Book Categories


ना. सं. इनामदार

ना. सं. इनामदार

मूळ येरळवाडी आणि बचेरी गावचे मराठी साहित्य सृष्टीतील सृजनशील व प्रतिभावान इतिहासकार… आज २३ नोव्हेंबर आज श्रेष्ठ ऐतिहासिक कादंबरीकार ना. सं. इनामदार यांची जयंती. जन्म २३ नोव्हेंबर १९२३ ना. सं. इनामदार हे मराठीतील श्रेष्ठ ऐतिहासिक कादंबरीकार होते. इतिहासकाळातील उपेक्षित पात्रांना न्याय देणारा लेखक अशी त्यांची कायमची ओळख मराठी वाचकाला राहिल. कादंबरीमध्ये काय सांगितले आहे, त्याच्याएवढेच महत्त्व ते कसे सांगितले आहे, या गोष्टीला असते. इतिहासाचा विपर्यास होऊ नये यासाठी कसून संशोधन, इतिहासाचे सजर्नशील आकलन, आणि प्रसंगातील नाट्यमयता व चित्रदर्शी शैली, यामुळे ते लोकप्रिय कादंबरीकार ठरले. त्यांच्या ऐतिहासिक कादंबरी लेखनाला महाराष्ट्रात तोड नाही. ऐतिहासिक वास्तवातून वर्तमानाचे परिक्षण करणारे ते थोर कादंबरीकार होते. एकीकडे काय घडले याचे तपशील गोळा करणे, उपलब्ध माहितीतून जरूरी तो तपशील न मिळाल्यास, त्याविषयी बिनचूक ठोकताळे बांधणे, इतिहासाचा आदर करणे, आणि त्यानंतर पुन्हा आपल्या दृष्टिला दिसलेला, भावलेला इतिहास उभा करणे, ही दुहेरी तारेवरची कसरत ऐतिहासिक कादंबरीकाराला करावी लागते आणि इनामदारांनी ती लिलया किती सहजपणे साधली होती हे त्यांच्या लेखनातून दिसून येते. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरावर लिहीलेली ‘बंड’ ही त्यांची पहिली कादंबरी परंतु ती प्रसिद्ध होण्यास १९९६ साल उजाडले. त्या समराच्या शताब्दीच्या निमित्ताने त्यांनी ती लिहीली होती. ‘झेप’ ही त्यांची प्रथम प्रसिद्ध झालेली, दुसरी ऐतिहासिक कादंबरी, १९६३ सालामधे प्रकाशित झाली. ज्या काळात वाढते औद्योगिकीकरण, दाबले गेलेले कामगार, बदलणारे सामाजिक आणि व्यक्तिगत वास्तव यांचे पडसाद मराठी साहित्यसृष्टित उमटत होते. त्या काळात आपली आगळी वेगळी शैली घेऊन ना. सं. इनामदार आले आणि त्यांनी मराठी वाचकांना अक्षरश: जिंकून घेतले. इतिहास पुन्हा तपासण्याची ‘शिकस्त’ केली. त्यांची ही ‘झेप’ मराठी वाङमय जगताला एका नव्या क्षितिजाकडे नेणारी ठरली. कथा लेखनाने त्यांच्या लेखनाची सुरूवात झाली. इनामदारांनी आपले वाङमयीन लेखन १९४५ मध्ये ‘अनिल’ साप्ताहिकातून सुरू केले. १९५८ पर्यंत त्यांनी ‘हंस’, ‘मोहिनी’, ‘किर्लोस्कर’ ‘साप्ताहिक स्वराज्य’ वगैरे नियतकालिकांतून लेखन केले. मराठेशाही आणि पेशवे यांच्या कालखंडातील अनेक व्यक्तिंचा मागोवा त्यांनी घेतला. त्यांची इतिहासाकडे पाहण्याची दृष्टि अतिशय निकोप होती. नोकरीच्या निमित्ताने हिंडत असताना ऐतिहासिक दस्तावेजांचे संशोधन करण्याचा छंदच त्यांना लागला होता. त्रिंबकजी डेंगळे या ऐतिहासिक व्यक्तिरेखेवर त्यांनी लिहीलेल्या ‘झेप’ या कादंबरीच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. या त्यांच्या कादंबरीस राज्य शासनाचा पुरस्कार देखील मिळाला. त्यानंतर १९६६ साली आलेल्या त्यांच्या ‘झुंज’ या कादंबरीने पुन्हा एकवार राज्य शासनाचा पुरस्कार पटकाविला. मल्हारराव होळकर यांची सून अहिल्याबाई होळकर. त्यांच्या मुलाचे निधन झाल्यावर होळकर घराण्यातील तुकोजी होळकर याने सारी सुभेदारी सांभाळली. ‘यशवंतराव होळकर’ हे तुकोजी होळकरांचे अनौरस पुत्र. यशवंतराव होळकरांना पुणे जाळणारा पेशव्यांचा सरदार म्हणून सारेच ओळखतात. जुन्या मराठी माणसांनी प्रात:काळी ज्यांची नावे उच्चारू नयेत अशा त्रयीत यशवंतरावांची गणना केली. पण मराठी वाचकांना परिचित नसलेला यशवंतराव होळकर ‘झुंज’ मध्ये ना. सं. इनामदरांनी पेश केला आहे. जदुनाथ सरकार यांच्या साहित्याने प्रेरित होऊन ना. सं. इनामदारांनी, ‘शहेनशहा’ ही कादंबरी लिहीली. पार्वतीबाईसाहेब पेशवे यांच्या जीवनावरील ‘शिकस्त’ मध्ये पानिपत युद्धात धारातिर्थी पडलेल्या सदाशिवराव भाऊ यांच्या पत्नीच्या वेदना त्यांनी मांडल्या. ‘राऊ’ मध्ये थोरल्या बाजीरावांचा पराक्रम, मस्तानी प्रकरण, या प्रकरणाचे बाजीरावांना बसलेले चटके, यांचा मागोवा घेतला आहे. दुसरा बाजीवार त्यांनी ‘मंत्रावेगळा’ कादंबरीतून उभा केला. ‘राजेश्री’ या कादंबरीमध्ये शिवचरित्राचा उत्तर भाग येतो. झेप, झुंज, मंत्रावेगळा, राऊ, शहेनशहा, शिकस्त, राजेश्री, अशा त्यांच्या कादंबऱ्यांनी तो काळ भारून टाकला होता. ही सारी निर्मिती १९६२ ते १९८६ या दोन तपांत झाली. त्यांची ‘घातचक्र’ ही कादंबरी देखील प्रकाशित झाली आहे. मंत्रावेगळा, झुंज आणि झेप या तिन्ही कादंबऱ्यांना राज्य सरकारचे पुरस्कार लाभले. शहेनशहा या कादंबरीला १९७६ रोजी भारत सरकारच्या छपाई आणि सजावटीबद्दलचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार. १९९७ रोजी झालेल्या नगर येथील साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’चे ते तीन वर्ष उपाध्यक्ष होते. मा. ना. सं. इनामदार यांचे १६ आक्टोबर २००२ रोजी निधन झाले. आपल्या समूहातर्फे मा. ना. सं. इनामदार यांना आदरांजली. संजीव वेलणकर, पुणे.