Book Categories


सकारात्मक दृष्टिकोन

सकारात्मक दृष्टिकोन

हल्ली आपण चर्चेत सकारात्मक दृष्टिकोन हा शब्द मुद्दाम वापरतो. तो अधिक परिणामकारक व्हावा म्हणून त्याचे इंग्रजी रूप उपयोगात आणतो. ‘पॉझिटिव्ह अप्रोच.’ प्रत्येक सभेतील एखादा तरी वक्ता त्याचा आवर्जून उल्लेख करतो. शिक्षक विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टिकोनाचे धडे देतात. गटचर्चेत भाग घेणारा उत्साही तरुण त्याची कास धरतो. याचा अर्थ ‘सकारात्मक दृष्टिकोन’ हे जणू आपले पालुपद आहे. तो आपला परवलीचा शब्दप्रयोग बनला आहे.

सकारात्मकच्या विरुद्धार्थी शब्द आहे नकारात्मक. ज्यात विरोध असतो, नकार असतो; तो नकारात्मक. सकारात्मकमध्ये स्वागत असते, स्वीकार असतो. आपल्यासमोर जे काही नवीन येत आहे, ते जाणून घेण्याचा, त्याला योग्य तो प्रतिसाद देण्याचा तो एक प्रकारे होकार असतो. म्हणून सकारात्मकतेला आपण होकारात्मक असेही म्हणतो. पण हा दृष्टिकोन म्हणजे काही केवळ उपचार नसतो; तर तो आशावादी, कृतिशील मानसिकतेचा परिपाक असतो.

सकारात्मक हा स्थायिभाव असलेली व्यक्ती प्रसन्न, आनंदी असते. तिची वृत्ती स्वागतशील असते. ती प्रत्येक गोष्टीकडे अनुकूल दृष्टीने पाहते. त्यामुळे तिच्या चित्तवृत्ती नेहमी प्रफुल्लित राहतात, मन टवटवीत राहते. तिच्या वागण्या- बोलण्यात ‘पोझिंग’ नसते; त्यात एक प्रकारचा ‘फ्रेशनेस’ असतो. ही व्यक्ती दुसऱ्याचा योग्य तो आदर करते. त्याला हवा तसा उचित, यथाशक्ती प्रतिसाद देते; पण त्याच वेळी ही व्यक्ती स्वत:वर अन्याय करीत नाही. दुसऱ्याला तसा अन्याय करण्याची संधी देत नाही. स्वत:विषयी योग्य तो आदर असणे, स्वत:वर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ न देणे, याला आपण आत्मसन्मान म्हणतो. माणसाच्या जीवनात ही आत्मसन्मानाची वृत्ती अत्यंत महत्त्वाची असते. या आत्मसन्मानानेच आत्मविश्वास वाढतो, त्यातूनच आत्मविकासाची प्रेरणा मिळते.  हाती घेतलेल्या कामात आनंद वाटतो, ते मनापासून करावेसे वाटते. त्यामुळे माणूस एकूणच उत्साही, कृतिशील आणि प्रसन्न बनतो.

सकारात्मक दृष्टिकोनाची व्यक्ती कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीवर हळूहळू का होईना, पण मात करायला शिकते. ती अडीअडचणींचा बाऊ करीत नाही. अपयश आले तरी त्याचा खिलाडूवृत्तीने स्वीकार करते. आपले अपयश झाकण्यासाठी तिला लटक्या, तकलादू आत्मसमर्थनाची गरज वाटत नाही. सकारात्मक वृत्तीच्या यक्तीला आपल्या कामात तर रुची असतेच, पण इतरांच्या कामातही तिला रस वाटतो. आजच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात अनेक अडीअडचणी असतात. हे वास्तव पत्करून अंगीकृत कार्य पार पाडण्याची मानसिकता म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन होय.

सकारात्मक दृष्टिकोन असलेली व्यक्ती आपली धोपटमार्गी कामे तर नीट करतेच, पण त्या कामातही वेगळेपण जोपासण्याचा तिचा प्रयत्न असतो. प्रत्येक काम ती रसिकतेने, आनंदी वृत्तीने, मनापासून करीत असल्यामुळे त्यात आपोआप कलात्मकता येते. याचा अर्थ सकारात्मक मानसिकता म्हणजे नवनिर्मितीची एक प्रकारे नांगरणीच असते. कारण प्रत्येक काम वेगळ्या दृष्टीने, कल्पकतेने करण्याचा तिचा प्रयत्न असतो. तसा मुळातच प्रत्येक माणूस हा निर्मितीशील असतो. म्हणूनच निर्मिती करणे ही माणूसपणाची विशेष ओळख असते. कारण प्रत्येकाजवळ कमी- अधिक निर्मितीक्षमता असतेच सकारात्मक दृष्टी फक्त तिला जागृत करते. त्याच्यातील कलावंताला कार्यरत व्हायला अनुकूल वातावरणनिर्मिती करते. म्हणून सकारात्मकता हा आपला स्थायिभाव झाला पाहिजे. सकारात्मक दृष्टिकोन असल्याशिवाय आपण कोणत्या क्षेत्रातील यशाची पहिली पायरी चढू शकत नाही.

तात्पर्य, काय तर सकारात्मक दृष्टिकोन हा काही केवळ उपचाराचा भाग नसतो. ते नुसते एक प्रकारचे स्वप्नरंजन नसते. त्याला कृतिशीलतेची आणि जीवनमूल्यांची जोड हवी असते. म्हणून सकारात्मकता ही व्यक्तिमत्त्व विकासाची पहिली अट आहे. तसेच मानसिक आरोग्य राखण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांची ती अपरिहार्य सुरुवात असते. म्हणून आजच्या गतिमान आणि स्पर्धात्मक युगात सकारात्मकतेला पर्याय नाही, हे निश्चित!

- डॉ. एस. एम. कानडजे