शोभनाताई गोखले 


१० ते ५ काम आणि वर्ग खोल्यांचे उबदार सुरक्षित वातावरण हवे असणाऱ्यांसाठी डेक्कन कॉलेज मधील प्राध्यापकी ही कायम तारेवरची कसरत वाटे.पण विषयाचा ध्यासआणि ज्ञानाची आस ज्यांना असते त्यांना मात्र ही एक अपूर्व संधी वाटते . यांनाही ती वाटली ,कामानिमित्त त्या भारतभर फिरल्या.शिलालेखांचा मागोवा घेतला.प्राचीन संस्कृतीचा अर्थ समजून घेण्यासाठी ही पायपीट त्यांच्या कामी आली.

कोकणातील एक देवळात कमरेभर पाण्यातून जाताना डोळ्यासमोर केवळ शिलालेख नाचत असल्यामुळे हे दिव्य करणे त्यांना शक्य झाले.बोरीवली जवळील कान्हेरी येथील बौद्ध गुंफाचे त्यांनी केलेले संशोधन हा त्यांच्या कारकीर्दीचा मानबिंदू ठरला.जांभ दगडातील अक्षरे ओळखणे हे एक दिव्य होते . खाचा कोणत्या आणि अक्षरे कोणती हे अतिशय बारकाईने तपासावे लागे.

सुमारे सव्वाशे शिलालेख समग्रपणे अभ्यासून त्यांनी त्यावरील बौद्ध भिक्षूंची नावे ही उजेडात आणून; ही जागा म्हणजे बौद्ध शिक्षण केंद्र असल्याचे उजेडात आणले. वाशीम जवळ वाकाटक राजवंशाच्या पाउलखुणा या सूक्ष्म अभ्यास करणारया संशोधिकेच्या लक्षात आल्या. तेथील ब्राह्मीलिपी उलगडून त्यांनी तो शक काळ ३८० असल्याचे सप्रमाण सिद्ध केले.

हसमुख धीरजलाल सांकलिया या जागतिक कीर्तीच्या संशोधकाच्या हाताखाली पी एच. डी.साठी नाव नोंदवणे हीच त्याकाळी एक मोठी गोष्ट होती. ‘जिऑग्रफी अँड इथ्नॉग्रफी ऑफ मध्य प्रदेशʼहा यांचा संशोधनाचा विषय, त्यांना भविष्यात गावागोवी फिरत संशोधन करताना अधिक समृद्ध करत गेला.

अशा या विदुषी मला अचानक भेटल्या ते माझ्या सरांच्या घरी. ल. ना.गोखले माझे सर .रानडे institute या पत्रकारिता संस्थेचे ते पहिले विभाग प्रमुख. त्यांच्या घरीही काहीवेळा जाणे झाले .ते तेंव्हा Educational TV in Japan हे पुस्तक लिहित होते. मी बालचित्रवाणी साठी काम करत असल्यामुळे त्यांच्याशी भारतीय शैक्षणिक दूरचित्रवाणी आणि जपानची शैक्षणिक वाहिनी या विषयी चर्चा होत असे. तेंव्हा त्यांच्या या पत्नी म्हणून प्रथम माहिती झाल्या.सर पत्रकारितेत तर या पुराभिलेख आणि नाणेशास्त्र या क्षेत्रात संशोधक म्हणून नावाजल्या गेल्या होत्या.

त्या मूळ सांगलीच्या.पण वडिलांचा वकिली व्यवसाय अमरावतीत होता. त्यामुळे याच शहरात त्यांची जडणघडण झाली.संस्कृत आणि इतिहास हे त्यांचे अभ्यासाचे आणि व्यासंगाचे विषय. डॉक्टरेट मिळवलेल्या या हुशार संशोधिकेला डेक्कन कॉलेज इथे व्याख्याता म्हणून नोकरी मिळण्यात काहीच अडचण आली नाही .पुरातन संस्कृती समजून घेण्यासाठी लिपीचे विशेष महत्व असते. यांची निवडही लिपीशास्त्र हाच अभ्यासक्रम शिकवण्यासाठी झाली .जुन्नरच्या नाणे घाटातील सातवाहन सम्राज्ञीच्या कालखंडाची त्यांनी केलेली मीमांसा संशोधन क्षेत्रात नावाजली गेली .

पंढरपूरचे विठ्ठल मंदिर असो वा गुजरात मधील कच्छ असो यांनी आपल्या शोधक दृष्टीने इतिहासाची अनेक पाने उजळून टाकली .कच्छच्या रणात तर,प्रचंड उन्हात घोड्यावर बसून ,स्मशानभूमीत जाऊन शिलालेख शोधण्याचे धारिष्ट हे केवळ ज्ञान प्राप्तीच्या प्रेरणेनेच येते .याचे मोल कसे करता येईल ?लेखिका असलेल्या (कै)शकुंतला फडणीस या सख्या बहिण. आणि भूकंप तज्ञ अरुण बापट हे सख्खे भाऊ.हे दोघेही त्यांच्या कार्यक्षेत्रामुळे अनेकांना माहिती आहेत.पण यांची वाट अनवट असल्यामुळे यांच्या कामाची माहिती सर्वाना नाही .
ती करुन देण्यासाठी त्यांच्या आजच्या स्मृतीदिनी(मृत्यू -२२ जून ,२०१३ ) हे कृतज्ञतापूर्वक स्मरण!
शोभनाताई गोखले यांना सविनय अभिवादन !

डॉ केशव साठये
keshavsathaye@gmail.com

---------------------------------------------------------------

कल्याणी गाडगीळ


कल्याणी गाडगीळ या कॉन्टिनेन्टल परिवारातील ज्येष्ठ लेखिका आहेत. त्या जशा सुजाण लेखिका आहेत तशाच सुजाण वाचकही आहेत हे त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांवरून तत्काळ लक्षात येते. न्यूझिलंड, ऑस्ट्रेलिया या देशांची भौगोलिक, सांस्कृतिक माहिती त्यांनी ज्या ताकदीने पुस्तकात दिली आहे त्यावरूनच त्या वाचक म्हणूनही श्रेष्ठ आहेत हे समजते. कल्याणी गाडगीळ यांनी पुणे विद्यापीठातून जर्मन भाषेत एम.ए. केले आहे. कमिन्स डिझेल सेल्स अँड सर्व्हिस (इं.) लिमिटेड या कंपनीत चीफ एक्झिक्युटिव्हच्या सेक्रेटरीच्या पदावर काम केले होते. त्यानंतर आयुका या संस्थेत जयंत नारळीकर यांच्या सेक्रेटरीचे काम केले. नारळीकरांकडे काम करत असतानाच त्यांना खगोलशास्त्राची गोडी निर्माण झाली. त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊनच त्यांनी 'Jewels in the sky' या खगोलशास्त्रातील पुस्तकाचे ‘आकाशातील रत्ने’ हे मराठीत भाषांतर केल हे त्यांचे पहिले पुस्तक होय. या पुस्तकापासून त्यांचा लेखनप्रवास सुरू झाला. स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशनसाठी गाडगीळ यांनी ‘स्किझोफ्रेनिया एक नवी जाणीव’ हे मराठी आणि ‘Schizophernia- A new perspectiove' हे इंग्रजी अशी दोन पुस्तके लिहिली. २००२ मध्ये त्या न्यूझिलंडमध्ये स्थायिक झाल्या. तेव्हा त्यांनी भारतातून न्यूझिलंडमध्ये स्थायिक होणाऱ्या भारतीयांसाठी पुस्तक लिहिले. आंतरजाल (इंटरनेट) या माध्यमाचाही त्या लेखनासाठी उपयोग करून घेतात. मराठी वर्ल्ड कॉम या संकेत स्थळावर त्यांनी वर्षभर ‘वेचू या’ हे सदरलेखन केले. सध्या त्या ऑकलंड विद्यापीठात काम करत आहेत. अशा चतुरस्र लेखिका कॉन्टिनेन्टल परिवारात आहेत याचा आम्हाला विशेष आनंद वाटतो. अशा लेखिकेचा समग्र परिचय या अंकात करून देत आहोत.

स्किझोफ्रेनिया - एक नवी जाणीव

schrizophenia

स्किझोफ्रेनिया या आजाराने सर्व जगभर आपले हातपाय पसरले आहेत. या आजाराविषयी सर्वसामान्य लोकांना फारशी माहिती नसते. अजूनही मानसिक आजारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वैज्ञानिक नाही. हा आजार कोणालाही होऊ शकतो. मात्र या आजाराशी सामना करण्यासाठी समाजातून मदत मिळत नाही. या आजारात स्वत: आजारी व्यक्ती आणि तिचे कुटुंबीय केवळ झगडतात. ही परिस्थिती लक्षात घेऊन या पुस्तकाद्वारे स्किझोफ्रेनिया या आजाराविषयी खरीखुरी व विज्ञानाधारित माहिती देऊन लोकजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वसामान्य व्यक्तीला जिज्ञासा म्हणून आजारी व्यक्तीच्या कुटुंबीयांना कधी दिलासा, कधी मार्गदर्शन म्हणून व स्वत: आजारी व्यक्तीलाही (जेव्हा तो योग्य मानसिक आपल्या आजाराबाबत अवस्थेत असेल तेव्हा) आत्मपरीक्षण करण्यासाठी या पुस्तकाचा नक्कीच उपयोग होईल.

ऑस्ट्रेलिया - एक पुृढारलेला अतिप्राचीन देश

australia

कित्येक दशलक्ष वर्षांपूर्वी गोंडवन हा प्रचंड, सलग भूखंड विलग होऊन त्यापासून आजचे अमेरिका, आफ्रिका, भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड इत्यादी देश निर्माण झाले. त्या वेळेपासून ऑस्ट्रेलिया खंडाचा भूभाग इतर जगापासून दूर, एकाकी पडला. इतर जगाबरोबरच ऑस्ट्रेलिया खंडातही उत्क्रांती होत गेली. पण इतर जगापेक्षा अगदी वेगळ्या वनस्पती, प्राणी, नैसर्गिक चमत्कृती ऑस्ट्रेलियात निर्माण झाल्या. आज माहीत असलेल्या ऑस्ट्रेलियाचा शोध युरोपियनांनी १८ व्या शतकात लावला. आता या देशाची गणना ‘पुढारलेल्या’ देशांत होते. या देशात अतिप्राचीन, अतिदुर्मीळ प्राणी-वनस्पती आजही अस्तित्वात आहेत. या संबंधीची छायाचित्रे या पुस्तकात आहेत. म्हणूनच गाडगीळ यांनी पुस्तकाला ‘ऑस्ट्रेलिया एक पुढारलेला अतिप्राचीन देश’ असे समर्पक नाव दिले आहे.

न्यूझीलंड - दक्षिण गोलार्धातील नंदनवन

New Zealand

परदेश पर्यटनामध्ये न्यूझीलंड हा देश जगप्रसिद्ध आहे. याचे कारण म्हणजे तिथले निसर्गसौंदर्य. ‘किवी’ लोकही अत्यंत सुस्वभावी असून पर्यटकांचे तिथे उत्तम स्वागत केले जाते. न्यूझीलंडची संपूर्ण सफर आपल्या आवडी व सवडीनुसार करण्यासाठी या देशाची व तेथील सर्व स्थळांची सचित्र आणि तपशीलवार माहिती देणारे हे पुस्तक पर्यटकांच्या संग्रही असणे अत्यावश्यक आहे. इंटरनेट, सेल फोन असताना या पुस्तकाची काय गरज आहे? याचे समर्पक उत्तर लेखिकेने दिले आहे. त्यांचे म्हणणे असे की सर्वप्रथम मराठीत हे पुस्तक लिहिल्याने अनेक गोष्टींची मातृभाषेतून माहिती मिळते आणि लेखिका स्वत: तिथे स्थायिक असल्याने न्यूझीलंडचा प्रत्यक्षानुभव वाचकाला मिळतो. आपल्या देशबांधवांच्या सवयी लक्षात घेऊन लेखिकेने अनेक बारीकसारीक गोष्टी पुस्तकात सांगितल्या आहेत. पुस्तकात जागोजाग चित्रे व नकाशे दिले आहेत. त्याचा भारतीय पर्यटकांना निश्चितच उपयोग होईल. भारतीय लोकांच्या गरजा, पर्यटकाला उत्तम मार्गदर्शक म्हणून तत्यंत आवश्यक आहे.

अल्याड पल्याड

Alyad Palyad

‘अल्याड पल्याड’ हे पुस्तक म्हणजे गाडगीळ यांच्या अनुभवलेखांचा संग्रह आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, इंग्लंड, युरोप इत्यादी देशांत प्रवासानिमित्त व गाडगीळ यांचे नातेवाईक तिथे असल्यामुळे गाडगीळ यांना तिथल्या दैनंदिन जीवनाचं निरीक्षण करता आला. त्या त्या देशातील वैशिष्ट्यपूर्ण चालीरीती, सामाजिक दृष्टिकोन, जीवनपद्धती, सण, करमणुकीची साधने या साऱ्यांचे सूक्ष्म निरीक्षण गाडगीळ यांनी केले आहे. त्यातून हा अनुभव-लेखसंग्रह निर्माण झाला. खरं तर त्यांच्या या अनुभवकथाच आहेत. मोठ्या रंजकतेने गाडगीळ यांनी आपले अनुभव रंगवून सांगितले आहेत.

वाचकांना खिळवून ठेवेल असा हा संग्रह आहे.

 

न्यूझीलंडच्या माओरींची तोंडओळख

New Zealandchya

न्यूझीलंडचे पहिले रहिवासी माओरी यांच्या जीवनाची थोडक्यात ओळख करून देणारं कल्याणी गाडगीळ यांचं प्रस्तुत पुस्तक कुतूहल निर्माण करणारे आहे. प्रवासवर्णन वाचण्याची आवड असणाऱ्या आणि सहलप्रेमी वाचकांना प्रस्तुत पुस्तक निश्चितच आवडेल

ही सर्व पुस्तके खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा