Book Categories


ना. सं. इनामदारांची ‘शहेनशहा’ नव्या देखण्या रूपात

ना. सं. इनामदारांची ‘शहेनशहा’ नव्या देखण्या रूपात

ना. सं. इनामदार यांची ‘शहेनशहा’ कादंबरी मराठी रसिकवाचकांच्या गळ्यातला ताईतच! आजही अतिशय आवडीने ही कादंबरी वाचली जाते. ही कादंबरी निर्मिण्याची प्रक्रिया, त्यातले सहकारी यांबाबत अनंतराव कुलकर्णी यांनी ‘माझीही आत्मकथा’ मधे अतिशय ओघवत्या भाषेत लिहिले आहे. ‘‘पुस्तक निर्मितीकडे अनिरुद्ध पाहावयास लागल्यापासून कॉन्टिनेन्टलच्या प्रकाशनांचे बाह्यांग-सौंदर्य जरा आधुनिक झालेले होते. पुस्तकांची पहिली पाने आणि रॅपर याबाबत ते साक्षेपाने लक्ष घालीत. ‘कार्ड बाईंडिंगला वरून आर्ट पेपरचे रॅपर करण्यापेक्षा आर्ट कार्ड वापरून ते काम भागवावे. पुस्तक खुटखुटीत दिसते आणि खर्चही कमी येतो. त्यांचे म्हणणे आता कॉन्टिनेन्टलने रूढ केलेले होते. अनिरूद्धांच्या सौंदर्य दृष्टिमुळे आजवर मला लागून राहिलेली रुखरुख नाहीशी झाली. अनेक पुस्तकांना महाराष्ट्र शासनाची उत्कृष्ट निर्मितीची पारितोषिके तर मिळालीच पण माझा फार मोठा गौरव झाला.

‘शहेनशहा’ या ना. सं. इनामदार लिखित औरंगझेबावरील ऐतिहासिक कादंबरीला १९७६ चे उत्कृष्ट निर्मितीबद्दलचे अखिल भारतीय स्तरावरचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. अर्थात सर्व मुद्रण प्रकाशन - जगताकडून कॉन्टिनेन्टलचा गौरव झाला. अनिरूद्धांबरोबर या पुस्तकाचे मुद्रक श्री. चिं. स. लाटकर, बांधणीकार विनायकराव जोग आणि रॅपरवरच्या चित्राला हातभार लावणारे श्री. शंकरराव खत्री व चित्रकार सालकर यांचाही गौरवपूर्ण उल्लेख करावयास हवा. या पुस्तकाला वापरलेला कागद चांगला असला तरी अगदी उत्तम नव्हता. टाईप मात्र नवा होता. आतील ले आऊट आणि छपाई चांगली जमून आलेली होती पण सर्वात बहार झालेली होती ती वरील रॅपरबाबत. रॅपर इतके देखणे झालेले होते की, जणू पुस्तकाच्या इतर बाबींकडे लक्ष देण्याचे कारणच उरू नये. रॅपरवरचे चित्र म्हणून एका व्याघ्राजीनच्या रंगीत फोटोचा उपयोग केलेला होता. पुस्तकाच्या सौष्ठवाला एकदम अर्थपूर्ण जिवंतपणा आलेला होता. हजारो पुस्तकांतून उठून दिसावे असे हे मुखपृष्ठ झालेले होते.

मौजेच्या सौंदर्यवादी भागवत मंडळींनी, रॅशनल आर्टच्या श्री. जयवंतराव देवकुळ्यांनी आणि देशमुख आणि कंपनीच्या रामभाऊ देशमुखांनी आवर्जून पत्रे लिहून कॉन्टिनेन्टलचे अभिनंदन केले.’’

आता नव्याने आलेली देखणी प्रतही अशीच मेहनच घेऊन तयार करण्यात आलेली आहे. वाचकांनी भरभरून या कादंबरीवर प्रेम केले आहे, आजही करत आहेत आणि यापुढेही करत राहतील.

Tags: Shahenshah