Book Categories


डॉक्टर आणि रुग्ण यांचे नाते संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले

डॉक्टर आणि रुग्ण यांचे नाते संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले

डॉक्टर आणि रुग्ण यांचे नाते संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले 
- प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ  आणि ज्येष्ठ अभिनते डॉ. मोहन आगाशे 

पुणेः- डॉक्टर आणि रुग्ण यांचे आपआपसातील नाते हे सेवा आणि विश्वास या धाग्यांनी पूर्वी गुंफलेले होते, पंरतू त्याचे रुपांतर आता ग्राहक आणि विक्रेता या स्वरुपात झालेले आहे. हा डॉक्टर मला लुटणार या संशयाने रुग्ण डॉक्टरांकडे,  तर हा रूग्ण मला कोर्टात खेचणार या संशयाने डॉक्टर रूग्णाकडे पहात असतो. एकंदरीतच डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील निकोप नाते लयास जाऊन हे नाते संशयाच्या भोवऱ्यात अडकले असून ते गढूळ झाले असल्याची खंत प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ  आणि ज्येष्ठ अभिनते डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केली.

प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रकाश जावडेकर लिखित आणि कॉन्टिनेंन्टल प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या 'डॉक्टर होणे एक आव्हान' या पुस्तकाचे प्रकाशन  डॉ. आगाशे यांच्या हस्ते आज झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रसिद्ध प्लॅस्टिक सर्जन डॉ. रविन थत्ते आणि प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. नंदू लाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेऴी व्यासपीठावर कॉन्टिनेन्टल प्रकाशनाच्या संचालिका अमृता कुलकर्णी, लेखक डॉ. प्रकाश जावडेकर, डॉ. सुषमा जावडेकर उपस्थित होते. 

यावेळी बोलताना डॉ. मोहन आगाशे त्यांच्या मनोगतात म्हणाले की, नकळत डॉक्टरकीचे व्यवसायात रुपांतार झाले असून रुग्ण सेवा देणाऱ्या डॉक्टरांपेक्षा भांडवलदारांच्या हातात हा व्यवसाय स्थिरवला आहे. हे भांडवलदार व्यवसायीक तज्ज्ञ डॉक्टरांना नोकरीवर ठेऊन ते सांगतील तशी रुग्णसेवा चालवण्यास भाग पाडत आहेत. या भांडवलदार व्यवसायिकांनी डॉक्टरीपेशा हायजॅकच केला आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. रुग्णसेवा देताना डॉक्टरांनी दोन श्वासातील जे अंतर आहे ते अंतर सुखकर व्हावे यासाठी प्रयत्न करावेत. रुग्णांच्या डॉक्टरांकडून जशा अपेक्षा असतात त्याचप्रमाणे डॉक्टरांची देखील रुग्णांकडून सहकार्याची अपेक्षा असते. पंरतु हे नाते अव्दैताकडून व्दैताकडे सरकल्याने गंभीर समस्या उद्भवल्या आहेत. 

मनुष्य प्राण्याच्या अति जगण्याचा हव्यास या सेवेचे व्यवसायात रुपांतर होण्यास कारणीभूत आहे. बहिणाबाई जसे म्हणतात दोन श्वासातींल अंतर म्हणजे जीवन हे सुत्र आपण लक्षात घेतले पाहिजे. आयुष्य हे किती जगलो त्यापेक्षा ते किती खोलीने जगलो हे अधिक महत्त्वाचे आहे. ज्ञानेश्वरांपासून ते राम गणेश गडकरींपर्यंत या महामानवांचे आयुष्य अल्प होते, पंरतू त्या अल्प काळाच्या आयुष्यात देखील त्यांनी केलेले कार्य चिरकाल टिकणारे आहे. जन्म, मृत्यु आणि जीवन हे आयुष्यातील चिरकाल संस्कार जाऊन आता बाजारीकरण संस्कृती रुजली आहे. आरोग्य हा केवळ डॉक्टरांशीच निगडीत प्रश्न नसून तो रुग्णानांदेखील लागू होतो. आरोग्य ही दोघांची समसमान जबाबदारी आहे. हे विसरुन चालणार नाही. 

डॉ. नंदकिशोर लाड त्यांच्या मनोगतात म्हणाले, नाडी वैद्यशास्त्र जाऊन आता विविध रीपोर्टर्सवर आधारीत रुग्ण तपासला जातो. अलिकडील डॉक्टर रुग्णाला तपासण्याऐवजी रीपोर्टर्सच तपासत असतो. आरोग्यसेवा मिळण्यासाठी काही नवीन प्रयोग राबविण्याची आवश्यकता असून लोकसहभागातून रुग्णसेवा देणार्या रुग्णालयांची साखळी निर्माण होणे गरजेचे आहे. लोहकसहभागाशिवाय आरोग्यसेवेशी संबंधीत प्रश्न सुटणे अवघड आहे. 

प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रकाश जावडेकर यांनी लेखकीय मनोगत व्यक्त करताना पुस्तक लिहण्यामागची भूमिका विषद केली.प्रसिद्ध प्लॅस्टिक सर्जन डॉ. रविन थत्ते यांनी देखील थोडक्यात मनोगत व्यक्त केले. कॉन्टिनेंन्टल प्रकाशनाच्या संचालिका अमृता कुलकर्णी यांनी प्रकाशकीय मनोगत व्यक्त केले.  ममता क्षेमकल्याणी यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले. तर डॉ. सुषमा जावडेकर यांनी आभार मानले.