मराठी भाषा दिन
कोणतीही कला, मग ती संगीत असो, नृत्य असो. चित्र असो किंवा शिल्प असो त्यातून आनंदच मिळत असतो. एखाद्या कलाकृतीने आपण अस्वस्थ होतो. तेंडुलकर म्हणतात त्याप्रमाणे ‘चांगले अस्वस्थ’ होतो. त्या अस्वस्थतेतही कलाकृतीच्या श्रेष्ठत्वाची पावती असते. संगीतातलं उदाहरण द्यायचं तर ‘मारवा’ रागानं विरहभावना, हुरहुर मनात दाटून येते. रागामुळं जी भावनिर्मिती होते त्याने आपण त्या रागात गुंगून जातो. तसंच एखाद्या साहित्यकृतीने आपण उदास झालो, दु:खी झालो तरी त्या कृतीत गुंगून जातो. उदाहरणच द्यायचं झालं तर जी. एं.च्या कथा. जी.एं.च्या कथांनी आपली ‘शब्देविण संवादु’ अशी अवस्था होते. त्यातही एक वेगळाच आनंद असतो. हा आनंद देणारे लेखकही वेगळी सर्जनशीलता घेऊन आलेले असतात. म्हणूनच कुसुमाग्रजांची कविता अंतर्मुख करते, शिरवाडकरांची नाटके जीवनमूल्ये शिकवतात, बोरकरांच्या कविता संगीताचा आनंद देतात, कवितेची गेयता, लय दाखवून देतात असे लेखक-कवी मात्र थोडेच असतात. अशा या मोजक्या लेखकांचे साहित्य कॉन्टिनेन्टलला बऱ्याच प्रमाणात प्रकाशित करण्याचे भाग्य लागले आहे, ही खूप मोठी अभिमानाची बाब आहे. कुसुमाग्रज-शिरवाडकर, श्री. ना. पेंडसे, जी. ए. कुलकर्णी, महादेवशास्त्री जोशी यांसारख्या श्रेष्ठ लेखकांची साहित्यसंपदा कॉन्टिनेन्टलने प्रकाशित केली आहे.
मराठी भाषा आणि मराठी संस्कृती घडवणारे आणि सांभाळणारे असे हे लेख यांची स्मृती मराठी दिनाच्या निमित्ताने प्रत्येक मराठी रसिकवाचकाने जागवायला हवी. आताच्या काळातले लेखकही सकस लेखन करतात. मात्र मराठी भाषेची जपणूक त्यांच्याकडून होते की नाही हा विचार करण्याचा मुद्दा आहे. सध्याची इंग्रजाळलेली मराठी भाषा बऱ्याच साहित्यकृतींतून दिसून येते आहे. मराठी भाषेचं वैभव खूप मोठं आहे. कुसुमाग्रजांच्याच ‘मराठी माती’ या संग्रहातील पहिलीच ‘मराठी माती’ ही कविता मराठीचं वैभव दाखवून देणारी आहे. ती प्रत्येकाने वाचायला हवी.
मराठी भाषेसाठी सध्या खूप प्रयत्न केले जात आहेत. तिचं रक्षण करण्यासाठी अनेक संस्था, व्यक्ती पुढे सरसावून काम करत आहेत. पण तिचं रक्षण करण्याच्या उत्साहात तिच्या लहेजाकडे दुर्लक्ष होतं आहे असं वाटतं आहे. प्रत्येक भाषेचा एक लहेजा असतो तो जर साहित्यकृतींतून दिसला, तर त्या कृतीतून भाषिक आनंद देखील मिळतो. सध्याच्या मराठी साहित्याचा अवकाश बराच विस्तृत झाला आहे. विविध विषयांचा अंतर्भाव मराठी वाङ्मयप्रकारात होतो आहे. वाङ्मयप्रकारातही बदल घडून आले आहेत. मराठी भाषेतही बदल घडून येत आहेत, हे यायलाही हवेत. मात्र भाषेचा लहेजा राहायला हवा. तो कुठंतरी हरवत चालला आहे की काय, असं वाटतं आहे. काही तुरळक लेख हा लहेजा सांभाळताना दिसतात. त्यांचं प्रमाण अल्प आहे.
वाचक आणि लेखक यांचं नातं पूर्वी खूप घट्ट होतं. ते सध्याच्या काळात थोडं सैल झालं आहे असं दिसतं. याचा परिणाम साहित्यक्षेत्रातही होतोच होतो. मराठी दिनाच्या निमित्ताने आपण मराठी लेखक-वाचक सर्वांनीच मराठी भाषेचा लहेजा कसा राखता येईल याचा विचार नक्कीच करू या. प्रत्येक मराठी दिनाच्या वेळी मराठीसाठी आपण काय केलं आणि काय करणार आहोत याचा विचार करून जास्तीत जास्त पुस्तके खरेदी करण्याचा नेम करू या.
कदातिच काहीजणांना वाटेल की, काळानुसार भाषेत बदल होणारच ना!! त्याचं प्रतिबिंबि साहित्यात तसंच उतरणार. नव्या पिढीला त्यांच्या भाषेतलंच साहित्य भावेल, उमजेल. ही गोष्ट काही प्रमाणात खरी आहे. परंतु भाषेची सौंदर्ये या पिढीला कशी कळतील? आपली मातृभाषा कशी होती? असं जर पुढच्या अनेक पिढ्यांनंतर पाहायची वेळ आली तर ही इंग्रजाळलेली मराठीच दाखवावी लागेल. मग भाषेचा लहेजा कसा टिकून राहील? बोरकरांच्या कवितेतले ‘खडीसाखरेचे पाय’ यामागचं सौंदर्य पुढच्या पिढ्यांना समजलं नाही तर मराठी भाषेचं वैभव ‘संस्कृत’ भाषेसारखं धोक्यात येऊ शकेल. म्हणूनच आजच्या लेखकांवर मोठी जबाबदारी आहे की मराठी भाषेचा लहेजा अबाधित राखणे!
- डॉ. अंजली जोशी