|| भाषांमध्ये थोरु मराठियेसी ||
जैसी पुष्पांमाजि पुष्प मोगरी
कि परिमळांमाजि कस्तुरी
तैसी भाषांमाजि साजरी
मराठिया ।।
चारशे वर्षांपूर्वीच्या थॉमस स्टिफन यांच्या ख्रिस्तपुराणात त्यांनी आपल्या मायमराठीचं "कवतिक" किती सुंदर विशेषणं देऊन केलं आहे, की आजही अभिमानानं सच्च्या मराठी माणसाचा उर भरून येतो. एका ख्रिश्चन माणसानं चारशे वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या मराठीचा गौरव करणं ही आजच्या काळाच्या नजरेतून पाहिलं तर खूपच मोठी गोष्ट म्हणायला हवी. कारण "छे! मराठी? नाही रे बाबा! शक्यच नाही समजणं" (ही वाक्यंही पूर्ण मराठीतनं न म्हणता येणारे काही भाषाप्रेमी?) तसंच मराठी भाषा, लेखक, संशोधन या सर्वच गोष्टींबाबत उदासीन असणारे संबंधित संस्था, विद्यालये, विद्यापीठ आणि सरकारी यंत्रणा या सगळ्यांचा मराठीबाबतचा उदार (?) दृष्टिकोन पाहता थॉमस स्टिफनच्या ख्रिस्तपुराणातल्या ओव्या लखलखीत उजळून दिसतात, आजच्या कालपटावर! २७ फेब्रुवारी, कुसुमाग्रज स्मृतिदिन म्हणजेच मराठी दिन दरवर्षी येतो. काही भाषाप्रेमी लोकं त्यानिमित्तानं लेख लिहितात, सोशल मीडियावर जागृत होतात; त्यांच्यादृष्टीनं त्यांचे ते प्रामाणिक प्रयत्न लोकांच्या दृष्टीनं एका दिवसाच्या राज्यपदासारखं असलं तरी ते फार महत्त्वाचं आहे. कारण मराठीविषयी प्रेम आहे म्हणूनच ते निदान एवढी संवेदनशीलता तरी दाखवतात. अशी जरी परिस्थिती असली तरी आपली मराठी अतिशय वैभवशाली आहे, देखणी आहे, जरतारी वस्त्र ल्यायलेली आहे. आपल्याकडे अनेक थोर लेखक, संत, समाजसुधारक होऊन गेले त्यांनी आपल्या कार्यातून, लेखनातून मराठी समृद्ध केली आहे. सुरुवातीला ख्रिस्तपुराणाचा उल्लेख केला त्यात मराठीचा गौरव करणार्या ओव्या स्टिफन यांनी रचल्या त्याचा हा आणखी एक नमुना-
जैसी हरळांमाजि रत्नकिळा
कि रत्नांमाजि हिरा निळा
तैसी भाषांमाजि चोखळा
भाषा मराठी ।।
आपल्या ज्ञानदेवांनी "अमृताते पैजा जिंके" असं मराठीला कौतुकानं गौरवलं आहे. मोरोपंत, वामनपंडित, मुक्तेश्वर, रघुनाथपंडित यांच्यासारखे पंडित कवी तसेच ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, नामदेव, चोखामेळा यांच्यासारखी संतमंडळी यांनी प्राचीन काळातल्या मराठीला भक्तीचा साज चढवला. ब्रिटिश काळात भारतीय आणि युरोपियन संस्कृतीचं एकमेकांशी घर्षण झालं त्यामुळं मराठीचं स्वरूप बदललं. कथा, कादंबरी, कविता, नाटक, निबंध यांसारखे वाङ्मयप्रकार समृद्ध व्हायला लागले. बाबा पद्मनजी, हळबे, ह.ना.आपटे, वि. स. खांडेकर, ना. सी. फडके यांच्यासारख्या लेखकांनी कथा, कादंबरी, निबंध यांसारखे वाङ्मयप्रकारात बरंच लेखन केलं. नंतर आधुनिक काळात मराठीचं स्वरूप अधिक रेखीव झालं आणि ती स्वतःचं अस्तित्व दाखवू लागली. केशवसुत, भा. रा. तांबे, माधव ज्युलिअन, गोविंदाग्रज, कुसुमाग्रज, बोरकर, बालकवी, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, गदिमा, शांता शेळके, ना.धो.महानोर किती नावं घ्यावीत! कथेमधे अरविंद गोखले, गंगाधर गाडगीळ, पु.भा.भावे, यांच्यापासून सुरू होऊन नंतर स्त्री लेखकही मोठ्या संख्येनं कथालेखन करत आहेत. काशीबाई कानिटकरांपासून ते अगदी आतापर्यंतच्या मनस्विनी लता रवींद्र सारख्या लेखिकांपर्यतचा मोठा आयाम आहे कथालेखनाचा. कादंबरी तर आजही अत्यंत लोकप्रिय वाङ्मयप्रकार आहे. ऐतिहासिक, सामाजिक, चरित्रात्मक, स्त्रीकेंद्री, स्त्रीवादी, कौटुंबिक अशा अनेक वाटांनी कादंबरी लेखकांनी समृद्ध केली आहे. ह.ना. आपटेंपासून कादंबरीचं आधुनिक रुपडं दिसू लागलं आणि ते काळाच्या प्रत्येक टप्प्यावर बदलत गेलं. त्यामुळं मराठी भाषाही समृद्ध होत गेलेली दिसते. मराठी नाटक तर मराठी माणसाची शान आहे. मराठी नाटक न आवडणारा मराठी माणूस विरळाच असं म्हटलं जात असे. अजूनही नाट्यप्रेमी मंडळी नवनवे प्रयोग करत असतात.
आता एवढी मोठी परंपरा असताना मराठीप्रेमींना "माझी मराठी किती वैभवशाली आहे" हे ओरडून का सांगावं लागतं आहे? सरकार, त्याचं शैक्षणिक धोरण, शाळांची अवस्था, शिक्षकांचे प्रश्न या सगळ्या अडचणींच्या पलीकडेही मराठी भाषा आहे, हे आपण प्रत्येक मराठी माणसानं जाणायला हवं. परदेशातनं येऊन आपल्या भारतीय भाषा परदेशी लोकं शिकतात आणि मराठीत साहित्यनिर्मिती करत आहेत. चारशे वर्षांपूर्वी स्टिफन यांनी केलेली ही सुरुवात आहे. आता त्याचं फळ परदेशात दिसू लागेल. पण कालांतरानं तसं महाराष्ट्रात दिसेल ना? असा धास्तावलेला विचार प्रत्येक मराठीप्रेमीच्या मनात आज ठसठसतो आहे. यासाठी प्रत्येक पालकाने घरातल्या लहान मुलांमधे मातृभाषेचं प्रेम तेवत ठेवणं नितांत गरजेचं आहे, नाहीतर मराठी शिकवण्यासाठी महाराष्ट्रात परदेशातून परदेशी शिक्षक बोलवण्याची वेळ येण्याची भयानक परिस्थिती ओढवू शकेल. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे, मराठी संपन्न केलेले लेखक, भाषाशास्त्रज्ञ यांचं नाव घेण्याची तरी आपली पात्रता राहील का? असे अनेक विचार मनात खळबळत राहतात, तर मराठी दिनाच्या निमित्ताने एकाच दिवसापुरतं नव्हे, तर कायमस्वरूपी निश्चय आपण प्रत्येकानं करू या-
मी मराठीतूनच बोलीन
मी मराठीतूनच लिहीन
मी मराठीतूनच विचार करीन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रत्येक गोष्टीसाठी शक्यतो मराठीतूनच प्रतिसाद, प्रतिक्रिया देईन.
माझ्या मराठीचा मी नितांत आदर करीन आणि अभिमान धरीन.
|| जय मराठी, मी मराठी ||
- डॉ. अंजली जोशी
कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे