा हेही आवर्जून आले होते. सुप्रसिद्ध ज्येष्ठ समीक्षक डॉ. द. दि. पुंडे वयाची मर्यादा असूनही उपस्थित राहिले ही आमच्यासाठी विशेष गोष्ट होती. संगीत क्षेत्रातील सुप्रसिद्ध तबलावादक भरत कामत आणि हार्मोनिअमवादक सुयोग कुंडलकर हे देखील आवर्जून उपस्थित राहिले होते. गायकांचे कुटुंबीयही कार्यक्रमास कौतुकाने आले होते.

या कार्यक्रमामधे विशेष गोष्ट अशी की, पुस्तक साहाय्य निर्मितीमधे ज्या ज्या लोकांनी प्रत्यक्ष मदत केली त्यांचे स्मृतिचिन्ह आणि ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आले. संगीत शिक्षिका सौ. रंजनाताई भिडे, वेबडिझायनर मंदार वैद्य आणि पुस्तक मांडणी सजावटकार, मुखपृष्ठ चित्रकार, प्रिंटर, बाईंडर अशा सर्वांचे सत्कार कॉन्टिनेन्टल प्रकाशनाने केले.

अध्यक्ष मा. डॉ. सत्यशील देशपांडे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यावेळी व्यासपीठावर मा. अध्यक्ष डॉ. सत्यशीलजी, मा. शौनक अभिषेकी, मा. आनंद भाटे, लेखिका डॉ. अंजली जोशी आणि कॉन्टिनेन्टल प्रकाशनाचे संचालक ऋतुपर्ण कुलकर्णी आणि अमृता कुलकर्णी होत्या.

मा. अध्यक्ष डॉ. सत्यशीलजी आपल्या भाषणात म्हणाले की ‘‘शौनक अभिषेकी, आनंद भाटे आणि राहुल देशपांडे यांना संगीताचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. या पिढीचे प्रतिनिधित्व करताना हे तीनही कलाकार त्यांना लाभलेल्या वारश्याला कुठेही धक्का न लावता नवनवीन प्रयोग करीत आहेत. भारतीय शास्त्रीय संगीताचे भविष्य आश्र्वासक असल्याचे हे तीनही गायक प्रातिनिधिक उदाहरण आहेत. ते नानाविध प्रयोग करत राहून नव्या पिढीशी एकरूप होताना दिसतात.’’ गायकांचे मनोगत व्यक्त करताना शौनक अभिषेकी म्हणाले की, ‘‘जी परंपरा मला लाभली त्यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो पं. भीमसेनजी, पं. वसंतराव आणि माझे वडील पं. जितेंद्र अभिषेकी या परंपरेचे आम्ही वारकरी आहोत. आनंद भाटे आपल्या मनोगतामधे म्हणाले, ‘‘आजवर आम्ही तिघेही गायक मैफलीच्या किंवा मुलाखतींच्या माध्यमातून रसिकांसमोर आलो आहे. परंतु आम्हा तिघांचा एकत्रित सांगीतिक प्रवास पुस्तकरूपाने येण्याचा हा योग विलक्षण आहे. एखादा कलाकार कसा घडतो या दृष्टिकोनातून दस्तऐवजीकरण या अंगाने हे पुस्तक मोलाचे आहे.’’

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कॉन्टिनेन्टलच्या संचालक अमृता कुलकर्णी यांनी पुस्तकनिर्मितीमागील प्रकाशकाची भूमिका स्पष्ट केली. कार्यरत असणाऱ्या तरुण गायकांची सांगीतिक वाटचाल पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरेल या हेतूने ‘जो भजे सूर को सदा’ हे पुस्तक काढण्याचा प्रमुख हेतू होता हे त्यांनी सांगितले. ८४ वर्षांच्या ग्रंथनिर्मितीच्या परंपरेत या पुस्तकाची मोलाची भर पडली असेही त्या म्हणाल्या. प्रस्तुत कार्यक्रम म्हणजे जमून आलेली सुरेख पुस्तक मैफलच आहे असे म्हणून त्यांनी आपले भाषण संपवले. लेखिका डॉ. अंजली जोशी यांनी आपल्या मनोगतातून त्यांना गायकांचे जे गुण भावले ते आवर्जून सांगितले. पुस्तकाचे लेखन कसे केले याबाबत त्यांनी काही गोष्टी सांगितल्या. या पुस्तकाने सांगीतिक आनंद दिला असे त्या म्हणाल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अवधूत पटवर्धन यांनी उत्तमप्रकारे केले.

एकंदरीत ‘जो भजे सूर को सदा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात आणि दिमाखदार पद्धतीने साजरा झाला. प्रेक्षकही कोविड नियमांचे पालक करून उपस्थित राहिले होते. सर्वांच्या सहकार्याने प्रस्तुत प्रकाशन सोहळा सुफळ संपूर्ण झाला.

---------------------------------------------------------------------------------

कॉन्टिनेन्टल परिवारातील लेखकांची एकमेकांना स्नेहभेट

continental, anjali joshi, shrikant dhongde


कॉन्टिनेन्टल परिवारातील ज्येष्ठ लेखक श्रीकांत धोंगडे यांनी सोमवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ रोजी आमच्या संस्थेला आवर्जून भेट दिली. त्या वेळी कॉन्टिनेन्टलच्या संपादक आणि लेखिका डॉ. अंजली जोशी उपस्थित होत्या. त्यांच्या ‘जो भजे सूर को सदा’ या पुस्तकाची प्रत धोंगडे सरांनी आवर्जून खरेदी केली. त्याच वेळी अंजलीताईंनीही धोंगडे सरांचा ‘कुरतडलेल्या कथा’ हा कथासंग्रह खरेदी केला. ही घटना संस्थेच्या दृष्टीने फारच लक्षणीय घटना वाटली. कॉन्टिनेन्टलच्या लेखकांचे आतापर्यंतच्या ग्रंथनिर्मितीच्या वाटचालीमधे आम्ही अनेक लक्षणीय अनुभव घेतले आहेत. त्यांपैकीच हा एक अनुभव म्हणायला हरकत नाही. श्री. श्रीकांत धोंगडे सर यांचं ॲग्रोवन न्यूज फलटण साहित्य’ तर्फे पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन. आमच्या संपादक डॉ. अंजली जोशी यांनी लिहिलेल्या ‘जो भजे सूर को सदा’ पुस्तकाबद्दल त्यांचंही अभिनंदन. असाच सर्वांचा लोभ राहो आणि वृद्धिंगत होवो ही इच्छा!

अमृता कुलकर्णी
संचालक, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे.

---------------------------------------------------------------------------------


हार्दिक अभिनंदन

ॲग्रोवन न्यूज फलटण साहित्य पुरस्कारांमधे कॉन्टिनेन्टल प्रकाशनाच्या दोन साहित्यकृतींना पुरस्कार

 Kurtadlelya Katha                         

कुरतडलेल्या कथा - कथासंग्रह- श्रीकांत धोंगडे       

                                                     

Saptaparva

सप्तपर्व - कादंबरी - सुनील देसाई

कॉन्टिनेन्टल प्रकाशन संस्थेसाठी ही विशेष अभिमानाची गोष्ट आहे.

कॉन्टिनेन्टल परिवारातील श्रीकांत धोंगडे आणि सुनील देसाई या पुरस्कारप्राप्त लेखकांचे मन:पूर्वक अभिनंदन

---------------------------------------------------------------------------------


‘युगंधर’ कादंबरीचे रसग्रहण

ग्रंथसंवाद च्या वार्षिक अंकात कॉन्टिनेन्टल प्रकाशनाच्या ‘बेस्ट सेलर’ कादंबऱ्यांतील शिवाजी सावंत यांच्या ‘युगंधर’ या कादंबरीचे अद्वैत सोवळे यांनी सुरेख रसग्रहण केले आहे. या अंकातर्फे कादंबरी रसग्रहण स्पर्धा घेतली गेली होती त्यात प्रथम क्रमांक ‘युगंधर’ कादंबरीवरील सरग्रहणाला मिळाला. त्याबद्दल सोवळे यांचे हार्दिक अभिनंदन. तसेच अंकाच्या संपादक संगीता कुलकर्णी यांचेही विशेष कौतुक, अशा प्रकारचे अभिरुची घडवण्याचे आणि वाचनसंस्कृती वाढवण्याचे चांगले उपक्रम राबवत आहेत. त्यांनाही अनेक शुभेच्छा. कॉन्टिनेन्टल प्रकाशनाची पुस्तके जनमानसात किती खोलवर रुजली आहेत याचं ही घटना एक उत्तम उदाहरण म्हणता येईल.

---------------------------------------------------------------------------------


मनस्विनी कादंबरीचे प्रकाशन 

Manasvini Marathi

Manasvini English

---------------------------------------------------------------------------------

Shreeman Yogi

---------------------------------------------------------------------------------

मराठी साहित्यद्वारकेतील अर्जुन… मा. शिवाजीराव सावंत

३१ ऑगस्ट. शिवाजीरावांचा ८१ वा जन्मदिवस ! त्यांचे पहिले साहित्यिक अपत्य – ‘मृत्युंजय’ या वर्षी ५५ वर्षांचे झाले. मानवीजीवनातील आत्मिक शक्तींचा पुरस्कार करणाऱ्या, लोकमान्यतेच्या शिखरावर आरुढ झालेल्या शिवाजीराव लिखित तीन महाकाय कादंबऱ्या – ‘मृत्युंजय’, ‘छावा’, ‘युगंधर’ यांच्या डिलक्स आवृत्त्या या वर्षी प्रकाशित झाल्या.

आजच्या दिनानिमित्त पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषद येथे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी सर यांच्या शुभहस्ते सावंतसाहेबांच्या तिन्ही अजरामर कादंबऱ्यांच्या डिलक्स आवृत्त्यांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी
परिषदेचे सर्व पदाधिकारी, श्री. पायगुडे सर, श्री. सतीश देसाई, श्री. उद्धव कानडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
शिवाजीरावांचा उजवा हात आणि हक्काचा लाडका माणूस असलेले प्रा. मिलिंद जोशी यांनी त्यांच्या हृद्य आठवणी आणि कॉन्टिनेन्टलचे संस्थापक मा. अनंतराव कुलकर्णी यांच्यातर्फे मृत्युंजयची निर्मिती याविषयीचे अनुभव व्यक्त केले. कोल्हापूरच्या जन्मस्थळापासून ते गोव्यातील त्यांच्या अखेरच्या क्षणांपर्यंतच्या सर्व आठवणींना उजाळा मिळाला.
कॉन्टिनेन्टलतर्फे संचालिका अमृता कुलकर्णी यांनी पुष्पगुच्छ व डिलक्स आवृत्त्यांची भेट परिषदेला दिली.

---------------------------------------------------------------------------------

डॉ. अंजली सोमण यांचे कॉन्टिनेन्टल प्रकाशन संस्थेच्या परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन!

सोमवार दिनांक २३ ऑगस्ट २०२१ रोजी कॉन्टिनेन्टल परिवारातील ज्येष्ठ लेखिका डॉ. अंजली सोमण यांना कै. गं. ना. जोगळेकर स्मृतिपुरस्कार देण्यात आला. महाराष्ट्र साहित्य परिषद व जोगळेकर परिवार यांच्यातर्फे दरवर्षी मराठी वाङ्मयक्षेत्रातील बहुमोल योगदानाबद्दल पुरस्कार दिला जातो. यंदाचा हा पुरस्कार डॉ. अंजली सोमण यांना मिळाला याचा कॉन्टिनेन्टल परिवाराला विशेष आनंद होतो आहे. मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु आणि माजी साहित्यसंमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डॉ. अंजली सोमण आणि डॉ. कोत्तापल्ले सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कॉन्टिनेन्टल परिवारातील डॉ. अंजली सोमण यांचे पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन!

---------------------------------------------------------------------------------

भारुडातील वादळ - चंदाताई.. या पुस्तकाचे प्रकाशन

Bharudatil Vadal - Chandatai

रविवार - २० जून, २०२१ कर्मयोगी सभागृह, अर्बन बँक लिमिटेड, पंढरपूर येथे श्री उमेशराव परिचारक व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. पंढरपूर येथील सीए पवनकुमार झंंवर यांनी या पुस्तकरूपातून तिवाडी यांचा संपूर्ण जीवनपट शब्दबद्ध केला.

साधारणपणे गेल्या चाळीस वर्षाहून अधिक काळ चंदाताई ह्या भारुडाचे सादरीकरण करतात. दिल्लीच्या राष्ट्रपती भवनामध्ये देखील त्यांच्या भारुडाचे सादरीकरण झाले. संगीत नाटक अकादमीचा राष्ट्रपती पुरस्कार ही चंदाताई तिवाडी यांना प्राप्त झाला. याच चंदाताई यांचा जीवन प्रवास अतिशय खडतर मार्गातून झाला. याच जीवनपटावर पवनकुमार झंवर यांनी पुस्तक लिहिले. पुणे येथील कॉन्टिनेन्टल प्रकाशन यांच्या माध्यमातून या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

या प्रसंगी ह भ प बाळासाहेब महाराज देहूकर, ह भ प राणा महाराज वासकर, अनिरुद्ध बडवे, पवनकुमार झंवर, चंदाताई तिवाडी, मानसी केसकर, विनया परिचारक आदींच्या उपस्थितीत संपन्न झाला. अध्यक्षस्थान ह भ प जयवंत बोधले महाराज यांनी भूषविले. या वेळी प्रणव परिचारक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

---------------------------------------------------------------------------------

प्रख्यात हिंदी साहित्यिक डॉ. दामोदर खडसे यांच्या ‘बादलराग’ या हिंदीभाषेतील कादंबरीला ‘गोएंकासाहित्यपुरस्कार’ जाहीर झाला आहे. कॉन्टिनेन्टल प्रकाशनातर्फे दामोदरखडसे यांचे मनापासून अभिनंदन. चंद्रकांत भोंजाळ यांनी ‘बादलराग’ ह्या कादंबरीचा मराठीत अनुवाद केला आहे. कॉन्टिनेन्टल प्रकाशन संस्थेने ही अनुवादित कादंबरी प्रकाशित केली आहे.

Badalraag

पुन्हा एकदा डॉ. दामोदर खडसे यांचे मन:पूर्वक अभिनंदन

---------------------------------------------------------------------------------

कोरोना (कोव्हिड – १९) प्रतिबंध व उपाय

उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार

Covid

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे २०२० या वर्षाचा उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीचा उत्तेजनार्थ पुरस्कार कॉन्टिनेन्टल प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेल्या कोरोना (कोव्हिड – १९) प्रतिबंध व उपाय ह्या ग्रंथास दिला गेला आहे.

---------------------------------------------------------------------------------