Book Categories


कॉन्टिनेन्टलची तीन पिढ्यांतील संगीतविषयक पुस्तकं

कॉन्टिनेन्टलची तीन पिढ्यांतील संगीतविषयक पुस्तकं

कॉन्टिनेन्टलची तीन पिढ्यांतील संगीतविषयक पुस्तकं ही साहित्यप्रेमी आणि संगीतप्रेमी रसिकांसाठी मोठी पुस्तकमेजवानीच होय. कै. अनंतराव कुलकर्णी यांच्या कारकीर्दीतील ‘सवाई गंधर्व आणि त्यांचे गंधर्व संगीत’ – संपा. वामनराव देशपांडे हे १९८६ मधील पुस्तक आहे. २००७ मधे कै. अनिरुद्ध कुलकर्णी यांच्या कारकीर्दीत ‘स्वरहिंदोळे’ – दत्ता मारुलकर हे पुस्तक निर्माण झाले आणि मार्च २०२२ मधे ऋतुपर्ण आणि अमृता कुलकर्णी यांनी ‘जो भजे सूर को सदा’ – अंजली जोशी हे पुस्तक प्रकाशित केले आहे. सवाई गंधर्व, भारतरत्न भीमसेन जोशी आणि आनंद भाटे किराणा घराण्यातील गुरुशिष्य याबरोबरच पद्मश्री कै. पं. जितेंद्र अभिषेकी, त्यांचे चिरंजीव आणि शिष्य शौनक अभिषेकी तसेच पं. वसंतराव देशपांडे आणि त्यांचे नातू राहुल देशपांडे यांच्यावरील एकूण तीन पुस्तकं प्रकाशकांच्याही तीन पिढ्यांमधे प्रकाशित केली आहेत. हा एकप्रकारे नवपंचम योगच होय.

१९८६ मधील ‘सवाई गंधर्व आणि गांधर्व संगीत’ या पुस्तकात वामनराव देशपांडे यांनी सवाई गंधर्व आणि त्यांची गायकी वरील मास्टर कृष्णराव, भीमसेन जोशी, कृ. द. दीक्षित, पां. ह. देशपांडे इत्यादींनी लेखन केलं आहे. तरुणपिढीला सवाई गंधर्वांची आणि त्यांच्या गायकीची ओळख करून देणारं हे १९८६ मधलं पुस्तक आहे.
२००७ मधलं दत्ता मारुलकरांनी लिहिलेलं ‘स्वरहिंदोळे’ हे चरित्रात्मक पुस्तक मोठमोठ्या प्रतिभावान गायकांची माहिती करून देणारं आहे. जितेंद्र अभिषेकी, वसंतराव देशपांडे, माणिक वर्मा, मल्लिकार्जुन मन्सूर, शोभा गुर्टू, मोगुबाई कुर्डीकर आणि कुमार गंधर्व अशा दिग्गज कलावंतांची माहिती तरुण पिढीला होऊ शकेल यादृष्टीने ‘स्वरहिंदोळे’ पुस्तक उपयुक्त आहे.
२०२२ मधील कॉन्टिनेन्टलच्या संपादक डॉ. अंजली जोशी लिखित ‘जो भजे सूर को सदा’ हे पुस्तक शौनक अभिषेकी, आनंद भाटे आणि राहुल देशपांडे यांचा सांगीतिक प्रवास सांगणारे आहे. आजच्या काळातील या तीन लोकप्रिय गायकांचे संगीत शिकताना घेतलेले कष्ट, त्यांच्यावरील गुरूंचे संस्कार, त्यांचे अनुभव, त्यांची शैक्षणिक कारकीर्द, कलाकार म्हणून कारकीर्द या सर्व गोष्टींची माहिती ‘जो भजे सूर को सदा’ मधून वाचकांना होते. या तीनही कलाकारांच्या मुलाखती घेऊन मिळालेल्या माहितीआधारे तयार झालेले हे पुस्तक असल्याने त्यामधे सत्यता आहे. त्यामधील माहिती स्वतः कलाकारांनीच दिली असल्याने या पुस्तकाचा उपयोग गाणं शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना निश्र्चितच होऊ शकतो.
हे पुस्तक केवळ विद्यार्थ्यांसाठी ज्ञानोपयोगी, मार्गदर्शक नसून ते रसिकांसाठी ही दृष्टिसुख देणारे, वाचनानंद देणारे आहे. तिन्ही कलाकारांच्या बालपणीच्या आठवणी, त्यांच्या चालू कारकीर्दीतील सन्मान या सगळ्या गोष्टींच्या छायाचित्रांनी युक्त असे हे देखणे पुस्तक आहे.
पुस्तकास प्रसिद्ध संगीतकार श्री. राहुल रानडे तसेच प्रसिद्ध अभिनेते – दिग्दर्शक श्री. सुबोध भावे यांची शुभेच्छापर प्रस्तावना लाभली आहे.
अशाप्रकारे कॉन्टिनेन्टलच्या तीन पिढ्यांमधे संगीतातील गायक कलावंतांवरील दर्जेदार पुस्तकांची निर्मिती केली गेली. ही तीनही पुस्तकं कॉन्टिनेन्टलच्या ग्रंथदालनामधे उपलब्ध आहेत. रसिकांनी नक्कीच त्याचा लाभ घ्यावा.

- अमृता कुलकर्णी


सवाई गंधर्व
१९८६
संपा. वा.ह.देशपांडे
३५/-

स्वरहिंदोळे
२००७
दत्ता मारुलकर
२२५/-

जो भजे सूर को सदा
२०२२
अंजली जोशी
३५०/-