Book Categories


‘निद्रिस्त नदी’ या पुस्तकाचे प्रकाशन

‘निद्रिस्त नदी’ या पुस्तकाचे प्रकाशन

अनुवादाच्या संकरामुळे साहित्य  दालन व्यापक होते - डॉ. सदानंद मोरे

पुणेः- साहित्य कृतींच्या अनुवादाचा संकरीत संस्कार वाढला आणि जोपासला गेला पाहिजे. अनुवादाच्या संकरामुळे साहित्य दालन व्यापक होत असून त्या माध्यमातून लोककला आणि लोकसंस्कृतीची देवाण-घेवाण होण्यास हातभार लागतो, असे मत संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. 

येथील येथील कॉन्टिनेन्टल प्रकाशनातर्फे प्रसिद्ध लेखिका प्रा. डॉ. कल्पना वांद्रेकर यांच्या ‘निद्रिस्त नदी’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. मोरे यांच्या हस्ते आज झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे प्रसिद्ध लेखक आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलींद जोशी, ईशान्य भारताचे अभ्यासक शशिधर भावे, कॉन्टिनेन्टल प्रकाशनाच्या संचालिका अमृता कुलकर्णी,  लेखिका प्रा. डॉ. कल्पना वांद्रेकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रसिद्ध नागा लेखिका ईस्टरीन किरे यांच्या ‘When The River Sleeps’ या कादंबरीचा हा मराठी अनुवाद आहे. 

यावेळी बोलताना डॉ. सदानंद मोरे म्हणाले की, विज्ञानकथा आणि गूढकथा या दोन्हीमध्ये कल्पनेला वाव असतो. पूर्वी विश्वात अस्तित्वात असलेल्या किंवा भविष्यात अस्तित्वात येऊ शकणाऱ्या गोष्टींचा अंतर्भाव त्यामध्ये असल्यामुळे बौद्धिक कसोटी न लावता त्या स्वीकारल्या पाहिजे. विज्ञान कथांबरोबरोच भूत पिशाच्चांच्या विश्वातील गुढकथांची देखील निर्मिती होत आहे. अशी ही साहित्याची व्यापकता खूप मोठी आहे. यात अद्भूतता आढळून येत असली तरी त्याला वास्तवाची किनार असते. नारायण धारप हे अशाच प्रकारच्या धाटणीचे लेखन करणारे लेखक होते.

यावेळी बोलताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले की, यावेळी बोलताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले की, अनुवाद म्हणजे भाषांतर नाही. तर त्या अनुवादातून त्या प्रदेशातील लोकसंस्कृती, लोकधारणा आणि लोकमानस यांचे दर्शन होते, त्यावेळीच त्या अनुवादाचा हेतू साध्य होतो. त्या प्रदेशातील माणसांच्या जगण्याची लय अनुवादकाला पकडता आली, तरच तरच तो अनुवाद प्रभावी होतो. अनुवादामध्ये अनुनादही तितकाच महत्त्वाचा असतो. सभोवतालच्या सर्व गोष्टींचे मानुशीकरण करण्याची समाजाची मानसिकता भारतातील सर्व प्रांतात दिसून येते. याबाबतीत माणसांनी देवांचाही अपवाद केलेला नाही म्हणून उन्हाळ्यात देवांना थंड वाटावे म्हणून चंदनाची उटी लावली जाते आणि हिवाळ्यात गरम लोकरीची वस्त्रे घातली जातात. नदीची देखील ओटी भरली जाते. नदीला देखील माणसांप्रमाणे झोप येते, ही लोकभावना त्यातूनच दृढ झाली आहे. या निद्रिस्त नदीच्या संकल्पनेतूनच हे पुस्तक आकाराला आले आहे. अनुवाद हे सर्जनच असते. अनुवादामुळेच भाषा भगिनींमध्ये संवादाचे पूल निर्माण होतात. या संवादपुलांच्या माध्यमातूनच राष्ट्रीय ऐक्याची भावना दृढ होईल. निद्रिस्त नदी या अनुवादित पुस्तकाच्या माध्यमातून उत्तर पूर्वेकडील नागा संस्कृतीचे दर्शन मराठी वाचकांना निश्चितच घडेल.

यावेळी शशिधर भावे यांनी मनोगत व्यक्त केले. कॉन्टिनेन्टल प्रकाशनाच्या संचालिका अमृता कुलकर्णी यांनी पुस्तक निर्मिती मागील भूमिका विशद केली. लेखिका प्रा. डॉ. कल्पना वांद्रेकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी शोभा टिळक यांनी सरस्वती वंदन सादर केले. सुषमा बापट यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.