Book Categories


कॉन्टिनेन्टल प्रकाशित ‘कॅन्सर निदान, उपचार व प्रतिबंध या पुस्तकास म.सा.प. तर्फे देण्यात येणारा कै. विलास रानडे पुरस्कार

कॉन्टिनेन्टल प्रकाशित ‘कॅन्सर निदान, उपचार व प्रतिबंध या पुस्तकास म.सा.प. तर्फे देण्यात येणारा कै. विलास रानडे पुरस्कार

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने डॉ. शकुंतला क्षीरसागर पुरस्कृत कै. विलास शंकर रानडे पुरस्कार कॉन्टिनेन्टल प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या डॉ. यशवंत तोरो यांच्या ‘कॅन्सर - निदान, उपचार व प्रतिबंध’ या पुस्तकाला डॉ. अभिजीत वैद्य यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलींद जोशी, प्रमुख कायर्वाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, परीक्षक मनोज देशपांडे उपस्थित होते.

पुरस्कार स्विकारल्यानंतर डॉ. तोरो म्हणाले, ‘‘कॅन्सर या रोगास इतर कोणत्याही दुर्धर व्याधीपेक्षा सर्वजण जास्ती घाबरतात हे सत्य आहे. या रोगाचे निदान झाल्यानंतर रुग्णास या रोगावर कोणताही चांगला उपचार नाही, आता आपण जगणार नाही व आता आपण आता पूर्णत: निष्क्रीय आहोत, अशी भावना मनात उत्पन्न होऊन रुग्ण हतबल होताना मी अनेकदा पाहिले आहे.

कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या बोलण्यातून विशेषत: ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांची मानसिकता त्यांचे या रोगाबद्दलचे पूर्णत: अज्ञान, उपचाराला येणारा अफाट खर्च, रोगावर करण्यात येणारे उपचार, त्यासाठी लागणाऱ्या चाचण्या या सर्वांची अडचण ज्यावेळी माझ्यासमोर आली त्याचवेळी या अशा रुग्णांसाठी व त्यांच्या नातेवाईकांसाठी साध्या व सोप्या भाषेत कॅन्सर विषयी काही माहिती उपलब्ध करून द्यावी असे सातत्याने वाटू लागले. त्यातूनच हे पुस्तक मी. लिहिले.’’